न्यूट्रिनो - अक्षय ऊर्जेचा स्रोत!

Dr-Vijay-Bhatkar
Dr-Vijay-Bhatkar
Updated on

पृथ्वीवर अहोरात्र उपलब्ध ‘न्यूट्रिनो’ या मूलभूत कणाला वस्तुमान असल्याचे सिद्ध झाले आणि साऱ्या जगाचे लक्ष त्याकडे वेधले गेले. या न्यूट्रिनोपासून विद्युत ऊर्जा मिळविण्यासाठी जर्मनीचा न्यूट्रिनो एनर्जी ग्रुप कार्यरत आहे. नुकतेच या ग्रुपने भारतातील सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट)सोबत सहकार्य करार केला आहे. न्यूट्रिनो एनर्जी प्रत्यक्षात येणे शक्य आहे का? त्याची व्यावहारिकता किती? अशा अनेक प्रश्नांसंबंधी या ग्रुपचे सदस्य आणि ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न - प्रकाशीय विद्युत परिणामाच्या (फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट) शोधानंतर प्रत्यक्ष सौर विद्युत घट अस्तित्वात यायला मोठा कालावधी लागला. न्यूट्रिनोला वस्तुमान असल्याचे नुकतेच सिद्ध झाले आहे. याचा न्यूट्रिनो विद्युत घटापर्यंतचा प्रवास कितपत व्यवहारिक आहे?
डॉ. विजय भटकर -
आपण जेव्हा ब्रह्मांड कोणत्यातरी ऊर्जेवर चालते असे म्हणतो. तेव्हा आपल्यासाठी ती सूर्याची ऊर्जा असते. तिच्यापासूनच तयार झालेल्या जीवसृष्टीतील विविध घटकांपासून आपण ऊर्जेची गरज भागवतो. अगदी लाकडांच्या जाळण्यापासून ते खनिज तेल आणि सौर विद्युत ऊर्जेपर्यंत! पारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर कार्बनचे उत्सर्जन होते. पर्यायाने जागतिक हवामान बदलाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. न्यूट्रिनोच्या निमित्ताने एक नवीन, अमर्याद आणि सर्वत्र उपलब्ध कण ऊर्जेच्या निर्मितीसाठी उपलब्ध झाला आहे. न्यूट्रिनो वस्तुमान असल्याचे जपानी शास्त्रज्ञ ताकाकी काजिता आणि कॅनडाचे आर्थर मॅकडॉनल्ड या शास्त्रज्ञांनी सिद्ध केले. एकदा की न्यूट्रिनोपासून पदार्थामध्ये विभवांतर (पोटेंशियल डिफरन्स) तयार करता आले तर, आपल्याला अहोरात्र ऊर्जेचा स्रोत मिळेल. जर्मनीत या संशोधनासाठी प्रा. होलगर यांच्या नेतृत्वात न्यूट्रिनो एनर्जी ग्रुप स्थापन झाला असून, त्या ग्रुपला शांतीप्रिय देशांसोबत हे संशोधन पुढे न्यायचे आहे. म्हणून त्यांनी मागील वर्षीच भारतीय शास्त्रज्ञांशी संवाद साधला. सी-मेटवर इलेक्ट्रॉनिक्स पदार्थांवर काम करत असल्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यातूनच एक सहकार्य करार (एमओसी) करण्यात आला. त्यातूनच एक कल्पना समोर आली. इलॉन मस्कने जसे ‘टेस्ला’ ही मोटार तयार केली. त्याचप्रमाणे न्यूट्रिनो एनर्जीपासून ‘पाय कार’ करण्याची कल्पना समोर आली. गणितातील ‘पाय’ची किंमत ३.१४..... पुढे वाढतच जाते. म्हणजे ‘अक्षय’ असते. म्हणून आम्ही या कारला ‘पाय कार’ असे नाव दिले. 

