लोकनेते भय्यासाहेब वाघमारे यांना महाराष्ट्रात कोण ओळखत नाही? सारेच ओळखतात. तरीही त्यांची नव्याने ओळख आम्ही करुन देत आहो, कारण त्यांचा नव्याने निर्माण झालेला दबदबा होय. त्यांच्या कामाचा झपाटा अचंबित करणारा आहे, उत्साह च्याट पाडणारा आणि आणि ताकद तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. ‘दोन दिले, दोन घेतले’ हे तर सरळ राजकारण झाले. पण लो. भ. वा. यांचा फक्त ‘दोन दिले’ या दोनच शब्दांवर भर असतो. त्यांच्याइतका दानशूर नेता गेल्या दहा हजार वर्षात ना झाला, ना होईल.
लोकशाहीची बूज राखायची असेल तर दंडात ताकद राहिली पाहिजे, या उदात्त विचाराने लो. भ. वा. यांनी कधी व्यायामशाळा चुकवली नाही. सभागृहातील चर्चा-भाषणांचा मात्र त्यांना विलक्षण कंटाळा येतो. शब्द बापुडे केवळ वारा! नुसती भाषणे देऊन का जनतेचे प्रश्न सुटतात? उलटसुलट चर्चेचे गुऱ्हाळ घालण्याऐवजी सभागृहात एक रिंगण आखून रीतसर दंगल आयोजित करावी, आणि नॉकऔट पद्धतीने प्रस्ताव मंजूर करावेत, अशी त्यांची मौलिक सूचना होती. पण सरकारी लाल फितीच्या कारभारामुळे ती तूर्त अडकून पडली आहे. वेळवखत पाहून हा प्रस्ताव कुठल्याही परिस्थितीत पारित करुन घेण्याचा लो. भ. वा. यांचा मानस आहे. आणि त्यात ते नक्कीच यशस्वी होतील, असा विश्वास वाटतो.
परवा ऐन सभागृहाच्या पायऱ्यांवर असेच काहीसे घडले. विरोधकांनी त्यांच्याविरोधात अचकट विचकट घोषणा दिल्या. काहीतरी ‘खोके खोके’ असे लो. भ. वां.ना ऐकू आले. मग मात्र त्यांनी मस्तवाल विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींना चांगलाच धडा शिकवला. सरळ अंगावर झेप घेऊन त्यांनी दोन-चार विरोधी प्रतिनिधींना अक्षरश: लोळवले, तेव्हा लोकशाहीला किती अभिमान वाटला असेल!! लो. भ. वा. यांच्या या धाडसी कृत्यामुळे आज त्यांचे समाजात कौतुक होत आहे. टीव्ही वाहिन्यांनीही त्यांची ही रोमहर्षक फायटिंग दोनशेवीस वेळा स्लो मोशनमध्ये दाखवली!! विरोधकांनी आपल्यावर आक्रमण केले, हे खरे आहे का? असे विचारताच बाणेदारपणाने लो. भ. वा. म्हणाले, ‘‘हाड, ते काय करतील? मीच त्यांना वाजवली!’’ किती हे जाज्वल्य उद्गार!! किती हा झुंजार बाणा!! किती हा शूरपणा!!
...अशा शारिरीक संघर्षातही ते कधी हात आखडता घेत नाहीत. दोनच्या जागी वीसेक कानसुलीत मारण्याचा उमदेपणा त्यांच्या ठायी आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकांनीच आपल्याला निवडून पाठवले आहे, याची जाणीव त्यांच्या मनात सदैव जागी असते. एखादे काम फायलींवर सह्या करुन पुरे करणे त्यांना वेळकाढूपणाचे वाटते. ‘सरळ फोन उचलावा, आणि अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन काम मार्गी लावावे,’ असा त्यांचा खाक्या आहे. फोन उचलण्यापेक्षा नुसता हात उचलल्यास अधिक वेगात काम होते, यावरदेखील लो. भ. वा. यांचा ठाम विश्वास आहे.
...माणसाने दिलखुलास असावे. काही संघर्ष निर्माण झाल्यास सरळ हाणाहाणी करुन विषय संपवावा, असे त्यांना प्रामाणिकपणाने वाटते. भाषणबाजी किंवा दांभिकपणामुळे लोकशाहीची हानी होते, असे ते नेहमी म्हणतात. चर्चेमुळे राष्ट्र वाढते हे साफ खोटे आहे. चर्चेपेक्षा चेचण्यावर भर दिला तर लोकशाही खऱ्या अर्थाने प्रगल्भ होईल, हा लो. भ. वा. यांचा विचार स्तुत्य आहे. हो की नाही मुलांनो? म्हणा, कृतिशील संघर्षनायक लो. भ. वा. यांचा विजय असो!
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.