‘ती’ला डावलण्याची अशीही परंपरा

shahaji more
shahaji more
Updated on

येत्या दहा डिसेंबरला तीन महिलांना नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. पण सर्वसाधारणपणे अन्य क्षेत्रांप्रमाणेच विज्ञान-संशोधन क्षेत्रातही महिलांना डावलले जाते. नोबेल पारितोषिकही त्याला अपवाद नाही, उलट तेथे तर लिंगभाव पक्षपात ठळकपणे जाणवतो, असे दिसून आले आहे.

द रवर्षी ऑक्‍टोबरच्या पूर्वार्धात नोबेल पारितोषिक विजेत्यांची नावे जाहीर होतात व दहा डिसेंबरला- नोबेल पारितोषिकांचे प्रणेते आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिदिनी पारितोषिकांचे वितरण होते. दरम्यानच्या काळात जगभर नोबेल पारितोषिकांच्या विविध पैलूंविषयी जगभर चर्चा होते. (नोबेल पारितोषिकांबाबत तसे पाहिले तर सततच चर्चा चालू असते.) तब्बल ५५ वर्षांनी यंदा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक एका महिलेला देण्यात येणार आहे. त्यामुळे या वर्षी महिला आणि नोबेल पारितोषिके यावर चर्चा होत आहे. भरीत भर म्हणजे नोबेल पारितोषिके जाहीर होण्यापूर्वी एक दिवस आधी ‘सर्न’ (युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्‍लियर फिजिक्‍स) मधील भौतिकशास्त्रज्ञ अलेक्‍झांडर स्ट्रॉमिया यांनी ‘भौतिकशास्त्राचा शोध व विकास पुरुषांनीच केला आहे, महिलांचा त्यात काहीही सहभाग नाही,’ असे विधान केले होते. स्ट्रॉमिया यांची त्यामुळे ‘सर्न’मधून हकालपट्टी झाली असली, तरी त्यांचे विधान काय दर्शविते?

नोबेल पारितोषिके १९०१ पासून दोन महायुद्धांचा काळ वगळता बहुधा दरवर्षी दिली गेली आहेत. विज्ञानाच्या भौतिक, रसायन व वैद्यकशास्त्र या तीन शाखांमध्ये नोबेल पारितोषिके दिली जातात. १९०१ ते २०१८ या कालावधीत या तीन शाखांमध्ये एकूण ६०७ नोबेल पारितोषिके ६०४ व्यक्तींना दिली गेली. (मेरी क्‍युरी, फ्रेडरिक सॅंगर व जॉन बार्डीन यांना प्रत्येकी दोन नोबेल पारितोषिके देण्यात आली. शिवाय लायनस पॉलिंग यांना रसायनशास्त्र व शांतता यासाठी दोन नोबेल पारितोषिके देण्यात आली आहेत.) या ६०७ नोबेल पारितोषिकांपैकी केवळ २० पारितोषिके १९ महिलांना देण्यात आली आहेत. (मेरी क्‍युरींना दोन नोबेल पारितोषिके.) भौतिकशास्त्रात २०९ व्यक्तींना २१० नोबेल पारितोषिके देण्यात आली आहेत; परंतु केवळ तीन महिला विजेत्या ठरल्या आहेत. रसायनशास्त्रात १८० व्यक्तींना १८१ ‘नोबेल’  (फ्रेडरिक सॅंगर यांना दोन वेळा) देताना केवळ वैद्यकशास्त्रात (फिजिऑलॉजी अँड मेडिसिन) एकूण २१६ शास्त्रज्ञांना केवळ १२ महिला शास्त्रज्ञांसह ‘नोबेल’ देण्यात आली आहेत.

