हिवाळी ऑलिंपिकचे तापलेले ‘मैदान’

बीजिंग २०२२ या हिवाळी ऑलिंपिकच्या स्पर्धेची तारीख जसजशी जवळ येत आहे, त्यानुसार त्याच्या विरोधातील अनेक देश, त्यामधील खेळाडू, मानवाधिकार संघटना यांच्या स्पर्धेच्या विरोधातील आवाजाला धार चढत असल्याचे दिसून येत आहे.
Briton Agitation
Briton Agitationsakal
Updated on

अनेक कारणांनी बीजिंग- २०२२ ही हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. या वादांची पार्श्वभूमी आणि कारणे यांविषयी...

बीजिंग २०२२ या हिवाळी ऑलिंपिकच्या स्पर्धेची तारीख जसजशी जवळ येत आहे, त्यानुसार त्याच्या विरोधातील अनेक देश, त्यामधील खेळाडू, मानवाधिकार संघटना यांच्या स्पर्धेच्या विरोधातील आवाजाला धार चढत असल्याचे दिसून येत आहे. या बहिष्काराच्या अनुषंगाने अनेक मुद्दे, घटना पुढे आणल्या जात आहेत.

चीनमधील आंतरराष्ट्रीय टेनिस महिला खेळाडूकडून (पेंग शुई) लैंगिक छळाचा टीम लीडरवर (जोंग काव ली) आरोप करण्यात आला. ‘पेंग शुई’ या प्रसिद्ध टेनिस महिला खेळाडूने तिच्या चीनमधील ‘विबो’ या ट्विटरसदृश समाजमाध्यमातील अकाउंटवर या संदर्भात हे आरोप केले होते. चीनमध्ये समाजमाध्यमांवर चीनच्या कम्युनिस्ट सरकारकडून किती बारकाईने लक्ष ठेवले जाते, याची अनेक उदाहरणे समोर येतातच. त्याप्रमाणे ‘पेंग शुई’ने आरोप केलेला मजकूर सरकारकडून ‘विबो’मार्फत काढून टाकल्यानंतर पुढील ३० मिनिटांमध्ये हटविण्यात आला. पण चीनमधील समाजमाध्यमे लगेच त्याचे ‘स्क्रीन शॉट्स’ काढून ठेवतात. ते या बाबतीत हुशार झाल्याने अशा वादग्रस्त पोस्ट समाजमाध्यमांवर झळकू लागल्या. त्यामुळे ही बाब जगासमोर आली. ज्या व्यक्तीवर आरोप झाला, ती व्यक्ती चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्यूरोतील एक वरिष्ठ सभासद असल्याने त्यानंतरच्या काळात ‘पेंग शुई’ अचानक सार्वजनिक जीवनातून दिसेनाशी झाली. ती कोठे गेली याचा पत्ता लागत नव्हता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना, तसेच मार्टिना नवरातिलोव्हा, ख्रिस एव्हर्ट, जोकोविच यांनी जाहीरपणे ‘पेंग शुई’बद्दल चिंता व्यक्त केली.

चीनमधील कम्युनिस्ट सरकारची चलाखी एवढी, की ‘पेंग शुई’ हिचे काही जुने फोटो कम्युनिस्ट पक्षाच्या नियंत्रणातील ‘सी.जी.टी.एन’ या वृत्तसंस्थेतर्फे प्रसिद्ध करून ती सुखरूप असल्याचे समाजमाध्यमांवर जाहीर केले. संयुक्त राष्ट्रांच्या मानव अधिकार समितीने पेंग शुई या खेळाडूच्या ठावठिकाणाची माहिती मागवली असल्याचे जाहीर केले. युरोपियन संघटनेतर्फेही या खेळाडूच्या सुरक्षेबद्दल आणि ठावठिकाण्याबद्दल विचारणा करण्यात आली.