भारताची न्यूट्रिनो एनर्जी संशोधनात भूमिका नक्की काय राहील? सरकार आणि उद्योगांचा सहभाग आवश्यक आहे का?
इलेक्ट्रॉनिक पदार्थांसंबंधीच्या संशोधनासाठी सी-मेटची महत्त्वपूर्ण भूमिका असेल. पदार्थांचा शोध घेणे, त्यांची चाचणी करणे, ते प्रत्यक्षात वापरात येण्यासाठी कार्य करण्यात येईल. सौर विद्युत घटाच्या माध्यमातून ऊर्जाक्षेत्रात जी क्रांती झाली. त्यामध्ये चीन आघाडीवर होता. कारण तिथे उपलब्ध असलेले पदार्थांचे मुबलक साठे, सरकारने संशोधन आणि विकासात घातलेले लक्ष, खासगी उद्योगांनी घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण ठरला. आपल्याकडे तसे होऊ शकले नाही. पर्यायाने चीन जगाच्या बाजारपेठेत खूप पुढे निघून गेला. न्यूट्रिनो एनर्जीसंदर्भात संशोधनामध्ये आपण अगदी सुरवातीपासून लक्ष घालायला हवे. कारण त्यातून स्वामित्व हक्क मिळतील. भविष्यातील या ऊर्जेचा उद्गाता म्हणून आपण पुढाकार घ्यायला हवा. उद्योगांकडे दूरदृष्टी असायला हवी. कारण त्यांना प्रत्यक्ष काही दाखविल्याशिवाय ते संशोधनात सहभागी होणार नाही. त्यांना प्रत्यक्ष प्रोटोटाइप तयार करून दाखवावा लागेल. तसे झाल्यावरच आम्ही उद्योगांचे लक्ष वेधू शकू.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पदार्थ शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन करावे लागणार? यासाठी निधी कसा उपलब्ध करणार? 
प्रोटोटाइप विकसित करण्यापर्यंतचा प्रवासही खूप मोठा आहे. त्यासाठीही मोठ्या प्रमाणावर निधी लागेल. न्यूट्रिनो एनर्जी ग्रुपला २.५ अब्ज डॉलरची आवश्यकता आहे. त्यासाठी जर्मनीतील ग्रुप प्रयत्न करत आहे. देशात तरी सी-मेट संशोधनाशी निगडित कार्य करणार आहे. आवश्यकतेनुसार इतर संशोधन संस्थांची मदत घेतली जाईल. 

नव्या ऊर्जास्रोतांच्या शोधाने मानवाचा इतिहास बदलला. न्यूट्रिनो एनर्जी आपण यशस्वीपणे प्रत्यक्षात उतरवू शकलो तर भारताचे भवितव्य बदलेल का?
न्यूट्रिनो एनर्जीत खरंच ‘पोटेंशियल’ आहे. आपण खरंच जर यांच्यापासून विद्युत ऊर्जा मिळवू शकलो. तर हा अक्षय ऊर्जेचा स्रोत ठरेल. ज्या देशाकडे ही ऊर्जा असेल तो देश अधिराज्य गाजवेल. त्यामुळे हा शोध केवळ भारतासाठीच नाही तर, जगासाठी मोठा बदल ठरेल. न्यूट्रिनो एनर्जीसाठी आम्ही प्रथम घरगुती वापराचे उपकरणे, मोबाईलवर काम करणार आहोत. एक प्रकारे वस्तूंचे आवरणच या पदार्थांपासून बनविले जाईल आणि अहोरात्र ऊर्जा मिळेल. स्वातंत्र्यानंतर आपण सरकारच्या नियंत्रणात सर्व काही करत गेलो. त्यामुळे आपण बंद वातावरणात काम करत गेलो. देशात आयटी क्षेत्र आल्यामुळे लालफितीचा कारभार जरा दूर झाला आहे. परकीय चलनही देशात आले. पर्यायाने उद्योगांचा संशोधनात सहभाग वाढेल अशी स्थिती आहे. रोजगार निर्मिती आता ही नव्याने निर्माण होणाऱ्या क्षेत्रातूनच होईल. आपल्याकडे आयटी, बायोइन्फॉर्मेटिक, एआय आदी नवीन क्षेत्र आले पर्यायाने रोजगार निर्मिती झाली. त्यामुळे सुरवातीपासूनच आपण न्यूट्रिनो एनर्जीच्या संशोधनात असायला हवे.

आपण अजूनही संशोधनावर सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या एका टक्क्यापेक्षा कमी खर्च करतो? अशा स्थितीत असे मोठे संशोधन अपेक्षित आहे का?
सी-मेटमध्येही शास्त्रज्ञांची संख्या वाढविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आधीपेक्षा आता स्थिती सुधारली असून, सरकारनेही आता जास्त लक्ष द्यायला हवे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून संशोधनात विद्यापीठांची आणि उद्योगांची भूमिका अभिप्रेत झाली आहे. जगातील सर्वाधिक ९९३ विद्यापीठे भारतात आहेत. अर्थात त्यांच्या गुणवत्तेसंबंधी प्रश्न असेल. पण जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील. आपण पुढे पाहत सकारात्मक दृष्टीने विचार करायला हवा. खासगी क्षेत्रानेही यात पुढे यायला हवे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.