विषयानुसार एकूण विजेते व महिला विजेत्यांची संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे ः भौतिकशास्त्र ः २१० व ३, रसायनशास्त्र ः १८१ व १२, वैद्यकशास्त्र ः २१६ व १२. यावरून तीन टक्केच महिलांना विज्ञानातील नोबेल पारितोषिके देण्यात आली आहेत, असे दिसते. एकूण विजेत्यांमध्ये केवळ तीन टक्केच महिला असू शकतात, म्हणजे काय? महिलांना डावलले जाते की महिला पुरुषांएवढ्या सक्षम नसतात? आजवरचा इतिहास पाहिला, तर प्रकर्षाने लक्षात येते, की सर्वच क्षेत्रांत महिलांना डावलले जाते. विज्ञान-संशोधन क्षेत्रही त्याला अपवाद नाही व नोबेल पारितोषिकही अपवाद नाही. उलट तेथे तर लिंगभेद ठळकपणे जाणवतो. आजवर अनेक महिला शास्त्रज्ञांच्या पुरुष सहकाऱ्यांना ‘नोबेल’ देऊन गौरविल्याची (महिला शास्त्रज्ञांना डावलून) अनेक उदाहरणे आहेत. जोसेलीन बेल बर्नेल या महिला शास्त्रज्ञाने स्पंदन तारा किंवा ‘पल्सार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या (अवकाशातील) पिंडाचा शोध लावण्यात अनन्यसाधारण भूमिका बजावली. परंतु, त्याविषयीचे ‘नोबेल’ १९७४ मध्ये त्यांचे पीएच.डी.चे मार्गदर्शक अँथोनी ह्युईश व त्यांचे सहकारी मार्टिन रॅली यांना देण्यात आले. खरे तर या विषयीच्या शोधनिबंधात ह्युईश यांचे नाव प्रथम, तर जोसेलीन बेल यांचे नाव दुसरे होते. नोबेल पारितोषिकासाठी संभाव्य विजेत्यांच्या नावाची इतरांनी शिफारस करावयाची असते. जोसेलीन यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती किंवा नाही ते ५० वर्षांनंतर म्हणजे २०२४ पर्यंत कळू शकणार नाही. कारण शिफारशींचा तपशील ५० वर्षे गुप्त ठेवायचा असतो. शिफारस करूनही बेल यांना ‘नोबेल’ मिळत नसेल तर नोबेल समिती व शिफारसच कोणी केली नसेल तर तत्कालीन भौतिकशास्त्रज्ञ लिंगभेदी होते, असे म्हणण्यास वाव आहे.  व्हेरा रुबीन या अमेरिकी महिला शास्त्रज्ञाने अफाट संशोधन करून डार्क मॅटर (कृष्ण पदार्थ)वर प्रचंड प्रकाश टाकला. कृष्ण पदार्थांचे अस्तित्व सिद्ध करण्यात त्यांचे संशोधन महत्त्वपूर्ण ठरले. त्यांच्या नावांची शिफारस ४८ वेळा करण्यात आली होती. परंतु, त्यांना ‘नोबेल’ मिळाले नाही. २०१६ मध्ये त्यांचे निधन झाले. मरणोत्तर ‘नोबेल’ दिले जात नाही. याला लिंगभेद नाही तर काय म्हणावे? १९६२ चे वैद्यकीय नोबेल पारितोषिक ‘डीएनए’च्या रचनेचे गूढ उकलल्याबद्दल फ्रान्सिस क्रिक, जेम्स वॅटसन व मॉरिस विल्किन्स यांना देण्यात आले. या संशोधनात फ्रॅंकलिन रोझलिंड या महिला शास्त्रज्ञाचे योगदान तितकेच महत्त्वाचे (किंबहुना अधिकच) होते. याविषयीच्या शोधनिबंधात रोझलिंड यांचे नाव लेखकांमध्ये टाकण्याऐवजी फ्रॅंकलिन रोझलिंड यांनी मिळविलेल्या माहितीवरून अशी तळटीप टाकली. रोझलिंड यांचे १९५८ मध्ये निधन झाले. त्यामुळे त्यांचे नाव लेखकांच्या नावात असते, तरी त्यांना ‘नोबेल’ मिळाले नसते. परंतु, त्यांचे नाव वगळण्याला काय म्हणायचे?

अणुभंजन (न्यूक्‍लियर फिशन) प्रक्रियेच्या शोधाबद्दल जर्मन शास्त्रज्ञ ओहो हान यांना १९४४ चे रसायनशास्त्रातील ‘नोबेल’ मिळाले. परंतु, त्यांच्यासोबत संशोधनाबाबत तितकाच महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या लिझ माईटनर यांना ‘नोबेल’ दिले गेले नाही; याचा अर्थ काय? १९०३ चे भौतिकशास्त्रातील ‘नोबेल’ मिळाले ते हेन्री बेक्वेरेल व त्यांचे विद्यार्थी मेरी क्‍युरी व पेअरी क्‍युरी यांना. पेअरी क्‍युरी यांना नोबेल समितीतील सदस्य गोस्ता मिताज लॅफ्लर यांनी पत्र पाठवून कळविले, की मेरी क्‍युरींच्या नावाची शिफारस करण्यात आलेली नाही. तेव्हा पेअरी क्‍युरींनी जाहीर केले, की मेरी क्‍युरींना पारितोषिक मिळणार नसेल तर मीही ते स्वीकारणार नाही. १९०३ चे भौतिकशास्त्रातील ‘नोबेल’ अखेर मेरींना मिळालेच, शिवाय पुढे त्यांना एकट्यांना १९९१ चे रसायनशास्त्रातील ‘नोबेल’ मिळाले. दोन ‘नोबेल’ मिळविणाऱ्या जगाच्या व नोबेल पारितोषिकांच्या इतिहासात त्या एकमेव महिला होत.

या वर्षी तीन महिलांना नोबेल पारितोषिके देण्यात येणार आहेत. त्यापैकी एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांना शांततेसाठीचे ‘नोबेल’ देण्यात येणार आहे. भौतिकशास्त्रातील या वर्षीच्या विजेत्या डोना स्ट्रिकलॅंड या कॅनडातील वॉटर्लू विद्यापीठात प्राध्यापक आहेत. आजकाल ‘विकिपिडिया’ या इंटरनेटवरील माहितीकोशात अनेकांची माहिती क्षणार्धात मिळू शकते. नोबेल पारितोषिक जाहीर होण्यापूर्वी ‘विकिपिडिया’ने स्ट्रिकलॅंड यांचे प्रोफाइल पेज त्या फारशा प्रसिद्ध व्यक्ती नाहीत, अशी सबब देऊन बनविण्यास नकार दिला होता. याचा अर्थ काय? आजही जेवढे पुरुषांना स्वातंत्र्य व संधी आहेत, तेवढ्याच महिलांना असल्या, तरी त्यांच्यावर काही मर्यादा येतातच किंवा त्या त्यांनी घालून घेतलेल्या असतात. यामध्ये महिला शास्त्रज्ञही आल्या. शिवाय महिला शास्त्रज्ञांचा लोकसंग्रह किंवा ‘नेटवर्क’ पुरुष शास्त्रज्ञाएवढा समृद्ध असतोच असे नाही. नोबेल पारितोषिकासाठी असा लोकसंग्रह  महत्त्वाचा असतो; कारण नोबेल पारितोषिकासाठी शिफारस करावयाची असते.
नोबेल पारितोषिक विजेते निवडणाऱ्या समित्यांनी प्रत्येक विषयासाठी किती महिला शास्त्रज्ञांचे नामांकन करण्यात आले आहे ते जाहीर करावे म्हणजे या समित्या लिंगभाव विषमतेला महत्त्व देतात की शास्त्रज्ञांना ते जगालाही कळून येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.