ढिंग टांग : नीरव रात्री निरवानिरव...!

मी दुपारचा लंच नेहमी त्या रात्री पहाटे दोन वाजता घेतो! डिनर सकाळी!! मी हिंडणारा कार्यकर्ता आहे, घरात बसून राहणारा नाही, हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत झालं आहे!!
Dhing Tang
Dhing Tangsakal
Updated on

स्थळ : वर्षा, मलबार हिल, मुंबई. वेळ : मध्यरात्र. पात्रे : तीन!

भाईसाहेब : (पेपरमिंटची गोळी चघळत) दिवे लावा रे कुणीतरी!

दादासाहेब : (अंधारात बसल्या बसल्या) लागले तेवढे पुरेत! आहे तो अंधार बराय!

भाईसाहेब : (टॉर्च मारत) आलाय होय तुम्ही! मी तुमची वाट बघत होतो! थोड्या वेळात माझा लंच टाइम होईल!

दादासाहेब : (हादरुन) लंच टाइम?

भाईसाहेब : (खुर्चीत ऐसपैस बसत) मी दुपारचा लंच नेहमी त्या रात्री पहाटे दोन वाजता घेतो! डिनर सकाळी!! मी हिंडणारा कार्यकर्ता आहे, घरात बसून राहणारा नाही, हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत झालं आहे!!

दादासाहेब : (घड्याळाकडे चोरटी नजर टाकत) कशापायी बोलावलं होतं, येवढ्या मध्यरात्री? नानासाहेबांचा निरोप आला म्हणून तातडीनं निघालो!!

भाईसाहेब : (बिनधास्त) मलाही त्यांचाच फोन आला होता! असाल तिथेच राहा, मी येतोय, मी येतोय, मी येतोय!!...असेल काहीतरी सरकारी कामकाज! आपल्याला काय म्हाईत?

दादासाहेब : (काकुळतीला येऊन) सरकारी कामं दिवसाढवळ्या करायची असतात ना! मध्यरात्री कशाला? मला एकतर जाग्रणांची सवय नाही, पित्त खवळतं!!

भाईसाहेब : (कुजबुजत्या स्वरात) मला वाटतं की, मंत्रिमंडळ विस्ताराचं काहीतरी असणार!! त्याशिवाय एवढी अर्जंट मीटिंग कशाला बोलावतील?

दादासाहेब : (गंभीरपणाने) अधिवेशनही तोंडावर आलंय! बरीच कामं पडली आहेत! मला वाटलं, त्यासंदर्भात काही आहे की काय!! इतकं काय काय झालं, पण कधी मध्यरात्रीच्या मीटिंगा नाही केल्या! मी सकाळी लौकर उठतो ना!!

भाईसाहेब : (खोचकपणाने) पहाटे उठता वाटतं!!

दादासाहेब : (पहाटेचा उल्लेख झाल्यावर घाईघाईने विषय बदलत) नानासाहेब अजून आले नाहीत! त्यांनीच बोलावलं होतं, म्हणून आलो!! त्यांचाच पत्ता नाही! काय हे?

नानासाहेब : (घाईघाईने प्रवेश करत) हा आलोच! थेट नागपुरातून इथंच आलो! वेषांतर करायलाही वेळ मिळाला नाही!!

भाईसाहेब : (चिंतेने) माझी लंच टाइमची वेळ होत आली! कशाला अर्जंट मीटिंग बोलावली, काही कल्पनाच नाही!!

दादासाहेब : (घाई करत) पटापटा काम सांगा, कशापायी बोलावलं होतं? सकाळी लौकर उठायचं आहे!

नानासाहेब : (थक्क होत) मी बोलावलं होतं? छे, काहीतरीच!!

भाईसाहेब : (दुप्पट थक्क होत) आँ? तुम्हीच तर फोन करुन सांगितलं ना, बारा वाजता भेटू म्हणून!!

दादासाहेब : (तिप्पट थक्क होत) आता झाला का घोळ!! मलाही तुमचाच मेसेज मिळाला की ताबडतोब येऊन भेटा म्हणून!!

नानासाहेब : (मटकन खुर्चीत बसत) अरे कर्मा!! मला तुमचा मेसेज मिळाला, म्हणून मी धावत आलो!!

भाईसाहेब : (संशयानं) घरात बसून कारभार करणाऱ्या काही घरघुशांचं हे कारस्थान दिसतंय!

दादासाहेब : (दीर्घ सुस्कारा सोडत) हे वेगळंच प्रकरण आहे! कुणीतरी पैलवानी डाव टाकला आहे!!

नानासाहेब : (कपाळावरचा घाम पुसत) आता भेटलोच आहे तर भराभर सांगतो! उद्या सकाळी मी दिल्लीला चाललो आहे! मला मोकळं करा, अशी रिक्वेस्ट मी ऑलरेडी टाकली आहे! पण त्यात धोका आहे...

भाईसाहेब : कसला धोका? धोकाबिका काही नाही, महाशक्तीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे!! काय हो, दादासाहेब!

दादासाहेब : (विषण्णपणे) त्या आधारावरच तर जगतोय! धोका वगैरे काही नाही, सगळं संपलंय!! नानासाहेब तुमच्या विनंतीला केराची टोपली दाखवणार ती महाशक्ती! लिहून घ्या! धोका कसला?

नानासाहेब : (खोल आवाजात) ...पण समजा, माझी रिक्वेस्ट मंजूर झाली तर?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.