ढिंग टांग : नाइट लाइफची ऐशीतैशी..!

आपल्या कडक आदेशानुसार अल्पवयीन तरुणास अथवा तरुणीस अथवा ज्यास सदरील कायदा लागू आहे, अशा कुठल्याही व्यक्तीस मद्य दिल्यास पब अथवा बारचा परवाना तात्काळ रद्द करणेची मोहीम उघडण्यात आली आहे.
Alcohol
Alcoholsakal
Updated on

डिअरम डिअर होम्मिनिष्टरसाहेब यांसी, मी पत्र लिहिणार, म. पो. काँ. बबन फुलपगार, बक्कल नं. १२१२, कदकाठी पाच फूट साडेपाच इं, वजन ४८, छाती २६, फुगवून २६, निशापाणी न करता निवेदन करीत आहे की, सध्या महाराष्ट्रात मद्यपी बांधवांची कंडिशन खराब झाली हाहे. सीमाशुल्कवाल्यांपासून फायर ब्रिगेडवाल्यांपर्यंत सर्वच जण पब आणि बारवाल्यांवर टेपर ठेवून असल्याने मद्यपी बांधवांची गोची झाली हाहे.

आपल्या कडक आदेशानुसार अल्पवयीन तरुणास अथवा तरुणीस अथवा ज्यास सदरील कायदा लागू आहे, अशा कुठल्याही व्यक्तीस मद्य दिल्यास पब अथवा बारचा परवाना तात्काळ रद्द करणेची मोहीम उघडण्यात आली आहे. भारीतला दरवाजा असलेले पब आणि बारवर कुऱ्हाड कोसळली असली तरी देशी मद्यविक्री करणेचे लायसन असलेल्या पडदावाल्या गुत्त्यांवर मात्र सर्रास मद्यविक्री सुरु आहे.

अर्थात पडदावाल्या देशी मद्यालयांमध्ये जी शिस्त असते, ती पब आणि बारवाल्यांकडे नसते, हे माण्य करावे लागेल. देशी मद्यालयात अल्पवयीन तरुण आल्यास त्यास उभे केले जात नाही. तसेच तिथे कुठलेही गिऱ्हाइक पंधरा मिंटांच्यावर थांबत नाही. काही गिऱ्हाईके पायी पायी येतात, उभ्या उभ्या गिलास रिकामा करुन दोघांच्या खांद्यांवरुन घरी जातात. त्यांना कसलीही तकलीफ नाही.

तथापि, पब आणि बारवाल्यांचे वेगळे पडते. त्यांना सगळेच भारीतले लागते. बसायला बारकी स्टुले असतात, आणि मंद लायटिंग असते. भारीतले गिलास, महाग चखणा…रात्री लेट झाला तरी चालेल, असे सारे सेटिंग असते. पण हीच गोस्ट त्यांच्या मुळावर आली. आज जो येतो तो रेड मारतो, अशी अवस्था झाल्यामुळे बारवाले संत्रस्त झाले हाहेत. बारमालक हा प्रवर्ग तर अगदीच कंडम अवस्थेत जाऊ लागला हाहे. माझ्या वळखीच्या एका बारमालकाने त्याची कैफियत मांडली, तीच मी आपल्यासमोर ठेवीत आहे. क्रुपया राग मानू नये. निव्वळ सामाजिक बांधिलकीच्या भावणेतून मी हे निवेदन करीत आहे, याची क्रुपया नोंद घेणेचे करावे.

चांदणी चौकापासून अदमाशे दोनशे कदमांवर असलेल्या ‘नाइट बर्ड बार अँड रेस्टॉरंट- साऊथ इंडियन, पंजाबी, चायनीज डिशेश’ या बारचे मालक श्रीमान मल्लाशेठ हे परवाच्याला आपल्या बारमध्ये एण्ट्री घेत असतावेळी त्यांस एका पोलिसानेच आडविले. मल्लाशेठ म्हणाला की ‘‘मी मालक हाहे!’’ एवढे त्याने बोलताच त्याला तिथूनच उचलून जीपमध्ये घालण्यात आले!! ‘नाईट बर्ड’मध्ये कोणीही अल्पवयीन जात नाहीत. जाणारे स्वत:ला अल्पवयीन समजतात, ही बाब अलाहिदा!!

एवढे कमी पडले म्हणून ट्राफिकवाल्यांनीही रात्री उशीरा येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या थांबवून काचा खाली करण्याची मोहीम सुरु केली आहे. पबमध्ये गेले तरी पकडतात, देशी बारमध्ये गेले तरीही अंदर! माणसाने जावे कुठे? तीन रात्रीत सत्तरेक जण ड्रंक ड्राइवच्या गुन्ह्याखाली अंदर करण्यात आले असल्याचे समजते.

साहेब, हाच आपला महाराष्ट्र एकेकाळी नाइट लाइफची स्वप्ने बघत होता, आठवते का? मुंबई-पुण्यासारख्या शहरात रातभर हाटेले उघडी ठेवून टेरेसवरही मज्जा करणेची सोय करण्याचा प्लॅन होता. मॉल वगैरे उघडे ठेवण्याचा विचार होता. त्या स्वप्नाचे काय झाले? ‘नाइट लाइफ’ ची योजना बारगळली की तिचा करेक्ट कार्यक्रम चालू हाहे? हे कळेनासे झाले हाहे. आमचे एक युवा नेते नाइट लाइफची स्कीम घेऊन आले होते, ते सध्या परदेशात हाहेत, हे पाहून हा कार्यक्रम करणेत येत आहे का? क्रुपया योग्य मार्गदर्शन करावे, ही विनंती.

आपला आज्ञाधारक. बबन फुलपगार. ब. नं. १२१२.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.