कुटुंब डॉट कॉम : ‘कुटुंबा’ला पर्याय नाही!

या वर्षाचा हा अखेरचा दिवस. या सदरातील हा शेवटचा लेख. लेखमालेच्या केंद्रस्थानी होती ‘कुटुंब’ ही संकल्पना. ‘कुटुंब’ हा समाजरचनेतील एक महत्त्वाचा घटक.
human family life
human family lifesakal
Updated on
Summary

या वर्षाचा हा अखेरचा दिवस. या सदरातील हा शेवटचा लेख. लेखमालेच्या केंद्रस्थानी होती ‘कुटुंब’ ही संकल्पना. ‘कुटुंब’ हा समाजरचनेतील एक महत्त्वाचा घटक.

या वर्षाचा हा अखेरचा दिवस. या सदरातील हा शेवटचा लेख. लेखमालेच्या केंद्रस्थानी होती ‘कुटुंब’ ही संकल्पना. ‘कुटुंब’ हा समाजरचनेतील एक महत्त्वाचा घटक. भारतीयांच्या भावविश्‍वात तर कुटुंब आणि कौटुंबिक जीवनाला महत्त्वाचं स्थान आहे. आज जगभरात लग्नसंस्थेला आणि कुटुंब व्यवस्थेला जे हादरे बसताना दिसताहेत त्या पार्श्‍वभूमीवर भारतीय कुटुंबव्यवस्था मात्र टिकून आहे. अर्थात आपल्याकडेही काही लक्षणीय बदल झाले आहेतच. काळाच्या ओघात ‘एकत्र कुटुंब’ पद्धती अनेकविध कारणांमुळे अव्यवहार्य होत गेली व नवरा, बायको आणि मुलं अशी ‘विभक्त’ कुटुंबं अस्तित्वात आली. पण हेही तितकंच खरं, या ‘विभक्त’ कुटुंब व्यवस्थेचं भवितव्यही आता, आजच्या तरुणाईच्या मानसिकतेवर ठरणार आहे. म्हणूनच या शेवटच्या लेखात तरुणाईसाठीच महत्त्वाचे असे काही मुद्दे पुनःश्‍च अधोरेखित करू इच्छितो.

१) लग्न हा जीवनाला सोपं बनविण्यासाठी केलेला प्रकार आहे. तो कोणाच्या गळ्यात बांधण्यासाठी केलेला नाही. जन्मभराच्या कामसौख्यासाठी, त्यातून निर्माण होणाऱ्या संततीची योग्य जोपासना करण्यासाठी, सुसंस्कारित भावी पिढी तयार करून त्यायोगे समाजस्वास्थ्य वृद्धिंगत होण्यासाठी ‘विवाह संस्था’ निर्माण केली गेली.

२) विवाह संस्था निसर्गनिर्मित नसली तरी ‘विवाहा’साठी निसर्गानंच माणसाला उद्युक्त केलं, असं म्हणता येईल. माणसाचं अपत्य पूर्णपणे स्वतंत्र व स्वावलंबी होण्यासाठी बरीच वर्षे लागतात. स्त्री व पुरुष या दोघांच्याही जपणुकीची त्याला गरज भासते. दोघांकडून ते अपत्य वेगवेगळे पण पूरक गुण उचलतं. हे ‘विवाहा’मुळेच शक्‍य होतं.

३) आजच्या गतिमान जीवनातील ताणतणाव, असुरक्षितता, अस्वस्थता... या साऱ्यांचे पडसाद विवाहसंस्थेवर उमटत आहेत व अनेक आव्हानं समोर उभी राहत आहेत. पण अशा सर्व ताण-तणावांवर उतारा ठरू शकणाऱ्या आणि स्त्री-पुरुष दोघांनाही स्वास्थ्य, समाधान देऊ शकणाऱ्या सुसंवादी, सशक्त सहजीवनाची आज अधिक निकड निर्माण झाली आहे.

४) आज जे ताण दिसताहेत ते कुटुंबव्यवस्थेचे दुष्पपरिणाम नव्हेत. उलट कुटुंब नावाचा भला थोरला ‘आधारवड’ तुटत जाण्याचे परिणाम आहेत. म्हणूनच ‘सहजीवना’ला अन्‌ ‘कुटुंबा’ला पर्याय नाही.

५) आजच्या तरुणाईचं कुटुंबापेक्षा करिअरला प्राधान्य असलं तरी करिअर इतकीच ‘जीवनशैली’ही महत्त्वाची असते, हे विसरता कामा नये. फक्त पैसा आणि भौतिक सुखसोयी आपली जीवनशैली ‘समृद्ध’ करू शकत नाहीत. जिव्हाळ्याचे नातेसंबंध, कुटुंब, मित्र यांचंही जीवनात अनन्यसाधारण स्थान असतं.. ते जपावंच लागतं.

६) लग्न करताना अनेक तडजोडी कराव्या लागतात, अनेक बाबतीत जुळवून घ्यावं लागतं, पण एकटं राहण्याचा निर्णय घेतला तर थेट एकटेपणाशीच जुळवून घ्यावं लागतं आणि ते सोपं नक्कीच नसतं.

७) ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा काही ‘लग्ना’ला पर्याय ठरू शकत नाही. लग्नातून मिळणारे कुठलेच फायदे ‘लिव्ह इन’मध्ये मिळत नाहीत. कधीही ‘इन’चं ‘आऊट’ होता येतं हाच काय तो एकमेव फायदा!

८) मातृत्व ही स्त्रीसाठी जबाबदारी असतेच असते; पण त्यात सृजनाचा आनंद असतो. मातृत्व ही स्त्रीसाठी, निसर्गानंच तिच्या शरीरात पेरून ठेवलेल्या असंख्य क्षमतांचा विकास करण्याची संधी असते.

९) निसर्गानं पुरुषाला शारीरिक पान्हा दिलेला नसला तरी माया आणि वात्सल्य भरपूर दिलेलं आहे. बाळाच्या निमित्तानं दोघेही पालक होतात आणि पालक ‘होणं’ हे एक ‘घडणं’च असतं.

असे कितीतरी मुद्दे आहेत पण एखादं ‘मनोगत’ही शंभर मुद्द्यांपेक्षा बोलकं ठरू शकेल. कर्करोगाशी यशस्वी सामना करणारी सोनाली बेंद्रे- बहल म्हणते, ‘‘आपल्या आयुष्यात असणारी माणसं ही कोणत्याही इतर भौतिक गोष्टींपेक्षा महत्त्वाची असतात. कर्करोगाची ट्रीटमेंट मी अमेरिकेत केली; परंतु कुटुंबियांच्या मायेची ऊब, प्रेम मला तिथे अनुभवता आले नाही. काही झालं तरी ‘फॅमिली’ इज द मोस्ट इम्पॉर्टन्ट थिंग इन माय लाईफ!’’ जीवनातलं ‘कुटुंबा’चं महत्त्व जितकं अधोरेखित करावं, तितकं थोडंच. सर्व वाचकांना नव्या वर्षासाठी ‘कौटुंबिक जिव्हाळ्या’च्या अनेक शुभेच्छा!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.