पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात आगडोंब उसळला. इम्रान समर्थक रस्त्यावर उतरले आणि देशभर वणवा भडकला.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात आगडोंब उसळला. इम्रान समर्थक रस्त्यावर उतरले आणि देशभर वणवा भडकला. सर्वोच्च न्यायालयाने इम्रान यांना जामीन मंजूर करून दिलासा दिला असला तरी लष्कर, सत्ताधीश आणि विरोधक यांच्यामधील कुरघोड्यांत पाकिस्तान विरुद्ध लोकशाही असा लढा उभा राहिल्याचे चित्र जगासमोर आले आहे.
पाकिस्तानातील सद्यःस्थितीतील घडामोडींनुसार तुम्ही इम्रान खान यांच्यासोबत आहात की त्यांच्या विरोधात? या अनुषंगाने दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात. एक म्हणजे आज निष्पक्ष निवडणूक झाली तर इम्रान जिंकतील का? दुसरा म्हणजे त्यांचा विजय पाकिस्तानसाठी चांगला असेल की आपत्तीजनक?
यामधील पहिल्या प्रश्नाचे उत्तर इम्रान जिंकणार, हे नक्कीच. कारण पाकिस्तानात जे आत्तापर्यंत एकाही नेत्याला जमले नाही ते इम्रान यांना जमले आहे. ते म्हणजे त्यांच्या पाठीमागे असलेली समर्थकांची गर्दी व बहुमत मिळण्याची संधी आणि दुसरे म्हणजे लष्कराकडून त्यांच्यावर कारवाईसाठी होत असलेला विलंब. अगदी नवाझ शरीफ यांनाही हे जमलेले नाही. त्यांनाही अन्यायकारकपणे तीनदा सत्तेतून बाजूला करण्यात आले होते.
सद्यःस्थिती पाहता इम्रान खान यांची लोकप्रियता यापूर्वी कोणालाही मिळाली नसेल अशा उच्च पातळीवर पोहोचलेली आहे. त्यांचे टीकाकार, प्रतिस्पर्धी, लष्कर या सर्वांना इम्रान यांच्या निवडणुकीतील यशाबद्दल खात्री वाटत आहे, त्यामुळेच सद्यःस्थितीत निवडणूक टाळण्याचेच प्रयत्न त्यांच्याकडून होत आहेत आणि ऑक्टोबरमध्ये निवडणुका घ्याव्याच लागणार आहेत. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे इम्रान जर जिंकले तर पाकिस्तानसाठी नक्कीच आपत्तीजनक असेल. त्याला कारण म्हणजे टोकाचा इस्लामवाद, पाश्चिमात्यवाद (हा पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा), टोकाचे सूडाचे राजकारण, भारताबद्दल असलेली टोकाची मते आणि आर्थिक परिस्थितीबद्दलची त्यांची असलेली मते... यामुळे त्यांचं जिंकणं हे पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा असेल.
लष्करच कमकुवत
या सर्वांमुळे आपल्यासमोर दोन प्रश्न उभे राहतात, एक पाकिस्तानला लोकशाही नाकारून तुम्ही इम्रान खान यांना रोखू शकाल का? आणि इम्रान यांचा विजय पाकिस्तानच्या पचनी पडेल काय? पाकिस्तानात लोकशाही रुजण्यासाठी भक्कम पावले टाकायला हवी आहेत, तरच लोकशाही बळकट होऊन प्रशासन चालू शकते. दुर्दैवाने पाकिस्तानात हे कधीच होताना दिसलेले नाही. नवाझ शरीफ यांना दाद मागूच दिली नाही, त्यामुळे ते सत्तेवरून पायउतार झाले.
सद्यःस्थितीत पाकिस्तानातील अनेक संस्था लयाला चालल्या आहेत, अर्थव्यवस्था मोडकळीस आलेली आहे. अशावेळी इम्रान हे सामर्थ्यवान नेते आहेत पण ते असह्य आहेत, त्यामुळे राष्ट्राला त्यांची गरज नाही. पाकिस्तानातील तथाकथित लोकशाहीवादी आणि उदारमतवादी शक्ती, त्यांचे लष्करी नेतृत्व हे एकाच पानावर आहेत. त्यामुळे लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत आणि सत्ताधारी आघाडीकडे २३ कोटींच्या देशाचा कारभार सांभाळण्याची ना शक्ती आहे ना विश्वासार्हता.
सर्वच राष्ट्रांना, विशेषतः लोकशाहीसाठी संस्थात्मक आधाराची गरज असते. पाकिस्तानात ही जबाबदारी सैन्याने पार पाडली आहे. पाकिस्तानातील न्यायपालिका, निवडणूक आयोग, तथाकथित भ्रष्टाचाराचे वॉचडॉग आणि सतत घोटाळा करणारा नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (NAB) हे सर्वच लोकशाही किंवा राष्ट्रहिताचे रक्षण करण्यासाठी अपुरे ठरले आहेत. पाकिस्तानात आत्तापर्यंत लष्करच स्थिरतेची हमी देणारी एकमेव संस्था होती; मात्र हेच सैन्य सध्या सर्वात कमकुवत स्थितीमध्ये आहे.
