शिवजयंती विशेष : मानवी मूल्ये जोपासणारा ‘तत्त्ववेत्ता राजा’

मानवी मूल्यांना अग्रक्रम, प्रजाहिताला प्राधान्य आणि महिला, मुलाबाळांविषयी विशेष काळजी हे शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे वैशिष्ट्य होते.
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharajesakal
Updated on

मानवी मूल्यांना अग्रक्रम, प्रजाहिताला प्राधान्य आणि महिला, मुलाबाळांविषयी विशेष काळजी हे शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे वैशिष्ट्य होते. ते समतेचा विचार जोपासणारे, पर्यावरणाचाही विचार करणारे ‘तत्त्ववेत्ते राजे’ होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार चालवली, रणांगण गाजविले. शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट केली. अशक्य कार्य शक्य केले. आपण लढू शकतो, जिंकू शकतो आणि उत्तम प्रकारे राज्यकारभार करू शकतो, ही प्रेरणा हतबल प्रजेच्या मनात निर्माण केली. मात्र या धामधुमीत त्यांनी मानवी मूल्यांची हेळसांड होऊ दिली नाही.

लोककल्याणकारी शासनव्यवस्था हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अंतिम ध्येय होते. स्वराज्यातील आणि परराज्यातील सर्वसामान्यांचा त्यांनी आदर-सन्मान केला. ‘‘धर्मग्रंथ, धर्मस्थळ, स्त्रिया आणि लहान मुलं आपल्या शत्रूंची जरी असली तरी त्यांचा आदर करावा’’, असा त्यांचा दंडक होता. तो नियम मोडणारांना त्यांनी कठोर शिक्षा केली.

असहाय्य महिलेवर अन्याय करणाऱ्या रांझे गावच्या बाबाजी गुजरलाही त्यांनी कठोर शिक्षा केली. बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई, उंबरखिंडीत त्यांच्याविरुद्ध लढणाऱ्या रायबाघीण, प्रबळगडाचा किल्लेदार किसरीसिंहाचा कुटुंबकबिला या विरोधक महिलांना बहिणीप्रमाणे वागविले. आपल्या शत्रूची आई, बहीण, मुलगी, पत्नी किंवा सामान्य स्त्री असली तरी त्यांचा आदर, सन्मान आणि संरक्षण केले पाहिजे, हा त्यांचा शिरस्ता होता.

याबाबत समकालीन मोगल इतिहासकार खाफीखानाने म्हटले आहे, ‘‘आपण ज्याप्रमाणे आपल्या आईशी किंवा बहिणीशी बोलतो तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी बोलत असत.’’ इतके ते नीतिमान होते. ‘परमुलुखातील पोर बायका न धरावी’ हा त्यांचा आदेश होता. स्वराज्याप्रमाणे परराज्यातील सर्वसामान्य स्त्रियांचे संरक्षण आणि आदर केला पाहिजे, ही त्यांची शिस्त होती. हे महत्त्वाचे मानवी मूल्य आहे. त्याचे पालन शिवरायांनी केले.

लढाया-संघर्षाच्या काळात सर्वात जास्त अत्याचार मुले आणि स्त्रियांवर होतात. आजदेखील विरोधकांना नामोहरम करण्यासाठी स्त्रियांना अपमानित केले जाते, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले जातात. अशा पार्श्वभूमीवर विरोधकांच्या महिलांचादेखील आदर-सन्मान आणि संरक्षण झाले पाहिजे हा प्रगल्भ विचार शिवरायांचा होता.

गुलामगिरीच्या प्रथेला विरोध

मध्ययुगीन काळात जगभर गुलामगिरीची अमानुष प्रथा होती. स्त्री-पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी-विक्री व्हायची. या प्रथेला राजांनी कडाडून विरोध केला. दक्षिण दिग्विजयाप्रसंगी शिवाजी महाराज तमिळनाडूतील तिरुमलवाडी येथे असताना डच व्यापारी करार करण्यासाठी त्यांच्याकडे आले. त्याप्रसंगी शिवाजीराजे डच व्यापाऱ्यांना म्हणाले, ‘यापूर्वी येथे तुम्हाला स्त्री-पुरुषांना गुलाम म्हणून खरेदी-विक्री करण्याची अनिर्बंध परवानगी होती, परंतु माझ्या राज्यात तुम्हाला ती परवानगी आत्ता मिळणार नाही.

तसे करण्याचा प्रयत्न कराल तर माझी माणसे तुम्हाला प्रतिबंध करतील. या कलमाचे काटेकोर पालन झाले पाहिजे,’ असा करार शिवाजीराजांनी केला. ज्या काळात डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज, मोगल राजरोसपणे असहाय्य स्त्री-पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी-विक्री करून जगभर व्यापार करत असत; त्या काळात शिवाजीराजांच्या राज्यात या अमानुष प्रथेला प्रतिबंध होता. ते मानवी मूल्ये जोपासणारे होते. त्यामुळेच त्यांनी गुलामगिरीच्या प्रथेला कडाडून विरोध केला.

पोर्तुगीज डेल्लनला १६७० मध्ये कळवितो, ‘‘शिवाजीराजे आणि त्यांची प्रजा मूर्तिपूजक आहे, परंतु मूर्तिपूजा न करणारांनादेखील ते आपल्या राज्यात आनंदाने नांदू देतात.’’ शिवाजीराजांना आपल्या धार्मिक परंपरांचा अभिमान होता; परंतु परधर्मियांचा त्यांनी छळ केला नाही. ज्याचा त्याचा अधिकार त्याला मिळायला हवा ही त्यांची भूमिका होती.

