भविष्यवेध : कृत्रिम जीवाच्या दिशेने

भविष्यात विज्ञान काय करू शकते, याविषयी कथा-कादंबऱ्यांत कल्पना मांडल्या जातात. मानवी भावभावनांचा अंतर्भाव करून कथानक गुंफले जाते.
artificial organism
artificial organismsakal
Updated on
Summary

भविष्यात विज्ञान काय करू शकते, याविषयी कथा-कादंबऱ्यांत कल्पना मांडल्या जातात. मानवी भावभावनांचा अंतर्भाव करून कथानक गुंफले जाते.

भविष्यात विज्ञान काय करू शकते, याविषयी कथा-कादंबऱ्यांत कल्पना मांडल्या जातात. मानवी भावभावनांचा अंतर्भाव करून कथानक गुंफले जाते. वैज्ञानिक प्रगतीनुसार कालांतराने काही भाकिते प्रत्यक्षात उतरतात, तर काहींसाठी प्रतीक्षा करावी लागते. सध्या वैज्ञानिक प्रगतीचा वेग आश्चर्यकारक वाटावा इतका असल्याने विज्ञानकथांमधील भाकिते व ती प्रत्यक्षात येण्यास लागणारा वेळ कमालीचा घटला आहे. अनेक विज्ञानकथा प्रत्यक्षात येत आहेत. अशीच एक विज्ञानकथा काहीशा वेगळ्या स्वरुपात प्रत्यक्षात येऊ घातली आहे.

गर्भधारणेसाठी एक स्त्रीबीज व शुक्रजंतू एकत्र यावे लागतात.परंतु आता शास्त्रज्ञांनी वेगळेच मार्ग शोधले आहेत. स्तंभ पेशी ( स्टेम सेल्स ) सुयोग्य अशा परिस्थितीत विभाजित होतात व स्वत:च गर्भाच्या स्वरुपात रुपांतरित होतात. शास्त्रज्ञांच्या दोन गटांनी, ‘सेल’ व ‘नेचर’ या दोन विज्ञान शोधपत्रिकांमध्ये शोधनिबंध लिहिले असून, त्यात दावा केला आहे की, कृत्रिमरित्या उंदरांचे गर्भ निर्माण करून ते साडेआठ दिवस विकसित होण्यासाठी जिवंत ठेवण्यात आले होते. आतापर्यंत कृत्रिमरित्या निर्माण केलेले गर्भ इतके दिवस जिवंत ठेवता आले नव्हते.दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या कृत्रिम गर्भांमध्ये अवयवही निर्माण झाले होते. धडधडणारे हृदय, पाचनसंस्थेसाठी एक नलिका आणि चेतातंतूचे जाळे इ. निर्माण झाले होते. दोन्हीही आश्चर्यकारक!

ही प्रक्रिया पूर्ण निर्दोष नव्हती. अगदी थोड्या पेशींपासून असे अवयव निर्माण झाले होतेव तेही नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या गर्भासारखे नव्हते. परंतु अवयव कसे निर्माण होतात याचे सूक्ष्म आकलन शास्त्रज्ञांना होण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. इस्त्राईलमधील ‘वाईझमन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स’, रेहेवोत येथील स्तंभपेशीशास्त्रज्ञ (स्टेम सेल सायंटिस्ट) जेकब हॅना हे गेली चार वर्षे याविषयी संशोधन करीत आहेत. त्यांनी गेल्या वर्षी गर्भाशयाबाहेर गर्भ जास्तीत जास्त दिवस वाढू शकेल असे एक उपकरण बनविले आहे. त्यांनी हे उपकरण व काही शास्त्रज्ञांबरोबर वापरण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ब्रिटनच्या केम्ब्रिज विद्यापीठाशी व अमेरिकेतील पॅसाडिना येथील ‘कॅलिफोर्निया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी’ येथील स्तंभपेशी विकासशास्त्रज्ञ मॅग्डालेना झेर्निका - गोट्झ यांना त्यांच्या दहा वर्षांच्या परिश्रमास यश प्राप्त झाले. काही वर्षांपूर्वी मॅग्डालेना झेर्निका - गोट्झ यांना असे आढळून आले की, गर्भावस्थेतील स्तंभपेशी वापरल्या तर अगदीच प्रारंभिक वाढ होते व पुढील वाढ होऊ शकत नाही. परंतु त्यात प्रौढ स्तंभपेशी वापरल्या तर गर्भ नलिका व गर्भाभोवती एक द्रावण असते ते धरून ठेवणारी पिशवी निर्माण होण्यास मदत होते. त्यांच्या या तंत्राच्या सहाय्याने त्या कृत्रिम गर्भ कृत्रिम वातावरणात तब्बल सात दिवस जिवंत ठेवण्यात यशस्वी झाल्या. त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधानुसार हा कालावधी त्यांनी आणखी दीड दिवसांनी वाढवून एक विक्रमच साधला होता. उंदरांमध्ये गर्भाधारणेपासून विणीपर्यंतचा काळ (गेस्टेशन पिरियड ) २० दिवसांचा असतो.

