पाकिस्तानात बदलाचे वारे

पाकिस्तानमध्ये एस्टॅब्लिशमेंट म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पाक लष्कर पुरस्कृत व्यवस्थेने नुकतीच तेथील विरोधी पक्षांबरोबर बैठक घेतल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांमधून प्रसिद्ध झाले.
Pakistan
PakistanSakal
Updated on
Summary

पाकिस्तानमध्ये एस्टॅब्लिशमेंट म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पाक लष्कर पुरस्कृत व्यवस्थेने नुकतीच तेथील विरोधी पक्षांबरोबर बैठक घेतल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांमधून प्रसिद्ध झाले.

दिवाळीखोरीच्या उंबरठ्यावरील पाकिस्तानची जागतिक स्तरावर पत पुरती गेली आहे. सत्ताबदलाशिवाय त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडणार नाही, या आशेने तेथे सत्तांतराचे वारे वाहत आहे. त्याचा केलेला उलगडा.

पाकिस्तानमध्ये एस्टॅब्लिशमेंट म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पाक लष्कर पुरस्कृत व्यवस्थेने नुकतीच तेथील विरोधी पक्षांबरोबर बैठक घेतल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांमधून प्रसिद्ध झाले. पाकिस्तानातील पंजाबचे सध्याचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी स्थापन केलेल्या पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षाचे सभासद आहेत. शाहबाज यांचे तेथील लष्करशाहीशी चांगले संबंध असल्याचे बोलले जाते. त्यामुळे लवकरच पाकिस्तानच्या संसदेत सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारवर अविश्वासाचा ठराव आणला जाईल आणि त्यामध्ये त्यांच्या तेहरीक-ए-पाकिस्तान या पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारचा पराभव होईल, अशी पाकिस्तानमधील पत्रकारांमध्ये चर्चा आहे. इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदावरून गच्छंतीनंतर पाकिस्तानचा नवीन पंतप्रधान कोण असू शकेल, याची चर्चा सुरू आहे.

शाहबाज शरीफ यांचे नाव तेथील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे सांगितले जाते. पाकिस्तान हा भारताचा उपद्रवी शेजारी देश असल्याने तेथील घडामोडींवर आपले बारीक लक्ष असते. शाहबाज यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यास त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यांचे पुत्र म्हणजे हमजा शरीफ यांची पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी निवड होईल, असे बोलले जाते. नाहीतरी पाकिस्तानच्या तथाकथित ‘एस्टॅब्लिशमेन्ट’मध्ये तेथील पंजाबी लोकांचे वर्चस्व असल्याने शाहबाज शरीफ यांची निवड होऊ शकते.

अर्थात नवाज शरीफ पाकिस्तानमध्ये परतत असल्याच्याही जोरदार चर्चा आहेत. नवाज शरीफ यांची विविध खटल्यांमधून सुटका झाल्यास तेही पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावर दावा करू शकतात. मग राहिल्या नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम शरीफ. त्यांनाही पंतप्रधानपदाची आस असू शकते. पाकिस्तान पीपल पार्टी (पीपीपी) या पक्षाचे सर्वेसर्वा असफअली झरदारी किंवा त्यांचे पुत्र बिलावल भुट्टो हे दोघेही पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतील मोहरे आहेत. पण दोघेही सिंध प्रांतातील आहेत.

दिवाळखोरीचे सावट, घसरलेली पत

पाकिस्तान सध्या आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) यादीमध्ये वर्णी लागल्याने कोणतीही जागतिक वित्त संस्था पाकिस्तानला कर्ज देण्यास तयार नाही. कारण पाकिस्तानची कर्ज फेडण्याचीच कुवत नाही. आखाती मुस्लिम देशांमधील सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (यूएई), कतार हे तिघेही पाकिस्तानला कर्ज देण्यास अनुत्सुक आहेत. पाकिस्तानचा एकमेव मित्र देश तुर्कस्तान स्वतःच दिवाळखोर झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी त्राता असणारा एकमेव चीनही कर्ज देण्यास उत्सुक नसल्याचे समजते.