अवयव प्रत्यारोपणाचा धंदा

गेली अनेक वर्षे चीनमध्ये तेथील उघूर मुस्लिमांना सुरक्षित कॅम्पमध्ये डांबून ठेवले जात असल्याचे आरोप अमेरिका आणि युरोपकडून चीनवर वारंवार होत आहेत. या उघूर व्यक्तींचे अवयव काढून त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री केली जात असल्याचा आरोप चीनवर केला जात आहे. या अवयव प्रत्यारोपण व्यवसायात चीनकडून एवढी व्यावसायिकता आणली जात आहे की किडनी, लिव्हर अशा अवयवांच्या उपलब्धतेचे आणि किमतीचे दरपत्रकच काही अमेरिकन पत्रकारांनी डमी गरजूंमार्फत चौकशी करून जाहीर केलेले आहे. अमेरिका आणि युरोपातील गरजूंना सूट होईल अशा पद्धतीने उघूर व्यक्ती शोधली जाते आणि मग पुढील प्रक्रिया सुरू केली जाते, असे सांगतात. अमेरिका आणि युरोपमधून अशा अवयवांच्या गरजूंचा चीनमध्ये लोंढा वाढतच चालला असल्याचे सांगितले जाते. हे सर्व भयानक आहे. चीनमध्ये ‘फालुन गॅंग’ नावाचा तेथील साधकांचा समूह आहे. हे साधकही चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या निशाण्यावर आहेत. या ‘फालुन गँग’च्या व्यक्तींच्या अवयवांना आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त मागणी आहे आणि त्याची किंमतही जास्त असल्याचे सांगितले जाते. याबद्दल अमेरिकेच्या ‘व्हाइट हाउस’च्या वार्तालापात पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला होता.

अमेरिका, युरोपीय महासंघाची भूमिका

बीजिंग ऑलिंपिक्सच्या स्पर्धेतील सहभागाबाबत अमेरिकेतील ज्यो बायडन सरकारने जी बोटचेपी भूमिका घेतलेली आहे, त्यानुसार अमेरिकी खेळाडू स्पर्धेत भाग घेतील; पण बायडेन सरकारमधील कोणीही राजकीय व्यक्ती अथवा अधिकारी या स्पर्धेला जाणार नाहीत. या भूमिकेला जे गोंडस नाव अमेरिका सरकारने दिले आहे आणि त्याला ‘डिप्लोमॅटिक बहिष्कार’ असल्याचे संबोधन केले आहे ते सूचक आहे. ‘जीत भी मेरी और पट भी मेरी’ अशी ही भूमिका आहे. वर बायडेन यांची मखलाशी अशी, की चीनने कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे मान्य केले आहे, हे सारखे उद्धृत करणे. त्यामुळे चीनच्या बाकीच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करावे असे तर बायडेन सुचवीत नाहीत ना? युरोपियन महासंघाचाही मिळमिळीत भूमिका घेण्याकडे कल दिसतो.

अमेरिकेतील ‘कँटर’ या बोस्टनमधील प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडूने जाहीरपणे चीनच्या शी जिनपिंग यांच्यावर टीका आणि आरोप केले आहेत. त्याच्या याबद्दलच्या चीनविरोधी भूमिका आणि त्या संदर्भातील ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. त्याने तिबेट, तैवान, हाँगकाँगमध्ये चीनकडून जी काही दडपशाही चाललेली आहे आणि उघूर मुस्लिमांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबाबत चीनवर जोरदार टीका केली आहे. ह्या खेळाडूने तो वापरात असलेल्या ‘शुज’वर मोठ्या अक्षरात ‘फ्री तिबेट’, नो बीजिंग ऑलिंपिक्स -२०२२’ असा लक्षवेधी मजकूर लिहिलेला आहे. बास्केटबॉल हा चीनमध्येही लोकप्रिय खेळ असल्याचे सांगितले जाते. यामुळे चीनमधील कम्युनिस्ट सरकारकडून ‘कँटर’ या खेळाडूंबाबत काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

अमेरिकेत चीनची दहशत?

अमेरिकेत अनेक क्षेत्रातील व्यक्तींनी चीनचा धसका कशा पद्धतीने घेतला आहे, ते बघावयाचे असेल तर ‘डब्लू डब्लू एफ’ या प्रसिद्ध रेसलिंग स्पर्धेतील ‘जानसेना’ या प्रसिद्ध खेळाडूची समाजमाध्यमांवरील ध्वनिचित्रफीत जरूर पाहावी. त्याने काही महिन्यांपूर्वी चीनवर तिबेटप्रश्नी नुसती टीका केली नव्हती, तर चीनची खिल्लीही उडविण्याचा प्रयत्न केला होता. नंतर त्याला काय उपरती झाली माहिती नाही; पण त्याने जाहीरपणे चीनची माफी मागितली होती. ज्या पद्धतीने त्याने ही माफी मागितली, ती ज्याला उत्सुकता असेल त्यांनी `यु.ट्यूब’वर जाऊन हा माफीचा व्हिडीओ जरूर पाहावा. अमेरिकेतील करमणूक क्षेत्र, चित्रपट क्षेत्र आणि इतर अनेक क्षेत्रांत चीनची मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळे चीनने जर ठरविले तर ‘जानसेना’ला कायमचे बेरोजगार केले जाईल, या भीतीतून त्याने ही माफी मागितली असावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.