ढिंग टांग : नीतिमत्ता, उद्देश आणि विचारधारा..!

‘‘राजकारण म्हंजे काही मस्करी नाही,’’ कर्मवीर भाईसाहेबांनी पेपरमिंटची गोळी तोंडात टाकत आम्हाला सुनावले. खोक्यांवर बसून विनाकारण खीखी करणाऱ्या आम्हासारख्या टाइमपास लोकांना राजकारण म्हणजे निव्वळ गंमत वाटते, हे चूक आहे, असे त्यांचे मत.
Ethics Purpose and Ideology politics lessons
Ethics Purpose and Ideology politics lessonsSakal
Updated on

‘‘राजकारण म्हंजे काही मस्करी नाही,’’ कर्मवीर भाईसाहेबांनी पेपरमिंटची गोळी तोंडात टाकत आम्हाला सुनावले. खोक्यांवर बसून विनाकारण खीखी करणाऱ्या आम्हासारख्या टाइमपास लोकांना राजकारण म्हणजे निव्वळ गंमत वाटते, हे चूक आहे, असे त्यांचे मत.

आम्ही ते ऐकून गंभीर झालो. दीड मिनिटांपूर्वी आम्ही ‘इंडि’ आघाडीच्या शिवाजी पार्कवर झालेल्या सभेचा विषय काढून पोट धरधरुन हसलो होतो, हे जरा चुकलेच. ‘‘कोणीही उठावे आणि राजकारणात घुसावे, याला काही अर्थ नाही…काय कळलं?,’’ भाईसाहेबांनी हा प्रश्न विचारला की माहिती दिली, हे काही क्षण आम्हाला कळले नाही. पण काहीही असो, आम्ही ‘हो’ म्हणालो.

‘‘ हल्लीच्या राजकारणाला काही अर्थच उरलेला नाही! कोण कुठला कोवळा पोरगा येतो, आणि बापाच्या जिवावर निवडणुका जिंकतो! ही घराणेशाही मोडून काढली पाहिजे,’’ भाईसाहेब अचानक कुणावर तरी भडकून म्हणाले. आम्ही ‘बरं’ म्हणालो.

‘‘राजकारणात नीतिमत्ता, उद्देश आणि विचारधारा यांना फार महत्त्व असतं…कळलं का?’’ भाईसाहेबांनी डोस पाजला. आम्ही च्याटंच्याट! अरेच्चा, हे काय भलतेच? या तिन्ही गोष्टींची राजकारणात अजिबातच गरज लागत नाही,

अशी आमची आजवर समजूत होती. किंबहुना, या तिन्ही गुणांचा समुच्चय ज्या मनुष्यमात्रास आहे, त्या माणसाने रिक्षाचालकाने नकार दिला तर पायी चालत जाण्याची तयारी ठेवावी, असेच आम्ही समजून चालत होतो.

‘‘काय सांगता काय, भाईसाहेब?’’ आमच्या उद्गारांना अविश्वासाचा वास होता, हे कळल्याने भाईसाहेब गरम झाले. आम्ही उठून तांतडीने पाणी आणले. राजकारण कशाशी खातात, हे आम्हाला अजिबात ठाऊक नाही, किंबहुना राजकारण कश्शाशीही खातात, असा आमचा भ्रम असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग त्यांनी आमचे थोडे बौद्धिकच घेतले म्हणा!

‘‘राजकारण म्हंजे चेष्टा आहे की काय? भलतंच अवघड असतं ते! शिवाय नीतिमत्ता नसेल ना, तर काहीच खरं नाही…अंहं!’’ मोठ्ठे डोळे करुन दोन्ही हात खोका उचलल्यासारखे नाचवत भाईसाहेब म्हणाले.

नीतिमत्ता नसलेले अनेक लोक राजकारणात एकाच वेळी शिरल्याने सगळा चिखल झाला आहे, आणि ती साफसफाई करण्यासाठीच आपण ‘डीप क्लीन ड्राइव्ह’ मोहीम सुरु केली असल्याचे त्यांनी बराच वेळ फोड करुन सांगितले. त्यांच्याप्रती असलेला आमच्या मनातला आदर वाढला.

‘‘मुळात तुम्हाला राजकारणात येऊन नेमकं काय करायचं आहे, हे क्लीअर हवं! उद्देश स्पष्ट हवा…कळलं?’’ भाईसाहेबांनी पुढला मुद्दा चर्चेला घेतला. घेतला कसला पुढ्यात ओढलाच! उद्देशाशिवाय राजकारण संभवतच नाही.

आमच्या ओळखीचा एक कार्यकर्ता केवळ बिर्याणी (फुकट) खायला मिळते, म्हणून निवडणुकीच्या कार्यक्रमात सहभागी झाला. बिर्याणी हा त्याचा एकमेव उद्देश होता. पण पुढे तो मंत्रीपदापर्यंत पोचला. उद्देश मागे पडला! हे नेहमी असे होते. लोक उद्देशापासून भरकटतात…

‘‘सर्वांत महत्त्वाची असते ती विचारधारा!,’’ घाम पुसत भाईसाहेब म्हणाले. फाल्गुन नुकताच सुरु झाल्याने आम्हालाही घामाच्या धारा लागल्या होत्या. पण त्या नुसत्याच घामाच्या, विचारधारा वेगळ्या असतात!!

‘‘विचारधारा नसेल तर माणसाने राजकारणाच्या फंदात पडूच नये! नुसती विचारधारा असूनही काही उपयोगाची नाही, विचारधारेला धारही हवी!,’’ भाईसाहेबांनी राजकारणाची प्रमुख अट सांगितली. आमचा हात नकळत हनुवटीकडे गेला. सकाळीच धारदार ब्लेड लागले होते…

‘‘एकंदर राजकारण हा पोरखेळ नसून एकप्रकारचे व्रत आहे तर..,’’ आम्ही भक्तिभावाने म्हणालो. नीतिमत्ता काय, उद्देश काय, विचारधारा काय…बरेच काय काय! प्रकरण अवघड आहे, एवढेच कळले. मनात आले, एवढ्या एवढ्या खोक्यात काय काय मावते? लोकशाही चिरायू होवो!!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()