ढिंग टांग : बिनचेहऱ्याचे चेहरे...!

महाराष्ट्राचा भविष्यातला कारभारी कोण? हा खरा ज्वलंत सवाल आहे. निवडणुका तोंडावर आलेल्या असताना भावी कारभाऱ्याचा चेहरा मात्र अजून जनतेसमोर आलेला नाही.
Maharashtra Politician
Maharashtra Politiciansakal
Updated on

महाराष्ट्राचा भविष्यातला कारभारी कोण? हा खरा ज्वलंत सवाल आहे. निवडणुका तोंडावर आलेल्या असताना भावी कारभाऱ्याचा चेहरा मात्र अजून जनतेसमोर आलेला नाही. चेहराच नाही तर मते कोणाला देणार, या विचाराने मतदारांचा चेहरा मात्र पडला आहे. अशा परिस्थिती काय करावे? बिनचेहऱ्याची निवडणूक तशी महाराष्ट्राला ओळखीची नाही. निवडणूक कुठलीही असो, आधी चेहरा लागतोच.

चेहरा बघितल्याशिवाय मते देणे शक्य होत नाही. चेहरा, निवडणूक चिन्ह, पक्ष आणि मग आघाडी या चार निकषांवर अनुक्रमाने मतदान करण्याची जबाबदारी मतदारांवर असते. मतदारांच्या सोयीसाठी आम्ही सहा संभाव्य चेहरे हुडकले असून त्यांची नव्याने ओळख येथे करुन देत आहो. जेणेकरुन मतदान करताना सोयीचे होईल. केवळ लोकशाहीचे संरक्षण करण्याच्या हेतूनेच आम्ही हे कार्य हाती घेतले आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

१. कर्मवीर भाईसाहेब (मु. पो. ठाणे) : अतिशय गतिमान कारभार करणारे, रात्री-अपरात्री कुठेही फिरणारे, दुपारचे जेवण रात्री आणि रात्रीचे जेवण रात्रीच घेणारे असे हे कार्यमग्न व्यक्तिमत्त्व शोधूनही सापडणार नाही. हे राहतात ठाण्यात, ॲड्रेस दक्षिण मुंबईचा देतात, आणि प्रत्यक्षात साताऱ्याजवळ दऱ्याला जाऊन शेती करतात. यांना भेटण्याची सोयीची वेळ रात्री अडीच ते सकाळी सहा अशी आहे. यावेळेत भेटल्यास कुणाचेही काम फटक्यात होते, असा अनुभव आहे. महाशक्तीचा आशीर्वाद असलेला एकमेव चेहरा.

२. धाकले धनी ऊर्फ दादासाहेब बारामतीकर : अत्यंत कार्यक्षम, धडाडीचे आणि स्पष्टवक्ते उपमुख्यमंत्री. पण कायम उपमुख्यमंत्रीच राहिले. ‘आपला चेहराच तसा’ असा विचार करुन इतकी वर्षे गप्प राहिले. खरे तर वीसेक वर्षांपूर्वीच त्यांचा चेहरा पुढे यायला हवा होता. पण गाडं पुढे जाता जाईना! दरवेळी काहीतरी होऊन कोलदांडा घातला जातोय. यावेळी मात्र त्यांनी मनावर घेऊन गाडीचा गिअर टाकला आहे. सवयीने गिअर बदलताना हात हँडब्रेकवर गेला. हँडब्रेक काढला, तेव्हा लक्षात आले की गाडी रिव्हर्स गिअरमध्ये गेली आहे! आता यापुढे सगळे काही नीट होईल, असे सांगतात. मॅप चालू केला असून गुगलची बाई सांगंल तशी गाडी न्यायची, असा निर्णय झाल्याचे कळते. गुगलची बाई कोण, हे आता विचारु नका!

३. नानासाहेब फडणवीस : अत्यंत तडफदार, चतुर चेहरा. किंबहुना महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात चतुर चेहरा तो हाच! मुंबईचा वक्तशीरपणा, पुण्याचे विशिष्ट हसू, आणि नागपूरचा

दिलखुलासपणा याचे मनभावन मिश्रण असलेला हा चेहरा भल्या भल्यांचे तोंड खर्रकन उतरवतो. यावेळी आपण चेहरा आहोत की नाही, हे मात्र त्यांना अद्याप कळलेले नाही.

४. वंदनीय उधोजीसाहेब : निष्णात फोटोग्राफर, शाब्दिक कोट्या करण्यामध्ये उस्ताद. भाषेवर विलक्षण प्रभुत्व. एक तेजस्वी चेहरा. मुख्यमंत्रीपदी कोणीही असो, महाराष्ट्राचा कारभार आपणच पाहायचा, हे यांनी आधीच ठरवलेले असल्याने ‘चेहरा कोण’ हा मुद्दा त्यांच्यासाठी गैरलागू आहे. अडीच वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी युनो, डब्ल्यूएचओ, रेडक्रॉस, युनेस्को, आयएमएफ, वर्ल्ड बँक आदी सर्व संस्थांमध्ये विलक्षण दबदबा निर्माण केला आहे. चेहरा जाहीर कुणाचाही झाला तरी मूळचा झरा हाच!

५. नानासाहेब पटोले : निवडणुकीत कुणाचाच चेहरा नको, ही बातमी सर्वप्रथम महाविकास आघाडीत यांनीच (दिल्लीहून) आणली. (आणि इतरांचे चेहरे पाडले!)

६. संजयाजी फर्जंद : यांचा चेहरा बघितला की बाकी सगळे चेहरे भराभरा पांगतात, इतके सांगितले तरी पुरे!!

...बाकी अनेक चेहरे आहेत. पण निवडणूकच बिनचेहऱ्याची असल्याने त्यांची चर्चा करण्यात अर्थ नाही. मतदारांनी तूर्त आरशात बघावे, अशी स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.