कोण देऊ शकेल मोदींना आव्हान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपशी लढण्यात खरेच काही हशील नाही? हिंदू आणि मुस्लिमांना एकत्र आणू शकेल अशीच व्यक्ती नरेंद्र मोदी यांच्यापुढे आव्हान उभी करू शकते. यात हिंदू म्हणजे सगळे हिंदू, जातीपातीत विखुरलेले गट नव्हेत.
हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील संबंधांवरील मागील दोन लेखांमध्ये आपण एक प्रश्न उपस्थित केला होता. जे धर्माने विभाजित केले आहे ते राजकारण जोडू शकते काय? हा तो प्रश्न. १९८९ पासून काँग्रेसला उतरती कळा लागल्यापासून भारतीय राजकारणात दोन स्पर्धक विचार केंद्रस्थानी आले. एक- धर्माने जे जोडले गेले आहे ते विभाजित करण्यासाठी जातीचा वापर केला जाऊ शकतो. दोन- जे जातींनी विभागले ते धर्माने सांधले जाते. जवळपास २५ वर्षे जातींचा पगडा दिसून आला. पण २०१४ मध्ये महत्त्वाच्या मोठ्या राज्यांमध्ये हिंदू मतांची लढाई धर्माने जिंकल्याचे दिसून आले. याचाच परिणाम म्हणून मथुरा-काशी, ईश्वरनिंदा, कावडिया-हाजी वा धर्मनिरपेक्ष-जातीयवादी असे वाद आणि चर्चा नंतरच्या काळात निर्माण झाल्या.
मोदी यांनी चाणाक्षपणे हा बदल समजून घेतला. म्हणूनच देशातील धार्मिक अल्पसंख्याकामधील (पक्षीः मुस्लिम) मागास जाती-जमातींपर्यंत पोहोचण्याचा सल्ला त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिला. त्यांच्या विरोधकांनी २५ वर्षे जातींचा वापर हिंदूंना विभागण्यासाठी केला तर आता मुस्लिमांना विभाजित करण्यासाठी ते जातींचा वापर करू शत नाहीत का? याचा पहिला प्रयोग त्यांनी हैदराबाद येथे नुकत्याच संपलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना केला. हिंदुंमध्ये उच्चवर्णीयांकडून निम्नवर्णीयांच्या ज्याप्रमाणे दमन केले जाते त्याप्रमाणेच मुस्लिमांमध्ये अश्रफांकडून पसामंदांचे शोषण होते, असा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी यातून दिला. मोदी यांनी सहानुभूती दाखविल्यामुळे लगेच काही मुस्लिम मते त्यांच्याकडे वळणार नाहीत. पण जातीच्या उतरंडीत ज्यांच्यावर अन्याय होत असतो त्यांच्यात एकप्रकारचा असंतोष असतोच. त्यामुळे आता लगेच नाही तर काही काळाने त्यांना काही प्रतिसाद मिळू शकतो. भाजपचे ते दीर्घकालीन लक्ष्य असू शकते.
देशात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने मुस्लिम समाजातील कुणाला उमेदवारी दिली नसेल पण मध्य प्रदेशात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे तब्बल ९२ उमेदवार निवडून आले आहेत. बहुसंख्य वॉर्डांमध्ये भाजपच्या या मुस्लिम उमेदवारांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला आहे. याकडे तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही. भाजपकडील हिंदू मते एकसंध राहिल्यास अगदी लोकसभा निवडणुकीत काही मुस्लिमांना उमेदवारी देणे पक्षासाठी चांगली कल्पना ठरू शकेल. यात त्यांचे दोन फायदे आहेत. पहिला फायदा हा की भाजप हा मुस्लिममुक्त पक्ष आहे या आक्षेपाला उत्तर दिले जाईल. दुसरा फायदा असा की जर मुस्लिमांची काही मते भाजपकडे वळली तरीही विरोधकांचा पाय आणखीन खोलात जाईल.
