प्रिय महाशक्ती मोदीजी, सादर प्रणाम, आज गुरुपुष्यामृत योग!! त्यानिमित्तानं आपणांस (वांकवांकून विनम्र वंदन!) आपल्या अनुज्ञेनुसार काल गुवाहाटीला जाऊन आलो. श्रीमाता कामाख्यादेवीमातेचे दर्शन घेतले. आपण सांगितल्याप्रमाणे नवसदेखील बोललो आहे. उजवा कौल मिळाला. काम होणार, असे तेथील पुजाऱ्याने खूण करुन सांगितले. मी खुश आहे.
ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात (किंवा पुष्य चंद्र नक्षत्रात) येतो, त्यादिवशी काहीतरी मंगलकार्य करावे असे म्हटले जाते. काय करावे कळत नव्हते. सोन्यानाण्यात, वाहनखरेदीत मला काही इंटरेस्ट नाही. पंचांगात पाहिले तर ‘जावळ करावे’ अशी सूचना दिसली. मी पंचांग मिटले. माझ्यासाठी हा गुरुपुष्यामृत योग नसून गुरुशिष्यामृत योग आहे!! (आमच्या मराठी भाषेला तुम्ही अभिजात दर्जा दिल्यानंतर मला चांगली चांगली वाक्ये सुचू लागली आहेत, त्याचे हे एक उदाहरण. कसे आहे?) असो.