नअस्कार! गेल्या मराठी भाषा गौरवदिनाला म.सा.प.च्या माधवराव पटवर्धन सभागृहात ‘अक्षरधन’ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला. पण प्रमुख आणि काहीच्या काही ठळक उपस्थिती होती ती प्रा. मिलिंद मालशे यांची. निळाशार आकाशी-कम-समुद्री रंगाचा कुर्ता परिधान करुन भाषणाला उभ्या असलेल्या मालशेसरांनी आल्याआल्याच सांगितलं की, मी काहीच तयारी करुन आलेलो नाही!
इथं येऊन आपल्याला ‘अहिर भैरव’ ऐकवायचा आहे, असं तर मालशेसरांना वाटलं नसावं अं? तेवढ्यात मालशेसरांनी दुसरी घोषणा केली ती अधिक गंभीर स्वरुपाची होती. ते म्हणाले की, मी काल रात्रभर झोपलेलो नाही!!
अर्थात मालशेसरांनी जे काही विचारधन आम्हा श्रोत्यांच्या कानात ओतलं ते केवळ मनोज्ञ होतं. बोलीभाषांचं व्याकरण आपण समजूनच घेऊ शकलेलो नाही, मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी जे काही करावं लागतं, त्याच्या जवळपासही आपण पोहोचलेलो नाही. लिप्यंतर म्हणजे भाषांतर नव्हे, हे सरकारला कोण सांगणार? असे कितीतरी गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
‘अक्षरधन’ हे ‘मसाप’चं नियतकालिक. १९१३ सालापासून ते सुरु आहे.
‘...सांप्रत महाराष्ट्र भाषेचा परिपोष निरनिराळ्या तऱ्हेने होत आहे. तरी खास साहित्य या विषयाकडे जावे तितके लक्ष गेलेले दिसत नाही... साहित्याकरिता वाहिलेले असे एखादे पत्र निघण्याचा आता काळ आला आहे व त्याची आवश्यकता भासू लागली आहे,’’ असं पहिल्या अंकाच्या संपादकीयात विमो महाजनी यांनी नमूद केलं होतं. तिथून सुरु झालेला हा प्रवास आज हजार पानी मंथनग्रंथापर्यंत पोचला. डॉ. निलिमा गुंडी यांनी संपादित केलेला हा ग्रंथ म्हणजे मराठी भाषेचा अनमोल ठेवा आहे.
या ग्रंथात भाषा, व्याकरण, छंदशास्त्र, व्यक्तिवेध, साहित्यविश्वातील चळवळी, प्रवाह, वाद, प्रदीर्घ परीक्षणं, मुलाखती, संशोधनं, परभाषेतील कलाकृतींची दखल घेणारे लेख असं विविधांगी लेखन यात समाविष्ट आहे. राभि जोशी, श्रीना बनहट्टी, विवा शिरवाडकर, भालचंद्र नेमाडे, डॉ. गंना जोगळेकर, शंगो तुळपुळे, गंबा सरदार, धर्मानंद कोसंबी, मंवि राजाध्यक्ष, दिके बेडेकर, नासी फडके, पुल देशपांडे, श्रीकेक्षी, मद हातकणंगलेकर, दश्री बापट यांचे लेख या ग्रंथाची श्रीमंती वाढविणारे आहेत.
एकूण मामला भरगच्च आहे. लेखिका डॉ. नलिनी गुजराथी आणि उद्योजक मोहन गुजराथी यांनी अर्थसाह्य पुरवल्यामुळे हा ग्रंथ साकार झाला.
जानेवारी १९३४ च्या महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या अंकात दत्तोवामनांनी ‘रद्दीतील रत्ने’ हा लेख लिहिला होता. त्यात ते म्हणतात : ‘एकाअर्थी जशी जुनी वस्त्रे आपण टाकतो, तशीच ही पत्रे-मासिके-पुस्तकेसुद्धा आपल्या विचार-व्यापाराची वस्त्रेच होत... जुनी, जीर्ण, फाटकी अतएव निरुपयोगी वस्त्रे टाकावी हे ठीक, परंतु पागोटे फाटले म्हणून टाकले तरी कडेचा ‘जर’ सहजच दीर्घायुषी असतो; तो फेकून देणे लाभाचे नाही... मग त्याच हिशेबाने जुन्या वर्तमानपत्री किंवा मासिकी किंवा पुस्तकी लिखाणातील जो सत्वांश आपल्या प्रगतीला कारण होत असतो, तेव्हढा जगवायलाच हवा.’
‘अक्षरधन’ हा ग्रंथ सिद्ध करताना द. वा. पोतदारांचाच हा विचार महाराष्ट्र साहित्य परिषदेने समोर ठेवला आहे, असं वाटलं. पण कसलं काय!
प्रकाशनसोहळ्यात उपस्थितांच्या हातात दिसलेला ग्रंथ तेवढाच. नंतर त्याचा पत्ता नाही. (फुकटही नाही नि विकतही नाही!) ‘अहो, ग्रंथ केवढ्याला आहे? कुठे मिळेल?’ म्हणून चौकशी केली तर ‘संध्याकाळी सात नंतर ‘मसाप’च्या लँडलाइनवर फोन करा’ असं पुणेरी उत्तर मिळालं! ‘अक्षरधारा’च्या राठिवडेकरांना विचारलं तर त्यांनीही खांदे उडवून दुसऱ्या गिऱ्हाईकाकडे मोर्चा वळवलान! आता या अक्षरधनावरचा नागोबा कुठून हुडकायचा बरं?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.