ढिंग टांग : बेरोजगारीची सुखस्वप्ने..!

मातोश्री हाइट्स सहनिवास. वेळ : रणनीती ठरवण्याची.
Dhing Tang
Dhing Tangsakal
Updated on

स्थळ : मातोश्री हाइट्स सहनिवास. वेळ : रणनीती ठरवण्याची.

चि. चिक्रमादित्य : हाय देअर…मे आय कम इन बॅब्स?

उधोजीसाहेब : (कंटाळून) नको, असं म्हटलं तर निमूटपणे दार बंद करुन परत जाणार आहात का?

विक्रमादित्य : (खोलीत शिरकाव करत) अफकोर्स नॉट…मी वेगळंच विचारायला आलोय!!

उधोजीसाहेब : (जांभई आवरत) बोला!!

विक्रमादित्य : (चुटकी वाजवत) तुम्हाला वांग्याची भाजी आवडते की कांद्याच्या पातीची?

उधोजीसाहेब : (तोंड वेंगाडून) दोन्हीही आवडत नाहीत! वांगी कसली खायची ती? हॅ:!!

विक्रमादित्य : (आग्रहानं) कांद्याच्या पातीची तरी खाच!!

उधोजीसाहेब : (वैतागून) या कसल्या भाज्या? कोण खातं? कोबी, मटार, फ्लॉवर, बटाटा, मटकी उसळ…झालंच तर आपलं ते हे…(काहीही नाव न सुचून) या भाज्या नाहीत का?

विक्रमादित्य : राहुलजींनी परवा कोल्हापुरात वांग्याची आणि कांद्याच्या पातीची भाजी स्वत: फोडणी देऊन केली, आणि चक्क खाल्लीही!!

उधोजीसाहेब : मलाही तशी आवडते म्हणा, वांग्याची भाजी! कांद्याची पात तर…आहा!!

विक्रमादित्य : राहुलजींनी एका टेम्पोचालकाच्या घरात थेट सैपाकघरात घुसून या भाज्या खाल्ल्या! त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी त्या निमूटपणे खाल्ल्या!! तुम्ही खाल?

उधोजीसाहेब : माझ्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी काहीही खाईन!! त्या गद्दारांचा नायनाट करायचा असेल तर लोखंडाचे चणेही खाईन!!

विक्रमादित्य : गद्दारांचं काही तरी करायलाच हवं! फार माजलेत!!

उधोजीसाहेब : (चेवात येऊन) निवडणुकांपर्यंत थांबा! एकेकाला असा लंबे करीन की चीची करत बिळात जाऊन बसतील लेकाचे!! या उधोजीशी गाठ आहे म्हणावं! निवडणुकीनंतर यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे!

विक्रमादित्य : बेरोजगार झाल्यावर येतील आपल्याकडे- साहेब, नोकरी द्या, मी जुना माणूस आहे वगैरे बडबडतील! आपण त्यांना फुटवायचं? हो की नाही बँब्स!!

उधोजीसाहेब : अडलंय माझं खेटर, त्यांना नोकरी द्यायला! दारात आले तर उभंसुद्धा करणार नाही, भेट तर दूरच राहिली!!

विक्रमादित्य : आधीही आपण असंच करत होतो का हो?

उधोजीसाहेब : तेव्हाची परिस्थिती निराळी होती!

विक्रमादित्य : बेरोजगार झाल्यावर त्यांना स्टायपेंड देणार?

उधोजीसाहेब : हुड हुड हुड!! गेले उडत!! चाकरी द्या, पोटाशी घ्या, तुमचंच लेकरु आहे, पदरी घ्या अशा अगदी दाताच्या कण्या केल्या तरी अजिबात दाद देणार नाही! बेरोजगारीचं दु:ख कळू दे लेकाच्यांना! घरात बसून किती एकटं एकटं वाटतं, तेही कळू दे!! निवडणुकीनंतर आराम करा म्हणावं घरी!! इकडे तिकडे हिंडा रात्री-अपरात्री मीटिंगा करत!!

विक्रमादित्य : पण ती कमळाबाई देईल की त्यांना नोकरी!

उधोजीसाहेब : (संतापाचा कडेलोट होत) नाव काढू नकोस त्या काळतोंडीचं! तिनंच हे गद्दार पोसले!! त्या कमळेचीच नोकरी मी घालवतो की नाही बघ!

विक्रमादित्य : बॅब्स, आय हॅव ए क्वेश्चन!! आपले विरोधक बेरोजगार झाले की आपण काय करायचं?

उधोजीसाहेब : हा काय प्रश्न झाला? अरे, विरोधक बेरोजगार होणार, याचा अर्थ आपल्याला रोजगार मिळणार असाच होतो!!

विक्रमादित्य : दॅट मीन्स, आपल्याला जॉब अपॉर्च्युनिटी आहे? उधोजीसाहेब : (स्वप्नाळूपणाने) अर्थात! त्याच्यासाठीच तर चाललंय ना एवढं सगळं? गेली अडीच वर्ष आपणही रोजगारच शोधतोय ना?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.