हौस ऑफ बांबू : सच का सामना!

नअस्कार! जे काही बोलेन ते सत्य बोलेन, सत्याशिवाय काहीही बोलणार नाही. ज्जा! मराठी साहित्यिक सत्याला भिडत नाहीत, हे एक कालातीत सत्य आहे, आणि सत्य हे नेहमी कटू असतं.
Hous of Bamboo
Hous of BambooSakal
Updated on

नअस्कार! जे काही बोलेन ते सत्य बोलेन, सत्याशिवाय काहीही बोलणार नाही. ज्जा! मराठी साहित्यिक सत्याला भिडत नाहीत, हे एक कालातीत सत्य आहे, आणि सत्य हे नेहमी कटू असतं, आणि आमचे परममित्र रा. रवींद्र शोभणे यांनी ते सत्य पुण्यात स्पष्टपणे बोलून दाखवलं, तेही महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सत्कार समारंभात! त्यांचं अभिनंदन!!

ही सत्यनिष्ठा समस्त मराठी साहित्यिकांनी अंगी बाणवावी. समाजातल्या अनेक घटनांचं चित्रण मराठी साहित्यात झालं नसल्याची खंत शोभणेसरांनी व्यक्त केली. उदा. आणिबाणी! (या विषयावर त्यांनीच भरपूर लिहिलं, पण बाकीचे गप्प बसले.) दुष्काळावरही फारशी अक्षरं उमटली नाहीत. असं का झालं? तर मराठी साहित्यिक निधडेपणानं सत्याला सामोरं जात नाहीत म्हणून!

मराठी साहित्यिकांचा हा नेहमीच प्रॉब्लेम राहिलेला आहे. सत्याचा सामना कसा करावा, हेच त्यांना कळत नाही. अपवाद रा. शोभणे यांचा! या आरोपातून त्यांना बाइज्जत बरी करायला हवं. कारण अकरा कादंबऱ्या भरुन त्यांनी आजवर सत्याचा सामना केला आहे. बाकीच्यांना ते धड जमलं नाही. का? तर तो निधडेपणाचा अभाव.

आता हा निधडेपणा मराठी लेखकांनी कुठून आणावा बरं? एखादा लेखक फारच निधडेपणा करु लागला की प्रकाशक मंडळी त्याला परखड ‘सत्या’ची जाणीव करुन देतात. लेखक जसा निधड्या छातीचा हवा, तसा प्रकाशकही छप्पन इंची छातीचा हवा ना? जाऊ दे...पण मी मात्र आजपासून सत्याचा सामना करायचं ठरवलं आहे. काय वाट्टेल ते होवो!!

परवा मसाप (पुणे) तर्फे रा. शोभणे यांचा सत्कार माधवराव पटवर्धन सभागृहात झाला. (मी तिथे असतेच! मी सत्याला घाबरत नाही!!) तिथं सत्काराला उत्तर देताना शोभणेसरांनी सत्याची कास धरली. अध्यक्षमहोदय रा. रावसाहेब कसबे यांनी आम्ही संमेलनाध्यक्षांची निवडणूक इडीच्या तडाख्यातून मोकळी केली, असे सार्थ अभिमानानं सांगितलं.

पण त्याच सोहळ्यात मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी आणखी एक सत्य समोर धरलं! (हे जोशीमहोदय खिशात नेहमी पॉकेटसाइज आरसा घेऊन हिंडतात, आणि आल्या गेल्या साहित्यिकाला दाखवतात!! असो.) त्यांचं म्हणणं असं की, पूर्वी साहित्य संमेलनाध्यक्षासाठी निवडणूक व्हायची. त्यात नियम-बदल करुन सन्मानपूर्वक अध्यक्षाची निवड करण्याचा राजमार्ग निवडला गेला. तेव्हा सगळ्याच साहित्यिकांनी स्वागत केलं. सन्मानपूर्वक निवड केव्हाही स्वागतार्हच! पण त्यामुळं आता भलतंच सत्य आ वासून उभं राहिलं आहे.

अनेक असंतुष्ट साहित्यिक ‘पुन्हा निवडणुकाच घ्या बुवा! निवडीत काही मजा नाही,’ अशी कुरकुर करु लागले आहेत. निवडीचे निकष बघितले तर आपल्याला या जन्मी तरी चान्स नाही, असं त्यांना वाटत असणार. त्यामुळे लोकशाही पद्धतीनंच संमेलनाध्यक्ष निवडला जावा, अशी त्यांची मखलाशीपूर्ण मागणी आहे. -पण हे झालं अर्धसत्य! पुढलं उरलेलं अर्धसत्य आणखी डेंजरस आहे.

पुढे ऐका : संमेलनाध्यक्षाची निवड होऊ लागल्यापासून अनेक उत्साही साहित्यिक चक्क लॉबिंग करु लागले आहेत, लॉबिंग! वर्षभर हा प्रकार चालू असतो म्हणे!! हे भलतंच!! मराठी साहित्याच्या क्षेत्रात हे असलं काही सुरु असेल तर रा. शोभणेसरांना आपलं मत बदलावं लागेल.

कारण याचा अर्थ मराठी साहित्यिक ‘सच्चाई का सामना’ कसा करायचा, हे शिकू लागले आहेत, असा होत नाही का? निवडणूक हेदेखील एक सत्य होतं, आणि निवड हेदेखील एक सत्यच आहे. या दोन्ही सत्यातून कुठलं तरी एक सत्य निवडणं मराठी साहित्यिकांना भाग आहे. तिसरं सत्य कुणी सांगेल का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.