देशभक्त केशवराव जेधे यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्याविषयी केलेल्या भाषणाचा संपादित अंश. य. दि. फडके यांनी लिहिलेल्या केशवरावांच्या चरित्राच्या पुनर्प्रकाशनाच्या कार्यक्रमात हे भाषण झाले होते.
देशभक्त केशवराव जेधे यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्याविषयी केलेल्या भाषणाचा संपादित अंश. य. दि. फडके यांनी लिहिलेल्या केशवरावांच्या चरित्राच्या पुनर्प्रकाशनाच्या कार्यक्रमात हे भाषण झाले होते.
महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात अनेक कर्तृत्ववान, उत्तुंग व्यक्तिमत्त्वं होऊन गेली. पण सर्वसामान्य माणसाशी ज्यांची नाळ जोडलेली आहे आणि त्या माणसांच्या मनात ज्यांच्याबद्दल अतीव आदर आहे, अशा मोजक्या व्यक्तींच्या मालिकेमध्ये देशभक्त केशवराव जेधे ऊर्फ तात्यांचा उल्लेख करावा लागेल.
भोर येथील कान्होजी जेधे यांनी शिवछत्रपतींनी उभारलेल्या लढ्यामध्ये योगदान देण्याची संधी कधीच सोडली नाही. केशवरावांनी कान्होजींचा हाच वारसा सामाजिक-राजकीय कार्याच्या माध्यमातून पुढे चालवला. जेधे कुटुंबीयांनी पुढे पुण्यात येऊन भांडी तयार करण्याचा कारखाना उभारला, ज्या वास्तूचा उल्लेख इतिहासात नेहमीच होतो, ती म्हणजे ‘जेधे मॅन्शन’. केशवरावांचे ज्येष्ठ बंधू बाबूराव जेधे सत्यशोधक चळवळीत अग्रेसर होते. त्यांच्या मनात ग्रामीण ब्राह्मणेतर चळवळींबद्दलचा विचार होता. बहुजन समाजातील शिक्षणप्रसाराबाबत ते आग्रही होते. कोल्हापूर संस्थानाचे राजर्षी शाहू महाराज असोत, ग्वाल्हेरचे खासेराव असोत, या सर्वांशी त्यांचा सुसंवाद होता. त्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, हे सूत्र बाबूराव जेधेंनी स्वीकारलं. मग अनेक संस्थांची उभारणी झाली. अखिल भारतीय शिक्षण परिषद असो, शिवाजी मराठा संस्था असो, किंवा अन्य संस्था असोत; याच्यामागे बाबूराव जेधेंचे आणि त्यांच्या विचारांना समर्थन देणाऱ्या पुण्यातल्या मोठ्या वर्गाचं योगदान आहे. केशवराव जेधे हे बाबूरावांचे कनिष्ठ बंधू. त्यांची मानसिकता बाबूरावांपेक्षा काही बाबतीत वेगळी असावी असं दिसतं.
केशवरावांना व्यवसायात फारसं स्वारस्य नव्हतं. आपला जन्म उपेक्षित समाजाच्या भल्यासाठी आहे, हे सूत्र त्यांनी मनात अखंड बाळगलं. ‘जेधे मॅन्शन’ या ठिकाणी सत्यशोधक-ब्राह्मणेतर चळवळीतील अनेक मान्यवर यायचे. केशवरावांना या मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी मिळायची. एका विशिष्ट कालखंडात त्यांच्यात ते रमले. त्याच काळात महाराष्ट्रात जवळकर नावाचे दुसरे एक परिवर्तनाची भूमिका घेणारे समाजसेवक होते. जेधे-जवळकर ही जोडी त्या काळी गाजली.
समाजातील ज्ञानाची मक्तेदारी ज्या मूठभर वर्गाच्या हातात होती, त्यांच्याशी संघर्षाची भूमिका जवळकरांची होती. त्या काळात पुण्यात गणपती उत्सव सुरू झाला. प्रस्थापित ‘गणेश मेळे’ आणि त्यांच्या प्रवर्तकांना विरोध करण्यासाठी केशवरावांनी काढलेल्या मेळ्याचं नाव होतं ‘छत्रपती मेळा’. जेधे-जवळकर यांना कायद्याच्या कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न जेव्हा झाला, तेव्हा एक निष्णात वकील त्यांच्यासाठी धावून आले; ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी हा खटला चालवला आणि जेधे-जवळकर यांची सुटका झाली. हा इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे.
