मुलांनो, आजवर आपण अनेक चिन्हांची ओळख करुन घेतली. अनेक चिन्हे बघून आपण हरखलो, काही चिन्हे बघून आपण हंसलो! पण असल्या चिन्हांच्या मागे धावणे ही काही बरी चिन्हे नाहीत. ही भिकेची लक्षणे!! तरीही आपण आज तुतारी या चिन्हाची ओळख करुन घेणार आहो.
तुतारी हे एक रणवाद्य आहे. पूर्वीच्या काळी युद्धाला सुरवात करण्यापूर्वी तुतारी वाजवली जात असे. त्यासाठी स्पेशल तुतारीवाला नामजाद करणेत येत असे. तुतारी वाजवणे हे काही येरागबाळ्याचे काम नाही. त्याला दम लागतो. छाताड फुलून यावे लागते. हे रणमर्दाचे काम आहे.
समोर विरुद्ध पार्टीची फौज उभी असताना पुढे जायचे, आणि तुतारी फुंकायची, याला धाडस लागते. फार्फार प्राचीन काळी याच कामाला शंख फुंकला जात असे. प्रत्येक योद्ध्याची जशी आवडती तलवार किंवा गदा असते, तसाच आवडता शंखही असे. युद्धभूमीवर गेल्यावर आपण रेडी आहोत, असे जाहीर करण्यासाठी शंख फुंकला जात असे.
‘टाइम प्लीज’ घ्यायची असेल तरीही शंखच वापरला जात असे. शंख फुंकणे हीदेखील एक आगळीवेगळी कला आहे. हल्ली हे वाद्य आरत्या म्हटल्यानंतर ‘घालीन लोटांगण’ संपता संपता फुंकले जाते. अर्थात मोजक्याच घरांमध्ये! कां की शंख फुंकण्यासाठीही बेदम ताकद लागते. बिड्या फुंकून छातीचे खोके झाल्यानंतर शंखबिंख फुंकता येत नाही. अपचन झाले असेल तरीही शंख- तुताऱ्यांसारखी वाद्ये वाजवण्याचा धोका पत्करु नये. असो.
तुतारी ही आकडेबाज आकाराची किंवा इंग्रजी ‘एस’ आकाराची असू शकते. ती प्राय: पितळेची असते किंवा काही ठिकाणी लाकडीही असू शकते. तिचे एक टोक आभाळाकडे ‘आ’ वासल्याच्या स्वरुपात असून दुसरे टोक फुगीर गालाच्या वादकाच्या तोंडी असते. वादक सावधगिरीच्या पवित्र्यात म्हणजे गुडघा मुडपून बसतो, आणि तुतारी वाजवतो. तशी ती उभ्यानेही वाजवता येते. नाही असे नाही, पण गुडघा मुडपून बसले की बरे पडते! पुन्हा असो.
तुतारीला ‘रणश्रृंग’ किंवा नुसतेच ‘श्रृंग’ असेही म्हणतात. एखाद्या किडकिडीत, दमेकरी माणसावर तुतारी वाजवण्याची पाळी आली की तिलाच ‘श्रृंगापत्ती’ असे म्हणतात. तुतारीचे एक नाव ‘कोम्बू’ असेही आहे, हे ऐकून मुलांनो, तुम्ही थक्क व्हाल!! ‘कोम्बू’ म्हणजेच तुतारी!!
मुलांनो, केशवसुत नावाचे एक कवी होऊन गेले. त्यांनी ‘एक तुतारी द्या मज आणुनि, फुंकिन मी जी मत्प्राणाने, भेदून टाकिन सारी गगने, दीर्घ जिच्या त्या किंकाळीने...’ अशी जबरदस्त कविता लिहिली. यावरुन एक लक्षात येईल की, तुतारी ही कुणीतरी आणून द्यावी लागते. पण केशवसुत म्हणतात त्याप्रमाणे ती ‘मत्प्राणा’ने नव्हे, तर ‘मत-प्राणाने’ फुंकावी लागते. शिवाय ती किंकाळीही मारते. केशवसुत तब्बेतीने बरे असणार, यात शंका नाही.
वर्तमानकाळात तुतारी राजकीय सभेच्या वेळी वाजवली जाते. आपले लाडके नेते मोटारीतून उतरुन मंचाकडे चालू लागले रे लागले की तुतारीवाला गुडघा मुडपून बसलाच म्हणून समजा!! तो तुतारीचा मान असतो. लग्नसमारंभातही तुतारी वाजण्याची चाल आहे. अर्थात लग्नारंभी तुतारीसारखे रणवाद्य वाजवणे योग्यच म्हटले पाहिजे.
मुलांनो, अशी ही आगळीवेगळी तुतारी किनई आता बऱ्याच वेळा ऐकू येणार आहे. गावोगाव तुताऱ्याच तुताऱ्या!! कारण ही निवडणुकीची चिन्हे आहेत. घोडामैदान दूर नाही. अर्थात तुतारी वाजण्याचा दमखम असलेल्यांनी पुरेशी काळजी घेऊन ती वाजवली तरच ती वाजणार! अन्यथा गाजराप्रमाणे मोडून खावी लागणार! हो की नाही? तेव्हा तयार रहा! निगाह रख्खो-
धु...धु...धु...धु...धुईं... धुईं...धुई...धुधुक...धुईंक...!! जय महाराष्ट्र!!
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.