क्रिकेट हा अनिश्चिततेचा सदाबहार खेळ असून खेळात हारजीत महत्त्वाची नसते. कुणीतरी जिंकते, कुणीतरी हारते. त्यात येवढे काय मोठेसे? कुणीही जिंको अथवा हरो, खेळ आणि खेळाडूवृत्ती हमेशा जिंकली पाहिजे! तुम्ही कसे जिंकलात किंवा कसे हरलात, याला काही किंमत नाही.- कसे लढलात हे महत्त्वाचे! खेळामध्ये नशिबाचाही भाग असतो. एखाद्या दिवशी नशीब तुमच्या बाजूने नसेल, तर जिंकण्याचे कितीही प्रयत्न केले तरी व्यर्थ आहे!
...गेल्या दोन रात्री या सुविचारांच्या जोरावरच तळमळत काढल्या आहेत. दिवसभर काहीतरी हुळहुळते, जळजळते आहे. ऐतवारी आम्ही किती जामानिमा करुन ठेवला होता. इष्टमित्रांशी संधान बांधून ठेविले होते. पार्टीची जय्यत तयारी झाली होती. दिवाळीतील उरलेल्या चकल्या, शेवचिवडा (तोही उरलेलाच) असे जिन्नस जमा ठेवले होते. गिलासे धुऊन स्वच्छ ठेविली होती. पण...पण...अहह! गावभर हिंडलो, आनि हुंबऱ्यान हापाटलो’ असे झाले...
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताची हार की हो झाली. वास्तविक अमदाबादेतील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघ हारेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. -तेदेखील साक्षात त्या स्टेडियमच्या नावाचा धनी उपस्थित असताना!!
सामना संपल्यानंतर त्यांच्या मुद्रेवर उमटलेली कळ आमच्या नजरेतून चुकली नाही. पण अखेर बाजी मारली त्या मस्तवाल कांगारु संघाने. ज्या करंडकाची आम्ही स्वप्ने पाहिली, त्यावर पाय ठेवून ते आरामात बसले! एक बरे झाले की आम्ही एकंदर रागरंग बघून सायंकाळीच जेवून घेतले!
शेवचिवडा, चकल्या पुन्हा डब्यात गेले, आणि ग्लासे फळीवर! दु:खद निरोप पोहोचवणारा आला की आधी घरच्यांना ‘जेवून घ्या’ असा सल्ला देतो, तद्वत आम्ही इष्टमित्रांनाही फोन करुन ‘जेवून घ्या रे बाबांनो’ असा सावधगिरीचा इशारा देऊन ठेवला.
क्या सोचा था, क्या हो गया? ...आम्हीच कमी पडलो! मागल्या न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीच्या वेळी आम्ही जेवत असताना विराट कोहली फलंदाजीला आला. त्याचे विक्रमी शतक पुरे होईपर्यंत आम्हाला जेवत राहावे लागले. पानावरुन उठलो असतो, तर स्वारी परतली असती, या भयाने आम्ही त्यादिवशी मोजून त्रेचाळीस पुऱ्या खाल्ल्या.
अजीर्ण पर्वडले, पण पराभव नको. आमच्या असीम त्यागामुळेच भारतीय संघ अंतिम लढतीत पोहोचू शकला होता. त्याआधी साखळी सामन्यात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आम्ही एकाच पोझिशनमध्ये बसून तीनशे चेंडू पडताना बघितले. मान अवघडली होती, पण पोझिशन बदलली असती, तर मैदानात अनर्थ घडता!!
काल आमचे थोडे दुर्लक्ष झाले. डावा पाय उजव्या गुडघ्यावर ठेवला की विकेट जाते हे माहीत असूनसुद्धा आम्ही तसे रेलून बसलो, आणि बिचाऱ्या शुभमन गिलने झेल दिला. श्रेयस अय्यर हा एक बिकट फलंदाज आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे.
कुठल्याही पोझिशनमध्ये बसलो, तरी लेकाचा विकेट टाकतो. याचे काय करावे, कळत नाही. मोहम्मद शमी हा मात्र आमचा विश्वासू गोलंदाज आहे. टीव्हीकडे पाठ करुन ओणवे उभे राहिल्यास तो हमखास विकेट घेतो, असा आमचा अनुभव आहे. रविवारी आम्ही कंबर दुखेपर्यंत ओणवे उभे राहिलो, पण शमीची अस्त्रे निष्प्रभ ठरली...
सायंकाळी सात त्रेचाळीसनंतर भारताचा डाव सावरेल, अशी भविष्यवाणी आम्ही शेजारच्या होराभूषण बंटीशास्त्री चौगुले यांच्याकडून ऐकली होती, पण मेषेतील रविने घोळ घातल्याचे त्यांनी नंतर सांगितले. जाऊ द्यात. एवढे तोडगे करुनही पराभव पदरात पडल्यानंतर आता आम्ही एकच वाक्य घोकत आहो- क्रिकेट हा अनिश्चिततेचा सदाबहार खेळ आहे! क्रिकेट हा अनिश्चिततेचा सदा...बहा...हा...हा...र ख..खे.. अहहहहह!!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.