हौस ऑफ बांबू : बच्चनगुर्जींचा पिरेड...!

नअस्कार! मुलांनो, तुम्हाला मराठी कथा, कादंबऱ्या, कविता आवडतात की नाही? छान छान कथा वाचाव्यात. कादंबऱ्यांची पारायणं करावीत. कविता तोंडपाठ करुन टाकाव्यात.
Hous of Bamboo
Hous of Bamboosakal
Updated on

नअस्कार! मुलांनो, तुम्हाला मराठी कथा, कादंबऱ्या, कविता आवडतात की नाही? छान छान कथा वाचाव्यात. कादंबऱ्यांची पारायणं करावीत. कविता तोंडपाठ करुन टाकाव्यात. खूप मजा येते की नाही? रोज उठून वाचन करावं. नुसतं वाचन काहीच उपयोगाचं नाही हं! महावाचन करावं. तुम्हाला वाचनाची... सॉरी...महावाचनाची गोडी लागावी म्हणून आपल्या लाडक्या सरकारनं किनई, एक चंमतग केली आहे.

येत्या आठवड्यात महावाचन महोत्सव शाळाशाळांतून आणि कालेजांमधून भरवला जाणार आहे. वाचन कसं करावं, कुठली मराठी पुस्तकं वाचावीत, कशी वाचावीत, याचे धडे द्यायला सुप्रसिद्ध मराठीचे मास्तर श्रीमान बच्चनगुर्जी येणार आहेत. ते मराठीचे पापड आहेत हं!! अस्सं फाडफाड मराठी शिकवतात की बस्स.

मागे एकदा मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहून त्यांनी ‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे अभिमानगीत घडाघडा म्हणून दाखवलं होतं. लोकांच्या टाळ्या थांबेनात! मराठी वाचकांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून बच्चनगुर्जींनी सिनेमाच्या माध्यमातून मराठी मातीशी आपलं नातं घट्ट केलं. अन्यथा, इतकं अस्खलित मराठीत कोण बोलतं का?

‘सरकार’ चित्रपटातही त्यांनी मराठी माफिया डॉनची भूमिका साकारताना ‘काय झालं?’ हा डायलॉग अस्सा काही म्हटला होता की यंव रे यंव...ऐकूनच व्हिलनला काय व्हायचं ते (जागच्या जागी) झालं म्हणे!! मुलांनो, तुम्हीही खर्जात ‘काय झालं?’ असं म्हणून बघा, अंगावर काटा येतो, काटा! बच्चनगुर्जी तसे खूप प्रेमळ आहेत. पण असे रागावले की दहा-पंधरा जणांना एकटे बास आहेत. (संदर्भासाठी पहा : जंजीर, दीवार, शोले, डॉन.) असो.

मराठी भाषा विभागातर्फे २२ जुलै ते ३१ ऑगस्ट या काळात ‘महावाचन महोत्सव’ होणार आहे. महाराष्ट्रात वाचनसंस्कृती रुजावी, यासाठी आजवर कुणी प्रयत्नच केले नव्हते. काही साहित्यिकांनी नेमके उलटे प्रयत्न केल्याने वाचन संस्कृती विलयाला जाऊ लागली. आता चिंता नाही. महावाचन उपक्रमाचे ब्रँड अम्बॅसेडर (मुलांनो, हा मराठीच शब्द आहे, म्हणून आवर्जून वापरला.) मराठीत सदिच्छादूत असा शब्द आहे. पण हा शब्द उच्चारताना ओठांची हालचाल फार विचित्र होते. मनुष्य शिवी देत आहे, असं वाटतं. म्हणून ब्रँड अम्बॅसेडर हे विशेषणच बरं वाटतं.

आनंदाची बाब म्हणजे मराठी भाषेवर खूप प्रेम असलेल्या श्रीयुत अमिताभराव बच्चनसाहेबांनी स्वत: आपल्या नेमणुकीला मान्यता दिली. शाळा-कॉलेजांमधून ते विद्यार्थ्यांशी ऑनलाइन जोडले जाणार असून ‘मराठी की बात’ सांगणार आहेत. पुस्तक कसं वाचावं? का वाचावं? कुठे वाचावं? कधी वाचावं? वाचल्यानं काय होतं? हे सगळं ते तुम्हाला समजावून सांगतील. मग तुम्हाला वाचनाचं महत्त्व लग्गेच पटेल. आपण आधीच का बुवा वाचनाला लागलो नाही, या भावनेनं तुम्हाला पश्चात्ताप होईल. आहे की नाही चंमतग?

मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा, त्यांना भाषेचा कौशल्यपूर्ण वापर करता यावा, मराठी संस्कृतीशी त्यांची नाळ टिकून राहावी, यासाठी हा महावाचन उत्सव आयोजित करण्यात आला आहे. तिसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या उत्सवात हिरीरीनं सहभागी व्हायचं आहे. हिरीरीनं म्हणजे मुलांनो, उत्साहानं बरं का!! ही हिरीरी वाढावी, यासाठीच बच्चनगुर्जींची निवड करण्यात आली आहे.

एक महत्त्वाची सूचना : बच्चनगुर्जींचा क्लास झाला की मुलांनी, पुस्तकासाठी मारामाऱ्या करु नयेत. ‘पुस्तकांवर वाचकांच्या उड्या पडल्या’ हा फक्त एक वाक्प्रचार आहे. प्रत्यक्षात कधीही पुस्तकांवर कोणीही उड्या मारीत नाही! पुस्तक मिळवण्यासाठी कुठेही घुसून फायटिंग केल्यास दंड आकारण्यात येईल!! कळलं का मुलांनो?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com