दोन देशांमधील भांडणं !

चीन - अमेरिका संघर्ष दिसतो, सध्या भारत - कॅनडा संघर्ष सुरू झालाय. दोन देश असे का भांडत असतील? भांडणाचं स्वरूप युद्धच असतं का?
shital pawar over india china pakistan dispute russia ukraine war china america
shital pawar over india china pakistan dispute russia ukraine war china americaSakal
Updated on

भारत - पाकिस्तान तणाव आणि वादविवाद नेहमीचेच. अलीकडे तर चीनसोबतही सीमाप्रश्न मधूनमधून डोके वर काढत असतो. भारताबाहेरही इतर देशांत असे संघर्ष अनुभवायला येतात. नजीकच्या इतिहासात जगानं अणुयुद्धही अनुभवलं आहे. अगदी सध्या सुरू असलेलं रशिया - युक्रेन युद्ध जग अनुभवतंय.

याशिवाय चीन - अमेरिका संघर्ष दिसतो, सध्या भारत - कॅनडा संघर्ष सुरू झालाय. दोन देश असे का भांडत असतील? भांडणाचं स्वरूप युद्धच असतं का? युद्ध नसेल, तर इतर कोणते संघर्ष उद्भवतात आणि त्याचा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? असे अनेक प्रश्न दोन देशांतील सहयोग आणि वाद समजून घेताना महत्त्वाचे ठरतात.

दोन अगर अधिक स्वतंत्र राष्ट्रांमधील राजकीय संबंधांना ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ म्हणतात. यामध्ये दोन राष्ट्रांमधील राजकीय, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांतील सलोख्याच्या, तटस्थतेच्या किंवा संघर्षाच्या संबंधांना व्यापक अर्थानं ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ असे म्हणतात.

आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये एका देशातील (राष्ट्रातील) व्यक्तीचा अथवा समूहाचा दुसऱ्या राष्ट्रातील व्यक्तीशी अथवा समूहाशी अनेक कारणांनी संबंध येतो. या संबंधाचं परस्परांच्या हिताच्या दृष्टीनं नियमन करण्याचं कार्य त्या त्या देशांचे (राष्ट्राचे) शासक (आणि त्यांचे शासन) करतात. त्यातूनच परराष्ट्र मंत्रालयाची निर्मिती झाली. आंतरराष्ट्रीय संबंधांच्या व्यूहरचनेच्या शास्त्राला ‘डिप्लोमसी’ असे म्हणतात. या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सरकारच्या अधिकाऱ्यांना ‘डिप्लोमॅट’ म्हणतात.

आंतरराष्ट्रीय संबंधांत कायदेशीर आणि इतर नियमन ठेवण्यासाठी काही संस्थांचाही समावेश असतो. त्यात जागतिक समतोल टिकवून ठेवणाऱ्या संयुक्त राष्ट्रांसारख्या संस्थांपासून या क्षेत्रात संशोधन आणि संवाद यावर काम करणाऱ्या दबाव गटांचा आणि संशोधन संस्थांचाही समावेश आहे. या संस्थांना आणि त्यांच्या कार्याला मान्यता देऊन राष्ट्रं त्यात सहभागी होतात. अशा रचनेतून जागतिक राजकारण आणि अर्थकारणालाही दिशा मिळत असते.

आंतरराष्ट्रीय संबंध केवळ लष्करी ताकदीच्या बळावर जोडण्याचा एक काळ होता. अमेरिका - रशिया शीतयुद्धाची समाप्ती आणि मुक्त व्यापारानं जोडलं गेलेलं जग यामुळे लष्करी ताकदीच्या पलीकडे व्यापार- उद्योग या क्षेत्रांनाही आंतरराष्ट्रीय संबंधांत कमालीचं महत्त्व आलं.

आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये प्रामुख्यानं सीमेमधली समीपता, व्यापार- उद्योग, व्यूहरचनात्मक उपयुक्तता यांचा ढोबळमानानं विचार होतो. व्यूहरचनात्मक उपयुक्ततेचा भाग म्हणजे संरक्षण. उदाहरणार्थ, भारताचे पाकिस्तानबरोबरचे संबंध अनुभवामुळे अविश्वासाचे आहेत. अशावेळी व्यूहरचनेचा भाग म्हणून भारताला अफगाणिस्तानबरोबरचे संबंध अधिक भक्कम ठेवणं आवश्यक असतं.

सांस्कृतिक आणि शैक्षणिक देवाणघेवाण हा आंतरराष्ट्रीय संबंधाचा एक भाग आहे. भारतानं गेल्या दशकभरामध्ये आफ्रिकी देशांमध्ये शैक्षणिक भागीदारी वाढवली. मागास आफ्रिकी देशांमधील विद्यार्थ्यांना भारतात शिक्षणासाठी आणलं.

हे विद्यार्थी त्यांच्या देशात परत जाताना भारताची एक प्रतिमा घेऊन जातात. उद्या या विद्यार्थ्यांपैकी कोणी सरकारी अधिकारी अथवा राजकीय नेता अथवा मोठा उद्योजक बनले, तर त्यांची भारताबद्दलची भावनिक गुंतवणूक सकारात्मक असते.

आंतरराष्ट्रीय संबंध हा दूरगामी विचार करून त्या दृष्टीनं अत्यंत सावकाशीनं पावलं टाकण्याचा प्रकार असतो. यातून केवळ जागतिक राजकारण आणि अर्थकारण रचना घेतं असं नाही, तर त्या रचनेतून देशातील नागरिकांना संधीही निर्माण होत असतात.

त्यात व्यापार - नोकरी - शिक्षण - बाजारपेठ - आयात निर्यात धोरण त्यातून शेतमाल आणि उत्पादनांच्या ठरणाऱ्या किंमती अशा अनेक घटकांवर थेट परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यावर दीर्घकालीन परिणाम करणाऱ्या या धोरणांबद्दल अधिक जागरूक असणं हिताचं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.