ढिंग टांग : आमदार एकजुटीचा विजय असो!

‘सर्वांना सरसकट मंत्री करा, आम्हाला खुर्ची मिळालीच पाहिजे’, ‘आमदार एकजुटीचा विजय असो!,’ अशा घोषणा आसमंतात घुमल्या आणि डुलक्या घेणाऱ्या बंदोबस्तावरील पोलिसांना खडबडून जाग आली.
Dhing Tang
Dhing Tangsakal
Updated on

‘सर्वांना सरसकट मंत्री करा, आम्हाला खुर्ची मिळालीच पाहिजे’, ‘आमदार एकजुटीचा विजय असो!,’ अशा घोषणा आसमंतात घुमल्या आणि डुलक्या घेणाऱ्या बंदोबस्तावरील पोलिसांना खडबडून जाग आली.

मंत्रालयासमोरचा परिसर फुलून गेला होता. आपल्या महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या संख्येने आमदार आहेत, हे उपस्थितांना पहिल्यांदाच कळले. एरवी हे आमदार दृष्टीसदेखील पडत नाहीत. ना दक्षिण मुंबईत, ना त्यांच्या मतदारसंघात. आज मात्र सर्वपक्षीय आमदार आपल्या मागण्यांसाठी एकत्र आले होते. खुर्चीचा हक्क मिळाला, तरच लोकशाही टिकून राहील, असा गाढ विश्वास त्यांना होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सात्त्विक संताप होता. हक्काच्या जाणीवेमुळे आलेला निर्धार होता.

‘माझ्या आमदार बंधूंनो, काळ मोठा कठीण आला आहे! माझ्या गरीब बिचाऱ्या आमदारबांधवाला आज राहायला छप्पर उरले नाही. काही लोकांनी त्याचे मतदारसंघातले छोटेसे घर जाळले. दुसऱ्या एका आमदाराचे आलिशान हॉटेल होते. तिथे काहीजण गेले. पोटभर जेवून बिल न भरता निघून गेले. जाताना धमकी दिली की हॉटेल जाळू!

एका आमदारबांधवाच्या मालकीचे दुकानाचे गाळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले,’ डोळ्यात पाणी आणून एक आमदार पोटतिडकीने बोलत होता. अनेकांनी डोळ्यातील अश्रू पुसले. त्यासाठी दुसऱ्याकडून रुमाल मागून घेतला. मागणीचा हा सर्वपक्षीय कार्यक्रम असल्याने विरोधी पक्षाच्या आमदारानेही अगत्याने आपला रुमाल काढून सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला दिला. मागल्या अधिवेशनात सत्ताधारी आमदाराने याच विरोधी आमदाराचे भर सभागृहात वाभाडे काढले होते. पण तेव्हा तो विरोधी पक्षात होता, आणि विरोधी आमदार मंत्री होता.

‘माझी गरीबाची गाडी उलटी केली, एक बी काच ठिवली नाही...,’ एका पीडित आमदाराने आपले गाऱ्हाणे मांडले. वाहनाची नासधूस झाल्यामुळे त्याला कुठे जायची सोय उरली नव्हती. अशाने कशी होणार समाजसेवा?

‘गाड्या काय, धा घ्याल हो, साहेब! पण मला स्थानिक लोक मतदारसंघात येऊ देत नाहीत, त्याचं काय?,’ आणखी एक आमदार कळवळला. ‘हितं आलात, तर तुमचं काय खरं नाही,’ असा निरोप त्याला कालच आला होता.

‘मतदारसंघात काय ठिवलंय?’ एक आमदार तुच्छतेने म्हणाला.

‘अहो, घर आहे माझं तिथं!’ कळवळलेला आमदार अजूनच कळवळला.

...एकंदरित परिस्थिती तंग होती. आमदारांच्या मागण्यांनी उग्र स्वरुप धारण केले होते. असेच चालू राहिले, तर पुढली टर्म मिळणेही कठीण जाईल, हे सत्य ओळखणे अवघड नव्हते.

‘खुर्चीचं काम पर्मनंट झालं तर मग काही कुणाची तक्रार राहणार नाही, त्यासाठी आपण एकजूट कायम ठेवली पाहिजे,’ एक आमदारबंधू तावातावाने सांगत होते. आमदारकी शाबूत राहिली नाही तर या मंत्रालयाचा उपयोग तरी काय? सबब मंत्रालयाला सिंबॉलिक टाळे ठोकण्याचे आंदोलन आखले गेले. ते तडीला गेलेही असते. पण मंत्रालयाला टाळे लावण्याची सोयच नव्हती आणि मुख्य म्हणजे कुणी टाळे आणि चावी आणलीच नव्हती. जो तो ‘दुसरा आणेल’ या समजुतीत नुसताच आला.

‘जोवर आम्हाला खुर्चीची शाश्वती नाही, तोवर आम्हाला पक्षही नाही!,’ एक आमदार बाणेदारपणाने म्हणाला. टीव्ही कॅमेऱ्यांनी ते अचूक टिपले. आंदोलनात सर्वच पक्षातले आमदार असल्याने, वातावरण खेळीमेळीचे होते. इतके की खुर्ची आंदोलनाचा कार्यक्रम झाल्यावर एकत्र कुठेतरी जेवायला जाण्याचेही काही जणांचे ठरले.

‘पहिले स्वयं, मग देश आणि मग जमलं तर पार्टी!’ एक आमदार दुसऱ्या आमदाराच्या कानात कुजबुजला... तेव्हा लोकशाहीचे कानही तृप्त झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.