दिवाळी आणि निवडणुकीचा माहौल एकमेकात मिक्स झाल्यामुळे सध्या महाराष्ट्राची अवस्था अतिफराळ खाल्ल्यानंतर होणाऱ्या अजीर्णासारखी झाली आहे. चिवडा, चकली, शेव आदी पदार्थ दिवाळीच्या काळात फराळ या नावाने ओळखले जातात. बाकी बारा महिने त्यांची स्वादओळख ‘चखणा’ अशी करुन दिली जाते. चखण्याचे व्यसन अति वाईट. तो आरोग्यास आणि यकृतास अपायकारक असतो. राजकारणातही हाच नियम लागू आहे. लोकशाहीचा फराळ अति झाला की अजीर्ण होते. तद्वत निवडणुकीचे अर्ज भरण्याचे दिवस असल्याने लोकशाही बोकाळली आहे. पक्षोपपक्षी बंडाळीचे वातावरण आहे. युती-आघाड्यांच्या राजकारणात मित्र पक्षच एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे करू लागले.