या आव्हानाकडे मोदी विरोधकांना दुर्लक्ष करून चालणार नाही. यात विरोधकांनी मुस्लिमांची बाजू घेतली तर मोदींची हिंदू मते आणखी पक्की होतात. याकडे दुर्लक्ष केले तर मुस्लिम मतांना ओहोटी लागू शकते. असा हा मोदी यांनी टाकलेला फास आहे. दुसरीकडे काँग्रेस वा अन्य मोठ्या राजकीय पक्षांनी याकडे दुर्लक्ष केले तरी मुस्लिमांचा नवा पक्ष, ओवेसी, बद्रुद्दीन अजमल असे नवे नेते पुढे येतील. ज्या मुस्लिम मतांवर अशा नेत्यांचा डोळा असेल ती मते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल वा तृणमूल काँग्रेसची असतील. मुस्लिम मतांच्या या विभागणीत निश्चित फायदा असेल तर तो भाजपचाच. केरळमध्ये याची चुणूक आपल्याला दिसून आली. शबरीमला मुद्द्यावर धर्मनिरपेक्ष भूमिका घेऊन हिंदूंना दाखवायचे की परंपरेचा सन्मान करायचा असा पेच काँग्रेसपुढे निर्माण झाला. प्रत्यक्षात मात्र काँग्रेसने तिसराच आणि महाभयंकर पर्याय निवडला तो म्हणजे काहीही न बोलणे व काहीही न करणे. मध्यंतरी राहुल गांधी यांनी लिंगसमानतेबाबत बोलण्याचा प्रयत्न केला असता लगेच या पक्षाच्या नेत्यांना हे त्यांचे वैयक्तिक मत आहे पक्षाची भूमिका नाही, अशी सारवासारव करावी लागली. त्यामुळे उद्या जर भाजपने मुस्लिमांमधील बहुपत्नीवाद, पोटगी, मदरशातील शिक्षण असे प्रश्न उपस्थित केले तर काँग्रेसचा प्रतिसाद कसा राहील? हा खरा प्रश्न आहे.
ज्याच्याकडे हिंदूंची मोठ्या प्रमाणात मते नसतील अशा कुणालाही २०१४ नंतरच्या भाजपला निवडणुकीत पराभूत करणे शक्य नाही. आदिवासी, दलित, यादव वा ओबीसी म्हणून मत देणाऱ्यांचे युग आता संपुष्टात आले आहे. मोदींना आव्हान देणाऱ्याला हिंदू आणि मुस्लिम मते एकत्रितपणे आपल्याकडे वळवावी लागतील आणि हो हिंदू म्हणजे सर्व हिंदू. जातीपातीत विखुरलेला हिंदू नव्हे. समाज एकसंध राहणे आपल्या देशाच्या हिताचे आहे हे या नेत्याला हिंदूंनाही पटवून द्यावे लागेल. जे की अवघड आहे. पण सत्तेचा मार्ग कधी, केव्हा सोपा होता?
धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक संकल्पना मोडीत?
मोदी यांनी आपल्या विरोधकांना अशा बेटावर खेचून नेले आहे, तेथील जमीन बदलत्या राजकीय हवामानातील लाटांमुळे सारखी पाण्याखाली जात आहे. भारतातील मुस्लिमही विरोधकांसह या बेटावर खेचले गेले आहेत. आता मोदींशी लढण्यात काही हशील नाही, असे मत अशा अनेक जणांनी माझ्याकडे व्यक्त केले आहे की ज्यांची नावे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक ही संकल्पना मोडीत निघाली असून हिंदू धर्मांध झाले असल्याने त्यांच्याशी लढण्यात अर्थ नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. काही युवक एवढे रागावलेले आहेत की त्याच्यात देश सोडून जाण्याची भावना वाढत आहे. ज्यांना देश सोडून जायचे नाही आणि येथे लढण्याचीही हिंमत नाही असे मोदी यांच्या हैदराबाद येथील भाषणाचा हवाला देत आहेत. मोदी मुस्लिमांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे यांचे म्हणणे आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.