‘शिवतीर्था’च्या बालेकिल्ल्यातील वातावरण तापलेले होते. राजे कुणावर तरी बहुत संतापलेले दिसत होते. तीन वेळा ‘खळ्ळ्ळ’ ऐसा ध्वनी जाहला, आणि दोन वेळा ‘खटॅक’ असाही आवाज जाहला. ‘खटॅक’ नंतर आपापत: ‘ओय’ ऐसी अस्फुट किंकाळी ऐकू येते. परंतु, ती काही कानी आली नाही. तो मच्छर मारण्याच्या रॅकेटीचा आवाज असणार, हे इतरेजनांनी ताडले.
सांप्रतकाळी युद्धाचा माहौल आहे. रणांगणावरील आवाज घरापर्यंत ऐकू येऊ लागले. प्रत्यक्ष रणभूमीवरील साद्यंत हकिगत सांगण्यासाठी गुप्तचरांची रीघ शिवतीर्थावर लागली होती. रीघ म्हणजे अक्षरश: रीघ! एकेका गुप्तचरास शिवतीर्थाच्या फाटकाशीच कुपन देण्यात येत होते. क्यूआर कोड स्कॅन झाल्यावरच आत सोडले जात होते. असो.