हौस ऑफ बांबू : कादंब्री कशी गाजवावी?

नअस्कार! अमळनेरच्या साहित्य संमेलनाच्या नवनिर्वाचित अध्यक्षांबद्दल, म्हणजेच रा. रवींद्र शोभणे यांच्याबद्दल आम्ही काही यापुढे बोलणार नाही...
hous of bamboo
hous of bamboosakal
Updated on

नअस्कार! अमळनेरच्या साहित्य संमेलनाच्या नवनिर्वाचित अध्यक्षांबद्दल, म्हणजेच रा. रवींद्र शोभणे यांच्याबद्दल आम्ही काही यापुढे बोलणार नाही... त्यांच्यावर एकवेळ बोलू; पण रा. प्रवीण दवणे यांच्याबद्दल तर अजिबात बोलणार नाही. ते उगीच रागावतात. दुखावतात. चिडतात. कुढतात. रा. शोभणे यांचा गेल्याच आठवड्यात पुण्यात ‘मसाप’तर्फे सत्कार झाला.

पुण्यात असूनही सत्कार हृद्य झाला, हे आश्चर्य! पण त्याच कार्यक्रमात खरं भाषण गाजलं ते गुरुवर्य रा. रावसाहेब कसबे यांचं. त्यांनी संधी साधून त्यांचे जुने ‘गनिम’ रा. भालचंद्र नेमाडेजींना ‘आडे हाथों’ घेऊन लढाई अजून संपलेली नाही, याची जणू जाणीव मराठी वाचकांना करुन दिली. नेमाडेजींची ‘हिंदू- पार्ट टू’ पुरी होत आली असणार, असा संशय मला आहे.

गुरुवर्य कसबे यांचं रा. नेमाडेजींशी किती ‘मेतकूट’ आहे, हे उभा महाराष्ट्र जाणतो. प्रा. नेमाडेजींना ‘ज्ञानपीठ’ मिळालं, तेव्हाही गुरुवर्य कसबे यांनी त्यांच्या निसरड्या तात्त्विक भूमिकेवर आसूड ओढले होते. त्यांच्या विचारांमधल्या भेगा- ढेकळं वगैरे दाखवली होती. युद्धाला तोंड फुटलं ते ‘कोसला’ आल्यानंतरच. खरं तर प्रा. नेमाडे यांच्याबद्दल माझ्या मनात अतीव आदर आहे.

‘कोसला’ वाचून अनेकदा भावनाप्रधान होत मी पलंगावर पुन्हा पुन्हा पडून पाहिलं होतं, असं आठवतंय. बिढार, जरीला, झूल, हूल, हिंदू, देखणी, टीकास्वयंवर असं सगळं वाचून ठेवलंय. त्यामुळे साहित्यविषयक कार्यक्रमाच्या मांडवात वावरणं सोप्पं जातं. रा. नेमाडेजींच्या साहित्यावर चर्चा करणं, आणि अमूर्त चित्रकला प्रदर्शनात वारुणीचा चषक हातात धरुन बोलत राहाणं, हे साधारण एका जातकुळीचं आहे, असं मला वाटतं. असो.

...पण त्यामुळेच गुरुवर्य कसबेंनी त्यांचे जाहीर वाभाडे काढल्याचे भारी क्लेश मनाला झाले होते. पण तेव्हा नेमाडेविरोधकांनीही जोर धरला होता. ‘लेखकाचा लेखकराव झाला की तो संपतो’ असं म्हणणारे रा. नेमाडेजी स्वत:च सटासट पुरस्कार घ्यायला लागल्यानं विरोधकांचं फाफा फावलं.

त्यात ‘ज्ञानपीठ’ वगैरे मिळाल्यानंतर रा. नेमाडे नोबेल पुरस्कारासाठी खटपटी करत आहेत, अशी कुजबूज आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु झाल्यानं प्रकरण चिघळलं. तुंबळ धुमश्चक्री जाहली. या लढाईत पितामह रा. कसबे आघाडीवर होते. त्यांच्या तुफानी हल्ल्यांमुळेच आजवर नेमाडेजींचं ‘नोबेल’ अनेकदा हुकलंय, याची कोणाला जाणीव आहे का?

गेल्या आठवड्यात शोभणे-सत्कारात तेच घडलं. ‘‘कोसला म्हणजे गर्भपाऽऽत’’ हे गुरुवर्य कसबे यांचे उद्गार ऐकून मी प्राणांतिक दचकले! त्यांच्या मते कोसला ही एक चांगली कादंबरी आहे. पण बरीचशी ‘गंडली’ आहे! त्यातलं मृत्यूबाबतचं चिंतन (कोवळ्या वयात लिहिल्यामुळे) अप्रगल्भ आहे. ( अर्थ : ‘कोसला’कारांच्या मिश्या तेव्हा इतक्या भरघोस उगवल्याच नव्हत्या.) सुरवातीला कादंबरी चांगली खपली नाही.

मग प्रा. नेमाडे यांनी काही निवडक प्राध्यापकांना हाताशी धरुन कादंबरी गाजवली. पुढे ही ट्रिक त्यांना अचूक साधली. ‘हिंदू’ च्या वेळीही प्रकाशकाला हाताशी धरुन रा. नेमाडेजींनी जबरदस्त प्रमोशन केलं होतं असं बोललं गेलं. हल्ल्यावर हल्ले!!

प्रा. नेमाडेजींनी आपल्या कादंब्रीचं मार्केटिंग व्यवस्थित केलं असेल, तर असू दे! त्यात प्रॉब्लेम काय आहे? हल्लीच्या युगात कोण करत नाही मार्केटिंग?

उलटपक्षी, उदाहरणार्थ, ‘कादंब्री कशी गाजवावी?’ याचे कोचिंग क्लासेस नेमाडेसरांनी सुरु करावेत, आणि मराठी साहित्यिकांना ‘शहाणे’ करुन सोडावे वगैरे. मराठी साहित्यिकांना साहित्य पिकवता येतं, पण विकता येत नाही, हे खरंच आहे. यांनी कादंब्र्या लिहायच्या, आणि विकायच्याही. हे म्हंजे थोरच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()