पाकिस्तानला आर्थिक मदतीची निकड दिसते. जगातील त्याच्या मित्रदेशांपासून ते जागतिक आर्थिक संस्थांपर्यंत कोणीही पाकिस्तानला मदतीस धजत नाही. असे सांगण्यात येते की, पाकिस्तानचा एकमेव आधार असणाऱ्या चीनने पाकिस्तानला आर्थिक मदत देण्याआधी पाकिस्तानमध्ये सत्ताबदलाची मागणी केली असल्याचे सांगण्यात येते. पाकिस्तानी पत्रकार ही बाब छातीठोकपणे तेथील माध्यमांमध्ये सांगतात. त्यामुळे चीनकडून आर्थिक मदत हवी असल्यास इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटावे लागेल. ‘बुडत्याला काडीचा आधार’ या म्हणीप्रमाणे पाकिस्तानच्या एस्टॅब्लिशमेंटला इम्रान खान यांना सत्तेमधून हटविण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट दिसते. आता हे काम किती वेगाने आणि कोणत्या पद्धतीने होईल, हे येत्या काही दिवसांत दिसेलच.

चीनने दाखवली जागा

‘बीजिंग ऑलिंपिक्स’च्या उद्घाटन सोहळ्यासाठी इम्रान खान विमान भरून त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन बीजिंगमध्ये पोहोचल्याचे दिसले. पण चीनच्या कम्युनिस्ट सरकारने पाकिस्तानच्या शिष्टमंडळाला त्यांची योग्य जागा दाखवली. बीजिंग विमानतळावर इम्रान खान यांच्या स्वागतासाठी कोणीही राजनैतिक अधिकारी चीनतर्फे उपस्थित नव्हता, असे पाकिस्तानचेच पत्रकार सांगत आहेत. बीजिंगमध्ये गेलेल्या इम्रान खान यांची शी जिनपिंग यांच्याशी भेट झाली तीही दृक्श्राव्य माध्यमातून. यासारखा दुसरा कोणता अपमान असू शकतो? पाकिस्तानचे पत्रकार पुढे जाऊन हेही सांगतात की, दृक्श्राव्य माध्यमातूनच भेटायचे होते तर पाकिस्तानमध्ये बसूनही ही भेट झाली असती. या उद्घाटन सोहळ्यास रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिनही उपस्थित असल्याने इम्रान खान आणि त्यांच्या शिष्टमंडळास चिनी सत्ताधाऱ्यांपासून पुरेपूर दूर ठेवल्याचे दिसते. हे कमी की काय म्हणून पाकिस्तानला परतणाऱ्या या शिष्टमंडळाला विमानतळावर सोडण्यासाठी चीनतर्फे कोणीही मंत्री अथवा राजनैतिक अधिकारी गेला नव्हता. कंगाल पाकिस्तानला त्याची पुरेपूर जागा चीनने दाखवली, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

वाटचाल विभाजनाकडे?

इम्रान खान सरकार एखाद्या निगरगट्ट भिकाऱ्याप्रमाणे असे काही घडलेच नाही, असे पाकिस्तानला परतल्यावर सांगत असल्याचे पाकिस्तानचे पत्रकारच सांगत आहेत. एखाद्या दिवाळखोर देशाची जेव्हा जागतिक बाजारातून विकत घ्यावयाची ऐपत संपते, तेव्हा तो देश जे काही विकता येऊ शकते ते विक्रीला मांडून ठेवू शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात पाकिस्तानी सरकार त्या देशातील कोणत्या गोष्टी चीनकडे गहाण ठेवू शकतो; अथवा यापूर्वीच गहाण ठेवण्यास तयार झालेला आहे हे येत्या काळात जगासमोर येईल.

सुंभ जळाला तरी पीळ जळत नाही, अशी पाकिस्तानच्या नेत्यांची अवस्था आहे. चीनमध्ये ऑलिंपिक्स स्पर्धेच्या उद्घाटनाला जाऊन काश्मीर राग आळवणे हा कार्यक्रमही पाकिस्तानकडून पार पाडण्याचा प्रयत्न झाला. आता पाकिस्तान जागतिक राजकारणात एकटा पडलेला आहे. पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या अण्वस्त्रांच्या धमकीलाही कोणी भीक घालत नाही. पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानात ज्या प्रकारे पाक सैनिकांना मारले जात आहे, ते बघता पाकिस्तानची त्याच्या विभाजनाकडे जोरदार वाटचाल चालू आहे, हे निश्चित. आर्थिक गर्तेतल्या पाकिस्तानला त्यांचा कोणताही नेता बाहेर काढू शकेल, अशी शक्यता नाही. त्यामुळे जो कोणी पाकिस्तानच्या सत्तेवर येईल तो केवळ सत्तेच्या मुकुटाचा नामधारी असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.