केशवरावांचा कार्यकर्तृत्वाचा पहिला कालखंड जेधे-जवळकर; तर दुसरा कालखंड होता तो जेधे-गाडगीळ! केशवरावांनी सत्तेसाठी समाजाचा विचार कधीच सोडला नाही. पण आपल्या विचारधारेच्या माध्यमातून कुणाचा विद्वेष होत आहे का, हा विचार त्यांना अस्वस्थ करीत असे. त्या मनःस्थितीत त्यांनी काँग्रेसच्या चळवळीमध्ये सहभागी होण्याचे ठरवले. त्यावेळी देशात चळवळीचे वातावरण होते. निवडणुकांच्या राजकारणात यावं असं केशवरावांना वाटू लागलं. ते पुणे म्युनिसिपालटीच्या निवडणुकीत निवडून आले. तिथं दोन वर्ग होते : सनातनी लोकांचा ‘गायकवाड वाडा’ आणि दुसऱ्या बाजूला प्रागतिक विचारांचं ‘जेधे मॅन्शन’.
जेधे मॅन्शन आणि गायकवाड वाडा या दोन गटांमध्ये असलेलं वैचारिक अंतर पुण्याच्या म्युनिसिपालटीत सातत्याने दिसायला लागले. त्यातल्या पुरोगामी विचारांचं नेतृत्व हे केशवरावांकडे होतं. पुणे नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात शिक्षणाचा अधिकार मुलींनाही मिळायला हवा; सर्व जातिधर्माच्या लोकांना सार्वजनिक पाणवठे खुले व्हायला हवेत; मंदिरात सर्व जातिधर्मातील लोकांना प्रवेश मिळावा, असे अनेक क्रांतिकारी ठराव केशवरावांनी मांडले. त्यांपैकी काही नामंजूर व्हायचे. मग केशवरावांनी सार्वजनिक जीवनात शेवटी संघर्षाची भूमिका स्वीकारली. ते प्रत्यक्ष चळवळीत उतरले. पुढे महात्मा गांधींच्या नेतृत्वाचा आणि काँग्रेसचा विचार पुढं आला. बार्डोलीला सरदार पटेलांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सत्याग्रह केला. त्याला पाठिंबा दिला पाहिजे, ही भूमिका केशवरावांच्या मनामध्ये होती आणि त्यासाठी त्यांनी पुणे जिल्ह्यात अनेक जाहीर सभा घेतल्या. त्या सगळ्या सभांच्या माध्यमातून केशवरावांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले.
तुकडेबंदी, साराबंदी यासाठी केशवराव मैदानात उतरले आणि शेतकऱ्यांचं हित कशात आहे, ही भूमिका त्यांनी प्रकर्षांने मांडण्याचा प्रयत्न केला. जुन्नरच्या सभेनंतर त्यांना अटक झाली. काही महिन्यांची शिक्षा भोगावी लागली. त्या काळी पर्वतीचं मंदिर दलितांसाठी खुलं नव्हतं. ते खुलं व्हावं यासाठी पडेल ती किंमत आम्ही देऊ, ही भूमिका त्या वेळेला केशवरावांनी घेतली होती. पर्वती सत्याग्रहात केशवराव जेधेंसोबत काकासाहेब गाडगीळ आणि अनेक सहकारी जमावानं पर्वतीवर जाण्यासाठी निघाले. त्यांच्यावर दगडफेक झाली. त्यांना धक्काबुक्की झाली. पण त्याची चिंता त्यांनी कधी केली नाही. यातून हेच सिद्ध होतं की, केशवराव एका बाजूनं शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, दुसऱ्या बाजूनं दलितांच्या-उपेक्षितांच्या प्रश्नांसाठी लढत होते. सामाजिक परिवर्तनाचा विचार हा त्यांच्या मनात खोलवर रुजलेला होता.