अयशस्वी अरब स्प्रिंग
आपण यावर का विचार करतो, कारण तो आपल्या शेजारी राष्ट्र आहे आणि तेथे लोकशाही निर्विघ्नपणे राबणे हे आपल्या देशासाठी गरजेचे आहे. आता आपण अरब स्प्रिंगविषयी जाणून घेऊ. अरब स्प्रिंग का आणि कसे अयशस्वी झाले? अरब देशांत एकापाठोपाठ एक इस्लामवादी जिंकत राहिले तेथे इस्लामिक लोकशाही नव्हती आणि उदारमतवादही निश्चित नव्हता. तेथे धर्म हे एकच आंदोलनाला चालना देणारे इंधन राहिले. ट्युनिशियातील काही प्रमाणात वगळता मुस्लिम ब्रदरहूडची नेहमीच काही आवृत्ती होती. इजिप्तपासून त्याची सुरवात झाली. तेथे सैन्य परत आले आणि परिस्थिती पूर्ववत झाली. त्याला लोकप्रिय समर्थनही मिळाले. कारण इजिप्शियन लोकांनी निवडून दिलेल्या सरकारने ज्या प्रकारचे इस्लामीकरण सुरू केले होते, ते लोकांना मान्य नव्हते.
ट्युनिशिया, ज्याला अरब स्प्रिंगची एक यशोगाथा म्हणून पाहिले जाते, ते आता बदलले आहे. त्याचा अति-लोकप्रिय ‘सामान्य माणूस’ नेता, ज्याचा पाश्चात्त्य जगात खरा लोकशाहीवादी म्हणून गौरव केला जातो, तो आता हुकूमशहा बनला आहे. हे परिवर्तन धक्कादायक आहे. अरब जगतात लोकशाहीकरण म्हणजे इस्लामीकरण हे समीकरण दृढ झालेले आहे. आत्तापर्यंत, लष्करी हुकूमशाहीने क्रूर दडपशाही न केल्यास, धर्म आणि पाद्री यांना नियंत्रणात ठेवले होते.
निवडणुकीच्या वैधतेने इस्लामवादी पसरू लागले. त्यामुळे तुर्कीच्या रेसेप तय्यप एर्दोगान सारख्या मुस्लिम ब्रदरहूडच्या नवीन समर्थकांना प्रोत्साहन मिळाले. ज्यांनी स्वतःच्या धर्मनिरपेक्ष आणि आधुनिक लोकशाहीचे जलद इस्लामीकरण केले आणि निवडून आलेल्या हुकूमशाहीकडे ढकलले. शिस्तबद्ध पाकिस्तानी सैन्याला इम्रान यांच्यामध्ये त्यांना त्यांचा स्वतःचा मोहम्मद मोर्सी (इजिप्तचा पाचवा अध्यक्ष, मुस्लिम ब्रदरहूडचा नेता) नवा नेता म्हणून नको आहे.
लोकशाहीसाठी संयम हवा
लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी खडतर परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे. अनेक दशकांच्या खडतर कामातून शिकलेला संयम, जनआंदोलन, विचार व विचारसरणीचा विकास, संस्थांची समज व उभारणी आणि शेवटी निवडून आलेल्या बहुमताच्या मर्यादा स्वीकारण्याची परिपक्वता हवी. कोणतीही लोकशाही परिपूर्ण नाही, भारतात त्यासाठीचा गृहपाठ स्वातंत्र्य चळवळीत झाला. त्यानंतर, देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात प्रत्येक दशकात कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे जनआंदोलन झाले. किंवा आणीबाणीसारख्या मोठ्या, इतिहास बदलणाऱ्या घटना आणि त्याविरुद्ध लढा उभा राहिला. यापैकी काहीही अरब राष्ट्रांत घडलेले नाही. त्यामुळे लोकशाही राबवायची कसे, हे समजणारा एकही नेता त्यांच्याकडे नव्हता.
या बाबत पाकिस्तान अगदीच वाईट स्थितीत नाही. तेथे स्वातंत्र्यपूर्व काळात चळवळी झालेल्या आहेत. त्यानंतरच्या काळातही अनेक नेतृत्व विकसित झाले; फक्त त्याचा प्रवास विस्तारणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लोकशाहीमध्ये आपल्याला आवश्यक असलेला संयम अद्याप त्यांना प्राप्त झालेला नाही. मला माझे सरकार आवडत नसले तरी ते बदलण्यासाठी मला पुढील निवडणुकीपर्यंत वाट पाहावी लागेल, हे स्वीकारण्याचा संयम यायला हवा.
तथापि हा संयम विकसित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी, तुम्हाला विश्वासार्ह आणि मजबूत संस्थांची आवश्यकता आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय त्यामुळे अगम्य ठरतात.
नवाझ शरीफ बहुमताने निवडून येऊन पंतप्रधान बनले, मात्र न्यायालयाने त्यांना अपात्र ठरवून हाकलून दिले होते. बरं कारण काय होते, तर ते सादिक (ज्याने कधीही खोटे बोलला नाही) आणि अमीन (ज्याने कधीही कोणाचा विश्वासघात केला नाही) आढळले नाहीत म्हणून. त्यामुळे ते राज्य करण्यास अयोग्य ठरले. हे चित्र लोकशाहीला नख लावणारेच आहे.
सध्या पाकिस्तानात जे सुरू आहे ते पाहिल्यास तेथे लोकशाही विरुद्ध पाकिस्तान असाच संघर्ष सुरू असल्याचे दिसते. लोकशाही टिकवण्यासाठी ती जाणणे आणि रुजविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तेथे सर्वांनीच संयमाने वेळ द्यायला हवा आहे.
(अनुवाद - प्रसाद इनामदार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.