परंतु धार्मिक मुद्द्यावर ध्रुवीकरण करणाऱ्या, बिगर मुस्लिमांवर जिझिया कर लादणाऱ्या औरंगजेबाला खरमरीत पत्र लिहून त्याला मानवी मूल्यांचे महत्त्व सांगितले. अफजलखानाला ठार मारल्यानंतर त्याच्या मुलाला पोटाशी धरून अभय दिले. असे समकालीन कृष्णाजी अनंत सभासद सांगतात.

सुरत मोहिमेप्रसंगी शिवरायांनी ॲम्ब्रासच्या मठाला हातदेखील लावला नाही. त्याचे त्यांनी रक्षण केले. आपल्या आणि परराज्यातील धार्मिक श्रद्धास्थानांवर त्यांनी हल्ला केला नाही. त्यांनी धार्मिक मूल्ये जोपासली. परंतु चुकीचा अनुनय त्यांनी केला नाही.

मानवी मूल्यांमध्ये सर्वात महत्त्वाची मूल्ये असतात ती श्रमकरी, कष्टकरी शेतकरी वर्गाची. त्यांच्या श्रमाला मोल मिळाले पाहिजे, त्यांच्या घामाला दाम मिळाला पाहिजे, ही शिवाजीराजांची भूमिका होती. त्यामुळेच ते १९ मे १६७३ रोजीच्या पत्रात म्हणतात, ‘‘शेतकऱ्यांना काडीचाही त्रास देऊ नका. त्यांच्याकडून विनामोबदला गवत, लाकूडफाटे, भाजीपाला घेऊ नका.

शेतकऱ्यांच्या गवताच्या काडचीदेखील अभिलाषा बाळगू नका,’ अशा सक्त सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. सर्वसामान्य मजूर-शेतकऱ्यांचे शोषण करू नये. त्यांची लूट करू नये, हा त्यांचा नियम होता. त्यांच्या राज्यात भ्रष्टाचाराला थारा नव्हता. राज्यकर्ता हा जनतेचा सेवक असतो. तो जनतेचा मालक नसतो, ही त्यांची भूमिका होती. ही त्यांची प्रगल्भ विचारधारा होती.

२३ ऑक्टोबर १६६२ रोजी सर्जेराव जेधे यांना पाठवलेल्या पत्रात शिवाजीराजे म्हणतात, ‘संकटसमयी रयतेला मदत करणे हे खरे पुण्य आहे. त्यांना वाऱ्यावर सोडणे हे पाप आहे.’ ५ सप्टेंबर १६७६ रोजी आपल्या अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘गावोगावी जाऊन ज्या शेतकऱ्यांना बैलजोडीची गरज आहे त्यांना बैलजोडी द्या. उदरनिर्वाहासाठी खंडी-दोन खंडी धान्य द्या.

तिजोरीवर बोजा पडला तरी चालेल, वसुलीसाठी तगादा न लावता वसूल करा. वाढीदिडीने वसूल करू नका. मुद्दलच तेवढी घ्या.’’ आपल्या राज्यात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी महाराजांनी घेतली. त्यांनी शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिले. श्रमकऱ्यांसाठी आपला खजिना रिता केला. गरिबातल्या गरीब व्यक्तीला आनंदाने जागता आले पाहिजे, अशी व्यवस्था शिवरायांनी निर्माण केली.

पर्यावरणाचे रक्षण करणे हे संवेदनशील मनोवृत्तीचे लक्षण आहे. शिवाजीराजांनी सांगितले होते, की आंबा, फणस ही लाकडे आरमारासाठी अत्यंत उपयुक्त आहेत; परंतु ती एक-दोन सालात निर्माण होत नाहीत. रयतेने त्यांना लेकराप्रमाणे जपलेले असते. ती तोडणे म्हणजे प्रजापीडन आहे. त्यामुळे ती तोडू नयेत.

कामातून गेलेले झाड त्याचा शेतकऱ्यांना मोबदला देऊन विकत घ्यावे. बळजबरी करू नये. याप्रसंगी शिवाजीराजे म्हणतात, ‘‘बलात्कार सर्वथा न करावा’’ याचा अर्थ पर्यावरणावर अर्थात झाडांवर, पशू-पक्ष्यांवर, कोणत्याही व्यक्तीवर अत्याचार करू नये.

धारातीर्थी पडलेल्या तानाजी मालुसरेंच्या घरी जाऊन कुटुंबाचे सांत्वन केले व रायबाला पारगडाचे किल्लेदार केले. स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या शिवाजी काशिदांच्या घरी जाऊन कुटुंबियांना आधार दिला. नेसरीच्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या प्रतापराव गुजरांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलीचे राजपुत्र राजाराम महाराजांबरोबर लग्न लावून दिले व दुःखी कुटुंबाला आधार दिला. आजारी कान्होजी जेधेंना औषधोपचार घेऊन विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.

शिवाजीराजे संवेदनशील, प्रेमळ आणि मानवतावादी होते. त्यांनी आपल्या राज्यात खासगी आणि सार्वजनिक जीवनात कधीही भेदभाव केला नाही. ते समतावादी होते. मानवी मूल्यांसाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यांचे राज्य केवळ सत्ता, संपत्ती निर्माण करणे यासाठी नव्हते तर त्याला एक वैचारिक आणि तात्त्विक अधिष्ठान होते.

महान तत्त्ववेत्ता प्लेटो म्हणतो, की राज्यकर्ता हा तत्त्ववेत्ता असावा. तत्त्ववेत्ता राज्यकर्ता होऊ शकत नाही आणि राज्यकर्ता तत्त्ववेत्ता असू शकत नाही; परंतु शिवाजी महाराज हे मानवी मूल्ये जोपासणारे प्रगल्भ विचारांचे तत्त्ववेत्ता राजे होते.

(लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.