जेधे-गाडगीळ पर्व
जेधे-जवळकर ही जोडगोळी काही कारणांनी फुटली आणि पुढे जेधे-गाडगीळ ही जोडी सक्रिय झाली. ‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादापेक्षा आज देशाचं स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही’ हा विचार जेधेंच्या मनात पक्का झाला आणि ते ब्राह्मणेतर चळवळीची संघर्षाची भूमिका सोडून काँग्रेसमध्ये सहभागी झाले. १९३६मध्ये फैजपूर येथे काँग्रेसचं ग्रामीण भागातील पहिलं अधिवेशन झालं. नेहरू अध्यक्षस्थानी होते. अधिवेशनात ६० ते ७० हजार शेतकरी आले होते. याचे श्रेय जेधे-गाडगीळ यांनाच जाते. काँग्रेस यशस्वी झाली पाहिजे, यासाठी जेधे-गाडगीळांनी महाराष्ट्रातला कानाकोपरा पिंजून काढला. अधिवेशन यशस्वी झालं आणि काँग्रेसजनांचा जेधेंशी वागण्याचा दृष्टिकोन बदलला. शेवटी काँग्रेसच्या प्रांतिक अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली गेली. पण जेधे तिथंच थांबले नाहीत. आज पुण्यात उभं असलेलं ‘काँग्रेस हाउस’ केशवराव जेधे, काकासाहेब गाडगीळ, अण्णासाहेब लठ्ठे या सगळ्या सहकाऱ्यांनी पहिल्यांदा कुदळ मारल्यामुळेच उभं राहू शकलं. मुळात चळवळींचा पिंड असलेल्या केशवरावांना पुढे लोकांच्या आणि काँग्रेसच्या आग्रहाखातर इच्छा नसतानाही निवडणूक लढवावी लागली. पण काकासाहेब गाडगीळ उभे राहणार असतील तरच मी निवडणूक लढवेन, या अटीवर ते तयार झाले आणि जेधे-गाडगीळ ही जोडी त्या निवडणुकीला उभी राहिली.
काकासाहेबांपेक्षा अधिक मतं त्यांना मिळाली. दोघंही विजयी झाले. यामुळे कायदेमंडळात जाण्याची संधी त्यावेळी त्यांना मिळाली. ते सहा वर्षं कायदेमंडळात होते. घटनासमितीतही केशवराव जेधे होते. हे सगळं करत असताना एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की, आपल्याला पुढं जायचं असेल, स्वातंत्र्याच्या संघर्षात यश संपादन करायचं असेल, तर काँग्रेस पक्षाच्या विस्ताराचा विचार केला पाहिजे. त्यासाठी केशवरावांनी मोठा कार्यक्रम हाती घेतला. पुढे पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यावर त्यांच्या कार्यकाळात लोकल बोर्डाच्या निवडणुकीत ११ पैकी १० जागा काँग्रेसने जिंकल्या. पुणे जिल्ह्यात एकूण ५० जागा होत्या, त्यापैकी काँग्रेसचे ३६ उमेदवार विजयी झाले; त्यापैकी एक जागा महिलांसाठी राखीव असे. केशवराव जेधे माझ्या मातोश्रींना म्हणाले, “ही जागा महिलांसाठी आहे. तिथं तुम्ही उभं राहिलं पाहिजे.” त्यांना तिथं उभं केलं आणि माझ्या मातोश्री विजयी झाल्या. एका अर्थानं, माझ्याही घराण्याच्या राजकारणाची सुरुवात ही केशवरावांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या माध्यमातून झाली.
१९४०च्या सत्याग्रहात केशवरावांना पुढे १८ महिन्यांची शिक्षा झाली. अनेक लोकांनी माफीनामे लिहून आपली सुटका करून घेतली. काहींनी आपली मतं किंवा भूमिका बदलली; पण केशवरावांची भूमिका मात्र स्पष्ट होती, ‘मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हा गुन्हा विचारपूर्वक केला आहे. तो करणं हा माझा अधिकार आहे आणि त्याच्यासाठी मी मुळीच तडजोड करणार नाही.’
पुढे देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर पुन्हा काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी केशवरावांकडे आली. त्या वेळचे बाळासाहेब खेर मंत्रिमंडळ हे केशवरावांना अपेक्षित असलेल्या शेवटच्या घटकांची हिताची जपणूक करणाऱ्या विचारांचं नव्हतं. म्हणून केशवराव पक्षाचे अध्यक्ष असतानाही मुख्यमंत्र्यांच्या धोरणावर सातत्यानं टीका-टिपण्णी करत असत. त्यामुळे साहजिकच त्यांच्यात अंतर वाढलं. या अंतरातून काँग्रेसची सूत्रं अन्य लोकांकडे गेली. एकेकाळी काँग्रेसचं नेतृत्व हे जेधे आणि गाडगीळ यांच्याकडे होतं, ते आता शंकरराव देव-बाळासाहेब खेर गटाकडे गेलं. साहजिकच केशवरावांचा गट दुबळा झाला आणि उमेदवारांची निवड करताना जेधे-गाडगीळ यांना झुकतं माप तर सोडाच, पण त्यांच्या मतांचा सन्मानही केला गेला नाही. याची परिणती केशवरावांनी काँग्रेसमधून बाहेर पडत १९४८मध्ये नवीन मार्ग स्वीकारण्यात झाली.
