ढिंग टांग : बांधा, वापरा, हस्तांतरित करा..!

एखादा पक्ष अथवा व्यक्ती हेरुन, मग घेरुन त्यास कुठल्याही मार्गाने ‘बांधायचे’, मग वापरायचे आणि काम झाले की हस्तांतरित करायचे, असा कमळेचा खाक्या असल्याचा आरोप सर्वत्र होत आहे.
Dhing Tang
Dhing Tangsakal
Updated on

देशभरात विकासाची प्रचंड कामे उभी राहात असून महाराष्ट्रात तर विकासाचा अतिरेक सुरु आहे. जावे तेथे विकास, आणि पाहावे तेथे कामे!! बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा ऊर्फ बीओटी तत्त्वावर बरीचशी विकासकामे चालू आहेत. राजकारणातही हेच तत्त्व अवलंबिले जाते. या तत्त्वाची काटेकोर अंमलबजावणी करुनच कमळाने जागोजाग आपली फत्ताडी पाने पसरली, असे बोलले जाते.

एखादा पक्ष अथवा व्यक्ती हेरुन, मग घेरुन त्यास कुठल्याही मार्गाने ‘बांधायचे’, मग वापरायचे आणि काम झाले की हस्तांतरित करायचे, असा कमळेचा खाक्या असल्याचा आरोप सर्वत्र होत आहे. त्यात तथ्य आहे की नाही, याचा शोध घेण्याचे आम्ही ठरवले. त्याखातर महायुतीतील तिन्ही प्रमुख नेत्यांचे मन जाणून घेतले. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांची प्रामाणिक मते (न छापण्याच्या अटीवर) कळवली. तरीही वाचकांसाठी आम्ही थोडी कल्पनेची भर घालून ती छापण्याचे धाडस करीत आहो.

दादासाहेब : बीओटी तत्त्वावर विकासकामं सगळीकडेच होतात. त्यात नवीन असं काहीही नाही. किंबहुना राजकारणातच या तत्त्वाचा सर्वात आधी जन्म झाला, मग ही पद्धत इतर क्षेत्रात रुढ झाली, असं म्हटलं तर वावगं होणार नाही. एखादा सोयीचा नेता आपल्या बाजूला ओढून काम झालं की हस्तांतरित करण्याची पद्धत लोकशाहीला धरुनच आहे.

तो अधिकार लोकशाहीनं सगळ्याच पक्षांना दिला आहे. शेवटी सगळीच विकासकामं लोकाग्रहास्तव होत असतात. माझं विचाराल, तर माझं उलटं झालं. आधी हस्तांतर झालं, मग बांधकाम चालू झालं. वापर होणार की नाही, हे निवडणुकीनंतरच कळेल. सध्या आमचं लक्ष जागावाटपाकडे आहे. जागावाटपातच आमची जागा समजेल, असं वाटतं. वापराचं हल्ली काही वाटेनासं झालं आहे!

भाईसाहेब : अडीच वर्षापूर्वी आम्ही जो उठाव केला, ते शेवटच्या टप्प्यातलं विकास बांधकामच होतं. त्याचं भूमिपूजन आधीच झालं होतं. उठावानंतर यथावकाश लोकार्पण झालं. कुठलाही प्रकल्प वेगात पूर्ण करुन त्याचं लोकार्पण करणे हे पंतप्रधान मोदीजींचं वैशिष्ट्यच आहे. आमचंही झालं!! हस्तांतराला मात्र काही काळ जावा लागतो.

उदाहरणार्थ, काही हायवे बांधून बरीच वर्ष गेली तरी टोलनाके चालूच राहतात. हस्तांतराचं कोणी नावही काढत नाही. आमचंही तसंच होणार, अशी आशा आहे. ‘आम्ही बांधा, वापरा हस्तांतरित करा’ ऊर्फ बीओटी तत्त्वावर काम करत नाही. ‘बांधा, मालक व्हा, वापरा आणि वाटलं तर हस्तांतरित करा’ ऊर्फ बीओओटी (बूट) या तत्त्वावर काम करतो. बघू!!

नानासाहेब : मुळात आमच्या पक्षावरचा हा आरोपच अर्धवट माहितीवर आधारित आहे. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वाच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. याची सुरवात आमच्या कार्यकाळात झालेलीच नाही. १९७९मध्ये हाँगकाँगमध्ये अशा प्रकारे एक हॉटेल उभारण्यात आलं. त्यानंतर भारतात काही महामार्ग बांधले गेले. राजकारणात बीओटी तत्त्वावर काँग्रेस पक्षानं दहा वर्षं सत्ता गाजवली.

बीओटीचे खरी लाभार्थी काँग्रेसच आहे. राजकारणात आम्ही काही लोकांना ‘धुवा, वापरा, पुढचं पुढं’ या तत्त्वावर पक्षात घेतलं आहे. हवं तर कुणालाही विचारा! आमचा पक्ष अत्यंत पारदर्शीपणाने लोकशाही पद्धतीने काम करतो. आमच्या पक्षात येऊन (बऱ्या बोलानं) विकासकामात सहभागी होता की पाठवू इडी? एवढी सोपी विनंती आम्ही करतो.

सुदैवानं बहुतेक नेते या विनंतीला मान देतात आणि आमच्याकडे येतात! जागावाटपाची चर्चा सध्या सुरु आहे, म्हणून जास्त काही बोलत नाही. जागावाटपापर्यंत (एकमेकांशीही) काही बोलायचं नाही, असं ‘आमचं ठरलंय!’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.