ढिंग टांग
सांप्रतकाळी महाराष्ट्रदेशी इलेक्शनांचा काळ आहे. महाआघाड्या, महायुत्या, आणि इतर अनेक पक्ष आणि चिक्कार अपक्ष मिळून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदारांना आपल्याकडे ओढण्याची अहमहमिका लागली आहे. त्यासाठी आश्वासनांची खैरात सुरु आहे. महाआघाडीने पंचसूत्री आणून महायुतीची गोची केली असून महायुतीने दशसूत्री आणून महाआघाडीची पंचाईत केली आहे. या पंचसूत्री, दशसूत्री, पंचदशसूत्री अशा पांचाच्या पाढ्यामुळे मतदारांची मात्र पांचावर धारण बसली आहे.