उंदरांच्या गर्भवाढीच्या दृष्टीने ८.५ दिवस एवढा काळ मेंदू विकसित होण्यासाठी, हृदयाची स्पंदने सुरु होण्यासाठी , चेतासंस्था व पचनसंस्थांची निर्मिती सुरु होण्यासाठी पुरेसा असतो. हे कृत्रिम गर्भ दिसायला स्त्रीबीज व शुक्रजंतू एकत्र आल्यानंतर निर्माण होणाऱ्या गर्भासारखाच असला तरी १०० टक्के तसा नसतो. ही संशोधने प्रसिद्ध झाल्यापासून वैज्ञानिक जगतात चर्चेचा विषय बनून राहिली आहेत. या कृत्रिम गर्भनिर्मितीचे नैसर्गिक गर्भनिर्मितीपेक्षा अनेक फायदे आहेत. ते गर्भाशयाच्या बाहेर वाढविले जात असल्यामुळे शास्त्रज्ञांना अगदी प्रारंभिक अवस्थेपासून गर्भसदृश गोळ्यास किंवा कृत्रिम गर्भास पाहणे, त्याचे निरीक्षण करणे सुलभ असते. जनुक संपादन तंत्राच्या सहाय्याने गर्भात अपेक्षित बदल करता येतात, या तंत्रामुळे गर्भनिर्मिती व गर्भ विकसनाचा गरजू लोकांसाठी अवयव, उती (टिश्यू) यांचा स्रोत निर्माण करता येऊ शकतो. परंतु हे तंत्र मानवासाठी वापरणे सोपे नाही.

संशोधकांनी स्तंभपेशींचे रूपांतरण पोकळ, जलद गतीने विभाजित होऊन संख्येने वाढणाऱ्या पेशींच्या गोळ्यांमध्ये व गर्भावाढीच्या प्रारंभिक टप्प्यात जे बदल होतात - पेशींचे थर निर्माण होणे इ. बदल घडवून आणले आहेत, परंतु मानवी अवयव निर्माण होण्याच्या टप्प्यास गर्भधारणेनंतर साधारण एक महिना लागतो. असा टप्पा गाठणे सध्या अशक्य असले तरी ते साध्य करणे फार दूरची गोष्ट नसेल असे काही शास्त्रज्ञ समजतात. याशिवाय नैतिकतेचाही प्रश्न आहेच! या कृत्रिमरीत्या निर्माण केलेल्या मांसाच्या जैविक गोळ्यांना ‘गर्भ’ म्हणता येते का? अमेरिकेतील इलिनॉइस राज्यातील स्कोपी येथील स्तंभपेशींविषयी संशोधन करणारी इंटरनॅशनल सोसायटी फॉर स्टेमसेल रिसर्च ही आंतरराष्ट्रीय संस्था कृत्रिमरीत्या गर्भाची वाढ १४ दिवसांपेक्षा जास्त दिवस करण्यास प्रतिबंध करते. मानवी गर्भावाढीचे १४ दिवस म्हणजे उंदरांच्या गर्भवाढीबाबत सहा दिवसच होतात. २०२१ मध्ये ही मर्यादा रद्द केली असली तरी अशा गर्भवाढीस ठोस व सद्सद्विवेकबुद्धीला पटेल असे कारण असले पाहिजे व त्याकरिता अशा गर्भाची संख्या किमान असली पाहिजे, अशा या संस्थेच्या मार्गदर्शक सूचना आहेत.

भविष्यात अवयव निर्मितीच्या टप्प्यापर्यंत कृत्रिमरीत्या गर्भ वाढविणे शक्य झाल्यास वाद अटळ आहेत. त्यावेळी सारासार विचार न झाल्यास हे संशोधन धोक्यात येऊ शकते. त्यासाठी सावधानतेने पावले टाकली पाहिजेत. २०१८मध्ये चीनच्या हे जियानकुई यांनी जनुक संपादन करून गर्भधारणा घडवून आणल्याबद्दल त्यांना कैद करण्यात आले होते. अल्डॉस हक्सले या इंग्रजी लेखकाने १९३२मध्ये लिहिलेल्या ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ या कादंबरीत २५४०मधील ‘सेन्ट्रल लंडन हॅचरिज अँड कंडिशनिंग सेंटर’ नावाची विचित्र प्रयोगशाळा कल्पिली आहे. तिच्यात बोकॅनोव्हास्की प्रक्रियेची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली जाते.

एका स्त्रीबीजापासून सर्वसाधारणपणे एक गर्भ तयार होतो व त्या गर्भापासून एक जीव किंवा एक अपत्य जन्मास येऊ शकते. हक्सले यांच्या कादंबरीतील प्रयोगशाळेत बोकॅनोव्हास्की प्रक्रियेमध्ये एका स्त्रीबीजास अनेक अंकुर फुटतात व त्या स्त्रीबिजाचे विभाजन होऊन आठ ते ९६ अंकुर असलेले गर्भाचे भाग तयार होतात. त्या प्रत्येक भागापासून एक एक गर्भ निर्माण होतो व प्रत्येक गर्भापासून एक एक जीव जन्मास येतो. त्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांचे रुपांतर तरुणांमध्ये झाल्यांनतर त्यांच्याकडून भयंकर कृत्ये घडवून आणली जातात.

त्यांच्याकडून ‘प्रज्ञावंत समाजरचना’ केली जाते.१९३२ मधील विज्ञानकथा सत्यात उतरते की काय अशी शंका घेण्यास वाव आहे. या कृत्रिमरीत्या वाढवलेल्या गर्भांना अनेक मर्यादा आहेत. ते काही नैसर्गिक वाढ झालेले गर्भ नाहीत. ते जरी गर्भावस्थेतील विकास दर्शवित असले तरी त्यांच्यापासून नैसर्गिक जीव जन्मास येऊ शकतो का हे अज्ञातच आहे. किंवा भविष्याच्या उदरात काय आहे ते अजून कोणास माहिती नाही. असे हे विचित्र संशोधन माणसाला निसर्गात ढवळाढवळ करू देणारे ठरेल. ते कितपत योग्य हे येणारा काळच ठरवील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.