शेतकरी कामगार पक्षा’चा जन्म
जेधे-जवळकर कालखंड, जेधे-गाडगीळ कालखंड यानंतर तिसरा कालखंड उदयास आला तो म्हणजे ‘जेधे-मोरे’. केशवराव जेधे, भाऊसाहेब राऊत, दत्ता देशमुख, शंकरराव मोरे, तुळसीदास जाधव, ज. के. खाडिलकर, अण्णासाहेब गव्हाणे हे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातलं नेतृत्व एका निष्कर्षाप्रत पोहोचलं, ‘आपण एकसंध झालं पाहिजे. काँग्रेस सामान्य लोकांच्या हातांत राहण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे आपण वेगळा विचार करावा.’ इथेच ‘शेतकरी कामगार पक्षा’चा जन्म झाला. नाशिक जिल्ह्यातील दाभाडी इथे शेकापचं अधिवेशन झालं, तिथे मांडण्यात आलेला ‘दाभाडी प्रबंध’ ऐतिहासिक दस्तऐवज मानला जातो. तो तयार करण्यात केशवराव जेधेंचा सिंहाचा वाटा होता. काही वर्षांनी पुन्हा एकदा केशवरावांचा कल दुसऱ्या दिशेला वळला. ''समाज एकसंध करायचा असेल, प्रगतीच्या मार्गावर न्यायचा असेल तर निव्वळ शेतकरी-शेतकरी म्हणून चालणार नाही. ‘समाजातल्या इतर सर्व घटकांसह शेतकरी’ असा विचार स्वीकारला पाहिजे आणि यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही’ या भूमिकेतून जेधे पुन्हा काँग्रेसमध्ये आले. त्यांनी लोकसभेची पहिली निवडणूक १९५७ साली बारामतीतून लढवली आणि ते निवडून आले.
१९२० ते १९५४ या कालखंडातले महाराष्ट्रातले समाजजीवन, राजकारण, अर्थकारण, शैक्षणिक धोरण या सगळ्यांचा लेखाजोखा य. दि. फडके लिखित ‘केशवराव जेधे चरित्र’ पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला समजतो. नव्या पिढीला महाराष्ट्रातल्या त्या कालखंडातल्या सबंध परिस्थितीचं आकलन उत्तम प्रकारे य. दि. फडके यांच्या या पुस्तकामुळे होईल म्हणून त्यांच्याबद्दलही मी कृतज्ञ आहे. केशवराव जेधेंनी उभं आयुष्य महाराष्ट्राला दिलं, त्या आयुष्यातूनच पुढे अनेक लोक घडले. त्या अनेक लोकांत आमच्यासारखे त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आज इथंपर्यंत येऊन पोचलो आहोत. केशवरावांचं स्मरण आमच्या अंतःकरणामध्ये अखंड राहील.
शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष
केशवरावांची पुण्यात एक सभा झाली होती. पोटतिडकीने त्यांनी भाषण केले. नंतर त्या सभेतच त्यांना भोवळ आल्याने इस्पितळात दाखल करावं लागलं होतं. थोड्या दिवसांत ते आपल्याला सोडून गेले. पण शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचं लक्ष शेवटच्या माणसाचं हित जपण्यात, त्यासाठी संघर्ष करण्यात होतं. प्रतिकूल परिस्थितीतही ध्येयाशी तडजोड नाही हे त्यांचं तत्त्व होतं. सामान्य माणसाच्या हितासंबंधी विनातडजोडीची भूमिका घेताना केशवरावांनी उभं आयुष्य घालवलं म्हणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातला त्या कालखंडातला एक महत्त्वाचा ‘लोकनेता - मास बेस्ड् लीडर’ म्हणून केशवराव जेधे नावारूपाला आले.
(शब्दांकन - दिग्विजय सर्जेराव जेधे)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.