आदरणीय अण्णासाहेबांना महाराष्ट्रात कोण ओळखत नाही? ज्यांच्या आगमनाप्रसंगी साक्षात दिल्लीश्वर उठून उभे राहतात (आणि निघून जातात) अशा अण्णासाहेबांचा संपूर्ण महाराष्ट्रात दबदबा आहे. लोकसेवेसाठी अण्णासाहेबांनी संपूर्ण आयुष्य वेचले. गांधीजींच्या एक भाषणामुळे ते थरारुन गेले, आणि ब्रिटिशांविरुध्द त्यांनी प्रखर लढा उभारला, असे इयत्ता क्रमिक पुस्तकातील धड्यात नमूद करण्यात आले आहे.
पुढे स्वातंत्र्य मिळाल्यावर आ. अण्णासाहेबांना पं. नेहरुंनी अक्षरश: गळ घालून मंत्रिमंडळात येण्याचा आग्रह केला. पण सत्तेच्या खुर्चीचा आ. अण्णासाहेबांना प्रचंड तिटकारा. त्यांनी पंडितजींना बाणेदारपणाने उत्तर दिले की, ‘जोवर माझा गरीब भारतीय बांधव पायात चपला घालत नाही, तोवर मी सत्ता उपभोगणार नाही.’