स्किझोफ्रेनियाच्या आजारावर मात करून अनेक जण बरे झालेले आहेत. काहीजण त्याच्याशी झुंजत आहेत. तथापि, अनुभवाचे बोल... आजारावर मात करण्यास उपयुक्त ठरतात. त्याला व्यासपीठ देण्याचा प्रयत्न ‘प्रोजेक्ट फिनिक्स’द्वारे होत आहे. जागतिक स्किझोफ्रेनिया दिन (ता.२४) नुकताच झाला. त्यानिमित्ताने.
कोणत्याही आजाराबाबतीत वैद्यकीय तज्ज्ञांचे उपचार आणि त्यात होणाऱ्या सुधारणा महत्त्वाच्या असतातच. परंतु रुग्ण हा केवळ उपचारांनी बरा होत नसतो. उपचारांबरोबरच ज्या वातावरणात तो राहत असतो ती परिस्थिती पोषक, प्रोत्साहन देणारी, सकारात्मक,मार्गदर्शक आणि सामावून घेणारी अशी असेल तर रुग्णांमध्ये सुधारणा जास्त चांगली होऊ शकते. अनेक शारीरिक आजारांच्या बाबतीत ही गोष्ट अधोरेखित झालेली आहेच.
मानसिक आजारांच्या बाबतीत उपचार न घेणाऱ्यांच्या टक्केवारीला म्हणजे ‘ट्रीटमेंट गॅप’ला सहसाअधोरेखित केले जाते. भारतामध्ये मानसिक आजारांच्या बाबतीत ट्रीटमेंट गॅप आहेच, परंतु त्याहीपेक्षा मोठे अंतर पोषक सामाजिक वातावरणाच्या अभावाचे आहे आणि हे अंतर सहसा अधोरेखित होत नाही.
समाजाचा कलंकित दृष्टिकोन, अगदी मूलभूत माहितीचा देखील अभाव आणि गैरसमज, नोकरी आणि दैनंदिन व्यवहारांमध्ये नाकारलेपण, मानवी हक्कांची पायमल्ली, खासगी आणि सार्वजनिक जीवनात मानसिक आजारांची सहजपणे होणारी थट्टा मस्करी, रुग्ण आणि कुटुंबीयांचे समाजापासून तुटलेपण, स्वत:मध्ये सुधारणा करण्यासाठी रुग्ण/कुटुंबीयांना मार्गदर्शन, संधी आणि मोकळेपणाचा अभाव या सर्व गोष्टी या पोषक वातावरणाच्या अभावाच्या द्योतकच आहेत.
हे अंतर भरून काढण्यासाठी एकलव्य फाउंडेशनमार्फत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम आखले जात आहेत. पालकांसाठी प्रशिक्षणशिबिर व त्यांचे स्वमदत गट, आजाराशी संघर्ष, व्यथा आणि यश काव्यातून व्यक्त करण्यासाठी बहर उपक्रम, कलंक निर्मूलनासाठी प्रत्यक्ष अनुभवाधारित स्टिच उपक्रम असे विविध उपक्रम एकलव्य मॉडेलमध्ये आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘प्रोजेक्ट फिनिक्स’.
शाळेमधल्या धड्यामध्ये ॲलेक्स डग्लस बेडर यांची कथा अनेकांना स्मरते. अपंग तसेच सर्वसामान्य लोकांना जसे अशा कथेतील रंजकता, सत्य, धाडस आणि विजिगिषी वृत्ती यातून प्रेरणा मिळते. तशा तुरळक कथा देखील मानसिक आजारी व्यक्तींच्या बाबतीत उपलब्ध नाहीत. अशा कथा अत्यंत उपयुक्त आणि उपचारात्मक (therapeutic) होऊ शकतात. हेच लक्षात घेऊन ‘प्रोजेक्ट फिनिक्स’ या उपक्रमाची आखणी आम्ही केली आहे.
