प्रिय मित्रवर्य मा. उधोजीसाहेब, यांसी शतप्रतिशत प्रणाम. परवा तुम्ही फेसबुकवर येऊन गेलात. टीव्हीसमोर सात वाजल्यापासूनच बसलो होतो. बरोब्बर साडेसातच्या ठोक्याला तुम्ही आलात. आत्ता लॉकडाऊनची घोषणा कराल, मग कराल, या अपेक्षेने वाट पाहात होतो. घोषणा केली रे केली, की निषेधाचे पत्र काढायचा आमचा प्लॅन होता. पण कसचे काय! नुसता इशारा देऊन तुम्ही अंतर्धान पावलात. अशावेळी आमच्यासारख्या विरोधी पक्षनेत्याची किती पंचाइत होते, हे तुम्हाला कळणार नाही.
खरे तर तुम्ही फेसबुकवर कशासाठी भाषण दिलेत, हेच मला शेवटपर्यंत समजले नाही. तुमचे भाषण संपल्यावर मी शेवटी आमचे कमळाध्यक्ष मा. चंदुदादा कोल्हापूरकर यांना फोन लावला. विचारले, ‘तुम्हाला कळले का?’ तर त्यांनी ‘च्यॅक’ एवढेच उत्तर दिले. आमचे सहकारी मा. दरेकरभाऊंना फोन केला. ते म्हणाले, ‘‘मला तर काय बोलावं तेच समजत नाहीए. आधी तुम्ही बोला, मग मी री ओढीन!’’ मी त्यांचाही नाद सोडला.
लॉकडाऊनची घोषणा तुम्ही केलीत तर काय करायचे याचा आमचा प्लॅन तयार आहे. पण लॉकडाऊन केलाच नाही तर काय करायचे? पोटात गोळा आला आहे. विरोधकांच्या मानसिकतेशी असे खेळणे बरे नव्हे, हे सांगण्यासाठीच हा पत्रप्रपंच.
एकाच प्रश्नाचे उत्तर कृपया ‘होय’ किंवा ’नाही’ मध्ये द्यावे. महाराष्ट्रावर (आणि आमच्यावर) उपकार होतील! प्रश्न : लॉकडाऊन करणार का?
कळावे. आपला माजी मित्र. नानासाहेब फ.
नाना-
जय महाराष्ट्र. तुमचे पत्र मिळाले. मिळाले म्हंजे मिळणारच. का नाही मिळणार? किंबहुना मिळालेच पाहिजे. परवा फेसबुकवरले भाषण मी का केले, हे तुम्हाला समजले नाही म्हणे!
त्यात न समजण्याजोगे काय होते, हे मला अजून समजले नाही. खरे तर मी समजण्यासारखे तरी काय बोललो, हे मलादेखील समजलेले नाही. पण ते सोडा! मला यात राजकारण आणायचे नाही. माझ्या महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढण्याची माझ्यावर जबाबदारी आहे. -मी जबाबदार! तुम्ही लोकांनी कितीही टीका केली तरी मी ऐकणार नाही. नाही म्हंजे नाहीच ऐकणार? कशाला ऐकायचे? ज्यांना माझ्या महाराष्ट्राच्या प्रकृतीची चिंता नाही, त्यांचे काय ऐकायचे? मला कुणी खलनायक ठरवले तरी बेहत्तर, मी बोलणार! बोलणार म्हंजे बोलणारच. किंबहुना बोलायलाच हवे. मी ‘फेसबुक लाइव’ केले, तेथे काही मी काव्यवाचनाचा कार्यक्रम करत नव्हतो. ‘लॉकडाऊन जाहीर करत नाही, पण इशारा देतो आहे’ एवढेच म्हणालो. यात न समजण्यासारखे काय आहे? हा इशारा तुमच्यासारख्या विघ्नसंतोषी विरोधकांसाठी होता. माझ्या महाराष्ट्राच्या बंधूभगिनी आणि मातांसाठी नव्हे!
त्यांना फक्त माझे तूर्त एवढेच सांगणे आहे की, ‘मास्क लावा, ती आपली ढाल आहे!’’
होय, मास्क हीच ढाल आहे. मी ती नेहमी घेऊन फिरतो. काही लोकांना वाटते, मास्क कशाला? पण मी त्यांना विचारतो, मास्क न लावण्यात काय शौर्य आहे? पूर्वीच्या काळी रणांगणावर जाताना योद्धे शिरस्त्राण घालत होतेच ना? मी तर म्हणेन, मास्क लावण्यातच खरे शौर्य आहे!! वारंवार हात धुण्यात खरा मुत्सद्दीपणा आहे आणि सुरक्षित अंतर ठेवणे हेच खरे राजकीय चातुर्य आहे!!!..हे तिन्ही गुण एकाच वेळी दाखवणारा एकमेव नेता म्हंजे मीच आहे!!
आता हे घ्या, ‘‘लॉकडाऊन करणार का?’’ या तुमच्या प्रश्नाचे उत्तर : ‘‘जगदंब! जगदंब!’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.