ढिंग टांग : एक डाव बजरंगाचा...!

कुस्ती म्हटले की डावपेच आलेच. डाव आले आणि पेचही आले. ज्याला हे दोन्ही जमले त्याच्या खांद्यावर गदा आलीच म्हणून समजा. कुस्ती हा आमचा अत्यंत आवडता खेळ आहे.
Dhing Tang
Dhing Tangsakal
Updated on

कुस्ती म्हटले की डावपेच आलेच. डाव आले आणि पेचही आले. ज्याला हे दोन्ही जमले त्याच्या खांद्यावर गदा आलीच म्हणून समजा. कुस्ती हा आमचा अत्यंत आवडता खेळ आहे. तालमीत उतरावे. अंगावर माती उधळावी. दोन्ही पाय दणादणा हापटून प्रतिस्पर्ध्याची हबेलंडी उडवावी, आणि नंतर त्याच्या लंगोटात दोन बोटे खुपसून त्याला सोडावाटर बाटलीसारखा उपडा पाडून त्याच्या पाठकांडात कोपरे हाणून त्यास घायाळ करावे, आणि काळवीट मारल्यानंतर सिंहाने गर्जना करावी, तद्वत आभाळाकडे नाक करुन विजयी आरोळी ठोकावी... हे आमचे जुने स्वप्न!! असो.

दुर्दैवाने हे स्वप्न इतर अनेक स्वप्नांप्रमाणे अधुरेच राहिले. अंगाला कधी माती लागली नाही. हरयाणात कुस्तीची चांगली परंपरा असून तेथील मातीत उत्तमोत्तम दर्जाचे पैलवान उगम पावतात, हे ऐकून होतो. पै. बजरंग पुनिया यांना तालमीत घुमताना पाहावे, अशी आमची भारी इच्छा होती. ती पुरी करण्यासाठी आम्ही हरयाणात गेलो.

बजरंग पुनिया हे तालेवार व्यक्तिमत्त्व आहे. असा कुस्तीगीर होणे नाही. थेट कुस्तीगीर संघटनेलाच अंगावर घेऊन त्यांनी ऐशी धोबीपछाड दिली की यंव रे यंव! (खुलासा : धोबीपछाड या डावाविषयी आम्हाला फारशी माहिती नाही. तथापी, ज्याप्रमाणे धोबीबांधव धोतराचा पिळा पाण्यात बुचकळून समोरच्या फरशीवर चुबकतो, त्याप्रमाणे प्रतिस्पर्ध्यास चुबकण्याच्या क्रियेला धोबीपछाड म्हणत असावेत, असा आमचा कयास आहे. असो.) बजरंगरावांच्या तालमीत आम्ही गेलो असता, तेथे आमची वळख आणखी एका कुस्तीविश्वातील विभूतीमत्त्वाशी पडिली.

कुस्तीगीराचे आयुष्य कसे असते? त्याचा दिनक्रम कसा असतो? आहार कसा असतो? याचे जनरल नालेज घेण्यासाठी कांग्रेसचे उत्साही खासदार रा. रा. गांधी नेमके तेव्हाच तालमीत शिरले. शिरले म्हंजे काय, अगदी मेंढरांच्या वाड्यात बिबट्या शिरावा तसे शिरलेच!!

‘देखो भय्या, यही फर्क है, हममें और उनमें...हम गरीब, किसान, मजदूर और पैलवानों के लिए काम करते है और वो चुने हुए कुछ अमीर मित्रोंके लिए...,’ रा. गांधी यांनी आपली कुस्तीविषयक भूमिका आल्या आल्या स्पष्ट केली. पै. बजरंगाने कुस्तीगीरांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचल्यावर रा. गांधी यांचे समाधान झाले. या देशात किसान, मजदूर आणि गरीबांच्याशिवाय आणखी बरेच लोक दु:खी आहेत, हे कळल्याने त्यांना अधिकच उत्साह आला, आणि ते थेट तालमीच्या हौद्यातच उतरले. पै. बजरंग यांनीही हिय्या केला.

वास्तविक पै. बजरंग हे ऑलिम्पिक दर्जाचे पदकविजेते कुस्तीपटू. त्यांच्या वजनीगटात त्यांच्या तोडीचा पैलवान पृथ्वीतलावर सांपडणे कठीण. (अपवाद महाराष्ट्राचा! तिथे एकट्या कोहोलापुरात दोड डझन सापडतील!! असो.) पै. बजरंग आणि पै. गांधी यांच्यात प्रारंभी थोडी खडाखडी झाली. पै. गांधी यांचा पाडाव करणे इतके सोपे नाही, हे पै. बजरंगाच्या लागलीच लक्षात आले!!

मांडी-दंडावर ठॉपठॉप असे ध्वनि निघाले. (या अवयवांचा इतकाच उपयोग असतो, असे दिसते! असो, असो.) पै. गांधी हे अतिशय चपळ पैलवान असून कसेही उचलले तरी बरोब्बर दोन पायांवर अल्लाद उतरतात, हे बघून पै. बजरंगाने तीन-चार बोटे स्वत:च्याच तोंडात घातली. अखेर क्षणार्धात काहीचिया बाही होऊन पै. बजरंग यांची उचलबांगडी होऊन हवेतल्या हवेत गिरकी घेत एक प्राणांतिक आरोळी ठोकत ते पार पाठीवर उताणे पडले, तेव्हा पै. गांधी यांनी त्यांच्या छाताडावर स्वत:चे कोपर चेचले होते...चीतपट!!

विजयी मुद्रेने तालमीच्या बाहेर पडताना पै. गांधी आम्हाला म्हणाले, ‘आता मी पुन्हा ‘भारत जोडोयात्रा’ काढायला मोकळा! येताय?’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.