ढिंग टांग : गुडबाय, ज्योभाय..!

दिल्लीकडे निघालेल्या ९०० कोटींच्या विमानातून : माय डिअर मित्र ज्योभाई, जे श्री क्रष्ण. अमेरिकेचा दौरा आटोपून परत निघालो. विमानातूनच हे पत्र लिहीत आहे.
Dhing Tang
Dhing Tangsakal
Updated on

दिल्लीकडे निघालेल्या ९०० कोटींच्या विमानातून : माय डिअर मित्र ज्योभाई, जे श्री क्रष्ण. अमेरिकेचा दौरा आटोपून परत निघालो. विमानातूनच हे पत्र लिहीत आहे. भारतात गेल्यानंतर पत्र लिहायला सवड मिळेलच असे नाही. यावेळचा माझा दौरा फारच छोटा होता. पोट भरले नाही. सारखी तुमच्या डेलावरच्या घरातील पाहुणचाराची आठवण येत आहे.

छोट्याशा दौऱ्यावर येताना मी एकच बॅग घेऊन आलो होतो. तीन दिवसांचे कपडे ते किती असणार? पण परत जाताना बऱ्याच बॅगा झाल्या. तुमचे विमातळावरले सिक्युरिटीवाले कपाळाला आठ्या घालून बघत होते. ‘इतकं लगेज कसं काय? इंडियात शिफ्ट होताय की काय?’ असे एका सुरक्षा अधिकाऱ्याने विचारलेही. मी म्हणालो, ‘‘मी ‘इंडिया’त शिफ्ट होणं या जन्मात शक्य नाही. मी इंडियात शिफ्ट झालो तर तिथं केवढी घबराट पसरेल!’

माझे उत्तर ऐकून त्याचा संशय बळावला. त्याने बॅगा उघडून बघितल्या, आणि तो च्याटच पडला. मी तांब्यापितळेची मोड घेणारा असावा, अशा नजरेने त्याने माझ्याकडे पाहिले. त्याची चूक नव्हती. सामानात सगळ्या जुन्यापुराण्या वस्तू होत्या. शेवटी मी खुलासा केला, ‘‘आमच्या शेकडो वर्ष जुन्या गोष्टी तुमच्या देशात होत्या, त्या परत नेतोय!’ पण त्या अधिकाऱ्याला माझे पुरातन वस्तूंचे दुकान असावे, असा संशय आला.

‘व्हेअर इज युअर अँटिक शॉप?’ असे त्याने विचारले. मी अभिमानाने उत्तर दिले : ‘इंडियाऽऽ, इंडिया!’ लगेजमध्ये पुरातन मूर्ती, काही धातूची भांडी, शिल्पकलेचे नमुने अशा वस्तू होत्या. गेली शेकडो वर्षे आमच्या देशातून चोरीला गेलेल्या वस्तू तुमच्या देशात मिळाव्यात, हे काही ठीक वाटले नाही, पण जो थयु, सो थयु! हवे अमणां आगळ जोवानु गरज छे!! छे के नथी? काहीही असो, ज्योभाई, तुमच्यामुळे आमच्या प्राचीन वस्तू परत मिळाल्या. थँक्यू!

डेलावेरला मी आल्यावर मिठी मारण्याआधीच तुम्ही माझा जो हात घट्ट पकडला तो शेवटपर्यंत सोडला नाही. एका हातानेच मी सारे काही करत होतो. दुसरा हात कायम तुमच्या हातात!!

गेल्या वेळेला मी व्हाइट हाऊसला आलो असताना जिलबेनने (मिसेस बायडेन) माझ्यासाठी खूप मोठा खाना ठेवला होता. मला आवडणारे अनेक पदार्थ केले होते. यावेळेला डेलावरच्या तुमच्या घरी मात्र साधेच जेवण होते, मला खूप आवडले. पण मला दोन्ही टाइम भरडधान्यच लागते, असे जिलबेनना कोणी सांगितले? भरडधान्य खा, असे मी लोकांना सांगत असलो, तरी तिन्ही त्रिकाळ मी तेच खात नाही, याची कृपया (पुढील भेटीत) नोंद घ्यावी.

अर्थात, तुमच्या अध्यक्षपदाचे आता थोडेच महिने उरले आहेत. त्यादृष्टीने आपली ही शेवटचीच अधिकृत भेट ठरावी. पुढल्या वेळेस आपण भेटू, तेव्हा तुम्ही निवृत्त असाल, मी नसेन!! निवृत्तीनंतर तुम्ही उभयतां भारतात यावे, असे माझे आमंत्रण कायम आहे. (ताजमहाल आधी होता, तिथेच आहे. डोण्ट वरी!) जी- ट्वेंटी परिषदेच्या वेळी तुम्ही भारतात येऊन गेलात, तेव्हा ढोकळा खाऊन तुमचे पोट अंमळ बिघडल्याचा अहवाल ‘सीआयए’ने मला पाठवला होता. ढोकळा खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायचे नसते. पुढल्या वेळेस काळजी घ्या. कळावे. आपला. जुना फ्रँड. नमो.

ता. क. : तुमच्या घरी आल्यावर मी तुम्हाला चांदीची रेल्वेगाडी भेट दिली. ती पाहिली का? ती खेळण्यातली नाही. त्यावर दिल्ली ते डेलावेर असे लिहिले आहे. (डेलावेर ते दिल्ली असे लिहिलेले नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.