विश्‍लेषण : उद्योगच उघडतील ‘समृद्धी’चे दार

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर-शिर्डी टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याने विदर्भ-मराठवाड्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
Samruddhi-Highway
Samruddhi-Highwaysakal
Updated on
Summary

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर-शिर्डी टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याने विदर्भ-मराठवाड्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर-शिर्डी टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याने विदर्भ-मराठवाड्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राज्यातील ‘मागास भाग’ हा शिक्का पुसण्याची ही संधी आहे, असे आता वाटू लागले आहे. हा महामार्ग ज्या गतीने साकारला गेला तीच गती या भागाच्या आर्थिक विकासासाठी दाखविली गेली तर या भागाची भरभराट दूर नाही. महाराष्ट्रात सध्या मुंबई, पुणे आणि नाशिक असा विकासाचा सुवर्ण त्रिकोण तयार झाला आहे. त्या तुलनेत उर्वरित महाराष्ट्र अविकसित किंवा काही ठिकाणी अगदी भकास राहिला आहे. राजधानी मुंबईपासून दूर असलेले विदर्भ आणि मराठवाडा हे प्रांत तर विकासापासून कोसो मैल दूर आहेत. कायम मागास भाग म्हणून विदर्भ-मराठवाडा टापूला हिणवले जाते. परंतु त्यांची ही अवस्था का आहे याचा विचार होत नाही. आता विकासाच्या वाटेवरील अडथळे दूर कण्याची गरज आहे. समृद्धी महामार्गात ती कोंडी फोडण्याची क्षमता आहे. मात्र, विकासाची गंगा खऱ्या अर्थाने विदर्भ-मराठवाड्यात न्यायची असेल तर येथे चांगले उद्योग यायला हवेत. उद्योग उभे झाले तर विकासाची फळे चाखायला मिळतील, यात शंका नाही.

‘समृद्धी’तील शक्ती

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भाच्या विकासाला दिशा देण्याचे काम करीत आहेत. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचे विकेंद्रीकरण करून सर्व भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असतानाच समृद्धी महामार्ग योजला होता. तो आता साकार झाला आहे. नागपूर आणि मुंबई या महानगरांना अवघ्या आठ तासांत जोडणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग हा नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांतून जाणार आहे. सगळी कामे पूर्ण झाल्यानंतर इंटरचेंजच्या माध्यमातून आणखी १४ जिल्हे या महामार्गाशी जोडले गेले आहेत. थेटपणे २६ तालुक्यांतील ३९२ गावे या महामार्गाला जोडली जाणार आहेत. त्यामुळे राज्याच्या निम्म्याहून अधिक भागाशी कनेक्ट वाढणार आहे.

एकूण ७०१ किलोमीटरच्या या द्रुतगती महामार्गापैकी नागपूर-शिर्डी या ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले आहे. समृद्धी द्रुतगती महामार्गालगत कृषी मालावर प्रक्रिया करण्याच्या उद्देशाने १८ कृषी नगरे वसवली जाणार आहेत. त्यामुळे कृषी अर्थव्यवस्थेला ‘अच्छे दिन’ येऊ शकतील. शिवाय द्रुतगतीमुळे औद्योगिकीकरण, पर्यटन, शेतमालासह इतर प्रकारची वाहतूक अशा अन्य उद्योगांच्या माध्यमातून विकासालाही चालना मिळेल. महामार्गामुळे वेळ आणि इंधनाची बचत होणार असल्याने विकासाची गंगा व्यापक होईल. समृद्धी द्रुतगती महामार्गामुळे अनेक पर्यटनस्थळे एकमेकांना जोडली जातील. परिणामी पर्यटनाच्या व्यवसायाला बहराचे दिवस येऊ शकतात. त्यामुळे समृद्धी द्रुतगती महामार्ग हा ‘गेम चेंजर’ ठरू शकतो.

उद्योगांना प्रोत्साहन द्यावे

पायाभूत सुविधा झाल्यामुळे विकास होणार असे स्वप्न रंगवत असतानाच उद्योगस्नेही वातावरण विकसित करणेही गरजेचे आहे. त्यासाठी पूरक, कौशल्यसंपन्न मनुष्यबळ, गुणवत्तापूर्ण नागरी सुविधा, करमणुकीपासून ते वैद्यकीयपर्यंत दर्जेदार सुविधा यांचीही निर्मिती केली पाहिजे. असे झाल्यास विकासाला कोणीही रोखू शकणार नाही. महाराष्ट्र आणि विशेषतः विदर्भातून अलीकडे काही उद्योग गुजरातेत गेल्याने मोठे वादळ निर्माण झाले होते. विदर्भातील महत्त्वाकांक्षी असलेल्या मिहान प्रकल्पातूनही उद्योग पळविले गेले. मात्र, समृद्धी द्रुतगती महामार्ग हा गेम चेंजर ठरू शकतो. शिवाय कृषी आधारित उद्योग या परिसरात भविष्यात उभे राहिल्यास विकासाची गंगा अवतरेल.

आज विदर्भ-मराठवाड्यातील उद्योजकांना महागड्या विजेचा प्रश्न सतावत आहे. विदर्भात खनिज संपत्ती भरपूर आहे. पण, वीज महाग असल्याने येथील उद्योग शेजारील राज्यात जात आहेत. विदर्भातील खनिज संपत्ती वापरून इतरत्र उद्योग बहरताना दिसत आहेत. वीज सवलत बंद झाली आहे. ती पूर्ववत सुरू होणे गरजेचे आहे. शिवाय उद्योगांसाठी अन्य प्रोत्साहनपर सुविधा देण्यासाठी राज्य सरकारच्या अर्थ आणि उद्योग मंत्रालयाने पुढाकार घेतला पाहिजे. विदर्भातील टेक्सटाईल पार्क, बियाणे क्लस्टर्स यांसह अनेक प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी प्रयत्नांची गरज आहे. सिंचन प्रकल्पांनाही गती मिळणे तेवढेच महत्त्वाचे आहे. एकूण काय तर कृषी प्रक्रिया उद्योग आणि अन्य उद्योग या भागात यायचे असतील तर त्यांना सुविधा देण्याची आवश्‍यकता आहे. या सगळ्यासाठी तातडीने कालबद्ध पावले उचलली पाहिजेत. तसे झाले तर या भागाच्या विकासाचे गणित सोडवले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.