मानसिक आजाराकडे बघण्याच्या समाजाच्या उदासीनतेमुळे ज्या व्यक्तींना आजार आहे ते किंवा त्यांचे कुटुंबीय हे कधीही पुढे येऊन इतरांना सहाय्यभूत होऊ शकले नाहीत. इतरांना मार्गदर्शन करणे तर जाऊ दे, पण जेव्हा त्यांच्यावर अन्याय झाला, जेव्हा त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत त्यावेळेला देखील या आजाराने पीडित लोक कधी एकत्र होऊन पुढे आले नाहीत. संघटित झाले नाहीत. मानसिक आजारी व्यक्तींची/कुटुंबीयांची कधी आंदोलने झाली नाहीत, मोर्चे निघाले नाहीत. एखाद्या सुधारणेला पाठिंबा देणारी मोहीम सुरू झाली नाही. एवढेच काय पण निनावी पत्रे देखील आली नाहीत.
अनुभव कथनासाठी व्यासपीठ
राष्ट्रीय स्तरावर मानसिक आजाराचा अनुभव घेतलेल्या आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही मोजक्याच व्यक्ती आज दिसून येतात. या व्यक्ती अंत:प्रेरणेने पुढे आलेल्या आहेत. सामाजिक कलंकाचे, दडपणाचे आणि भीतीचे वर्तुळ त्यांनी स्वतःचे आणि कुटुंबाचे बळ आणि त्यांचे सामाजिक व आर्थिक स्थान याच्या बळावर भेदले आहे.
परंतु आज महाराष्ट्रातच काय, भारतात देखील गंभीर मानसिक आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या शेकडो/हजारो व्यक्ती आहेत. सुधारण्याच्या वाटेवर असणाऱ्या अनेकांना अशा प्रगतीची गंधवार्ता देखील नाही. या हजारो लोकांपैकी कित्येक जणांना स्वतःच्या अनुभवाचा इतरांना फायदा व्हावा असे निश्चित वाटत असेल.
परंतु ते कसे करावे, कोठे करावे, सुरुवात कशी करावी, त्यामुळे भविष्यात काय प्रश्न येतील हे प्रश्न त्यांना पडले असतील. ‘एकलव्य’ने नेमकी हीच गरज हेरून अनेकांना अनुभव वाटण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या संदर्भात एकलव्य फाउंडेशनशी (९०९६८२७९५३) जरूर संपर्क साधावा.
आजपर्यंत अनौपचारिकपणे काही रुग्णांनी ‘एकलव्य’कडे स्वत:च्या कथा देणे, त्यावर चर्चा होणे आणि इतरांनी प्रेरणा घेणे या गोष्टी चालूच आहेत. परंतु ही प्रक्रिया अनौपचारिक न ठेवता त्याला औपचारिक, सार्वत्रिक व उपचारात्मक स्वरूप यावे या इच्छेने हा उपक्रम पार पाडला जात आहे.
प्राज फाऊंडेशनचे अर्थसाहाय्य असणाऱ्या ‘प्रोजेक्ट फिनिक्स’साठी गंभीर आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णांना त्यांच्या सुधारणेकडे केलेल्या प्रवासाच्या कथा देण्याचे आवाहन करत आहोत. या रुग्णांबाबतीत आजाराची सुरुवात, लक्षणे, सुरुवातीचा त्रास, केलेला संघर्ष, झालेले चढउतार, वैद्यकीय उपचार, स्वतः केलेले प्रयत्न, समाजाचा आलेला अनुभव अशा गोष्टी या प्रवासाच्या कथेमध्ये अपेक्षित आहेत.
त्या वाचून सुधारणेच्या वाटेवर असलेल्या अनेकांच्या आशा पल्लवीत होतील, स्वतःच्या प्रयत्नाचे आणि योग्य दृष्टिकोनाचे महत्त्व त्यांना समजेल, कुटुंबीयांना देखील त्यांच्या योगदानाचे महत्त्व समजेल, अशी या उपक्रमातून अपेक्षा आहे.
(लेखक एकलव्य फाऊंडेशन फॉर मेंटल हेल्थचे अध्यक्ष आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.