ढिंग टांग : आँख से आँख मिला...!

ढॅणटढॅऽऽण…मम्मा, आयम बॅक…अँड धिस टाइम विथ अ बँग!! हाहा!!
Dhing Tang
Dhing Tangsakal
Updated on

बेटा : (नेहमीपेक्षा दुप्पट उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण…मम्मा, आयम बॅक…अँड धिस टाइम विथ अ बँग!! हाहा!!

मम्मामॅडम : (हर्षभराने) शाब्बास, अशीच प्रगती करत रहा!! पण इथंच थांबू नकोस! अजून खूप मोठा पल्ला मारायचा आहे बरं! विरोधी बाकांवरुन सत्ताधारी बाकांवर जाशील, तो दिवस खरा!!

बेटा : (गोंधळून) मी कमळ पार्टीत जावं, असं तू सुचवत नाहीस ना?

मम्मामॅडम : (तिरस्काराने) शी:!! स्वप्नातसुद्धा येणार नाही माझ्या असलं काही! तुझी खरी हक्काची खुर्ची तुझ्यासमोर आहे, हे कायम लक्षात ठेव!!

बेटा : (अभिमानाने) आज मैं नेता विपक्ष बन गया हूं, माँ!!

मम्मामॅडम : (जावळ) काँग्रॅच्युलेशन्स, बेटा! आज देशाला खूप आनंद झाला असेल!

बेटा : (छाती काढून) एकसोचालीस करोड जनता की मैं आवाज हूं, माँ!!

मम्मामॅडम : (समाधानाने) आज मी तुझ्यासाठी पास्ता करीन हं!

बेटा : (दुखभऱ्या आवाजात) देशातल्या बेरोजगारांचा, शेतकऱ्यांचा, गरीबांचा मी आवाज आहे! हा आवाज दडपला जाणार नाही! अन्यायाविरुद्ध मी आवाज उठवीन!! दडपशाहीविरुद्ध रणशिंग फुंकीन! माझ्यासारखा विरोधक आता मोदीजींच्या डोळ्याला डोळा भिडवून बोलेल, तेव्हा त्यांना ऐकावंच लागेल!!

मम्मामॅडम : (हरखून) खरंय!!

बेटा : (एकदम काहीतरी आठवत) आज समोरच मोदीजी आले! अगदी दोन फुटांवर!! इतक्या जवळून त्यांना पहिल्यांदाच पाहिलं!!

मम्मामॅडम : (कोरडेपणाने) त्यात काय आहे बघण्यासारखं?

बेटा : (दुर्लक्ष करत) त्यांनी मला शेकहँडसुद्धा केला!!

मम्मामॅडम : (उत्सुकतेनं) मग?

बेटा : मग काय? मलाही करावा लागला!! बाकी गृहस्थ बरे

वाटले बोलायला!! मला ‘पहले आप’ अशी खूणही केली त्यांनी!!

मम्मामॅडम : (रागारागाने) हुं:!! कळतात ही नाटकं! आणि आम्हाला म्हणतात, नौटंकी, नखरे करु नका म्हणून!!

बेटा : (गाणं गुणगुणत) दिल ये बेचैन वे, रस्ते पे नैन वे, सुर है ना ताल है…आजा सांवरिया…आ…आ…आ…आ…आंख से आंख मिलाऽऽ…हो हो!!

मम्मामॅडम (नापसंतीनं) असं नाहीए ते गाणं!

बेटा : (ठामपणाने) मी असंच म्हणणार ज्जा! माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही!!

मम्मामॅडम : (गंभीरपणाने) त्यांच्या वरवरच्या चांगल्या वागण्याला भुलू नका!! गोड बोलून गळा कापणारी माणसं आहेत ती कमळवाली!! महाराष्ट्रातल्या नेत्यांनी काय अनुभव सांगितले, ते काल ऐकलंस ना?

बेटा : (फुशारकी मारत) एवढं होऊनही मोदीजींनी माझ्या डोळ्याला डोळा नाही भिडवला! वो मेरी आंख से आंख मिला नही सकते! वो मुझसे डरते है!! मी आधीच बोललो होतो!!

मम्मामॅडम : (विजयी स्मित करत) आता त्यांच्यासमोरच बसणार आहेस, त्यांच्याकडे रोखून बघत घाबरव त्यांना!! कित्ती वर्षांनी हा चांगला दिवस उगवला आहे नै? आज काहीतरी गोडधोड करायला हवं!!

बेटा : (संविधानाची प्रत खिशातून काढत) आजपासून हाच माझा आहार! हेच माझं ध्येय!!

मम्मामॅडम : (घाईघाईनं विषय बदलत) यापुढे जबाबदारीनं वागायचं हं! सुट्टी, विपश्यना, पदयात्रा वगैरे काहीही करायचं नाही!!

बेटा : (नाराजीनं) याला काय अर्थय? इन फॅक्ट, मी सुट्टी मागायलाच आलो होतो! बऱ्याच दिवसात कुठं दौऱ्यावर गेलो नाहीए!!

मम्मामॅडम : (निक्षून) नो मीन्स नो…नेता विपक्ष कभी कहीं नहीं जा सकता!! नेता विपक्ष का दर्जा प्रधानमंत्री जितनाही होता है!!

बेटा : (हाताची घडी घालून) मग तर मला परदेश दौऱ्यावर जायलाच हवं!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.