ढिंग टांग : दौलतीचा दस्तावेज...!

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : धुंडाळण्याची. राजाधिराज उधोजीमहाराज आपल्या अंत:पुरात युद्धपातळीवर काहीतरी शोधाशोध करत आहेत.
Dhing Tang
Dhing Tangsakal
Updated on

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : धुंडाळण्याची. राजाधिराज उधोजीमहाराज आपल्या अंत:पुरात युद्धपातळीवर काहीतरी शोधाशोध करत आहेत. येका हाती भलेमोठे भिंग आणि दुज्या हाती तलवार... कपाटांची उपसाउपशी चालू आहे. गाद्यागिरद्या इत्रतत्र उलथ्यापालथ्या पडल्या असोन दस्तऐवज वाऱ्यावर इतस्तत: उडत आहेत. परंतु, हवा तो कागुद काही गवसायास तयार नाही. उधोजीराजे इरेस पडोन कागुद शोधण्याचे मोहीमेवर निमग्न जाहलेले. अब आगे...

उधोजीराजे : (हातातील बिनकामाचे कागद फेकून देत) कोण आहे रे तिकडे? त्वरेने या...!!

संजयाजी फर्जंद : (डुलत डुलत येत) बोला, राजं, बोला!!

उधोजीराजे : (संयम बाळगून, पण संतापाने) मुजरा राहिला, फर्जंदा! दरवेळी सांगावयास का लागावे?

संजयाजी : (जुलमाचा मुजरा करत) हा घ्या, केला! आता बोला!!

उधोजीराजे : (नापसंतीनं) किती हा ॲटिट्यूड! कमी करा!!

संजयाजी : (दातात काडी घालत शांतपणे) काय आढळाया लागला?

उधोजीराजे : (गोंधळून) कुठं काय?

संजयाजी : (खुलासा करत) काय शोधताय जणू? वाघनखं, भाले, मशाली, धनुष्यबाण... यातलं आता काहीही राहिलेलं नाही!शोधण्यासारखं हितं काही उरलेलंच नाही, राजे!!

उधोजीराजे : (गर्रकन मान वळवत) खामोश! आम्ही असल्या भंगार गोष्टी शोधत नाही!

संजयाजी : (कुतुहलानं) ही एवढी रद्दी कशापायी जमवली?

उधोजीराजे : (कडाडत) तोफेच्या तोंडी देईन! आमच्या दौलतीची मौल्यवान कागदपत्रे आहेत ती! त्यांना रद्दी म्हणतोस? कडेलोट करीन!!

संजयाजी : (पडेल आवाजात) चुकलं!! पण येवढी उचकापाचक कशापायी चालली आहे, येवढंच इच्यारायचं होतं मला!!

उधोजीराजे : गेले काही दिवस शोध शोध शोधतोय! संपूर्ण राजवाडा पालथा घातला! तळघरातल्या कोठीपर्यंत जाऊन शोध घेतला! सर्व दालने, खुर्च्या-कपाटांखालची जागा शोधली, अगदी मुदपाकखान्यात तूरडाळीच्या डब्यातदेखील डोकावून पाहिले!! कुठेही सापडायला तयार नाही!

संजयाजी : (चक्रावून) काय?

उधोजीराजे : (सुस्कारा टाकत) कागद... आणखी काय?

संजयाजी : (कपाळाला आठी घालत) कसला कागुद?

उधोजीराजे : (थकून खाली बसत) या दौलतीच्या सात-बाराच्या उताऱ्याचा! तो कागद मिळेपर्यंत मालकी सिद्ध होणार नाही, असं तलाठ्यानं सांगितलं आहे! कामचुकार लेकाचा!! एक तो दळभद्री कागद, त्याची इतकी काय पत्रास? आम्ही म्हटलं, ही दौलत आमची आहे, हे सारा महाराष्ट्र जाणतो! या दौलतीचे स्वामी आम्हीच, हे येथले शेंबडे पोरदेखील सांगेल, पण हा लेकाचा तलाठी म्हणतो, कागुद दाखवा!!

संजयाजी : (डोळा मारुन) जमवा की काहीतरी!!

उधोजीराजे : आपल्या दादरच्या भवनातली कपाटं शोधायला हवीत!

संजयाजी : (मटकन उकिडवे बसत) तिथं तर आता काय बी उरलं नाही!! दुस्मनानं कपाटंसुदीक उचलून नेली!!

उधोजीराजे : (फर्मान काढत) तिथल्या आपल्या सेवकवर्गाला सांगा की, भवनाचा कानाकोपरा धुंडाळा, उंदरांची बिळं खोदा, पण काहीही करुन तो कागद हस्तगत करा, आणि मगच आम्हाला तोंड दाखवा!

संजयाजी : (दातातली काडी थुंकत) चुक चुक...कोण उरलंय तिथं तरी!!

उधोजीराजे : जो कोणी आमच्या दौलतीचा सातबारा शोधून देईल, त्यास आम्ही भर शिवाजी पार्कात सोन्याचं कडं बहाल करु!!

संजयाजी : (उठून बसत) नगं, ऱ्हाहू द्या! कागुद मिळण्याची एकच जागा ऱ्हायली, ती जरा शोधून येतो!!

उधोजीराजे : (प्रचंड आशावादाने) अंगाश्शी! आता कसं बोललात? कुठे मिळेल तो कागद?

संजयाजी : जरा ‘सिल्वर ओक’वर शोधून येतो! बघतो गावतंय का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.