दीर्घकाळ मुख्यमंत्री पदावर राहण्याचा दुसऱ्या क्रमांकाचा विक्रम आता ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. समाजातील सर्व स्तरातील जनतेच्या उत्थानाच्या योजना हे त्यांचे वैशिष्ट्य, त्याबरोबरच भाजपशी जुळलेले सूत हे त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचे वेगळेपण आहे.
सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांच्यानंतर मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारे म्हणून ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची नोंद झाली आहे. याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेले ज्योती बसू दुसऱ्या क्रमांकावर होते.
विनयशिलता, भ्रष्टाचाराविरोधात उभे राहणे आणि गरिबधार्जिणे धोरण यामुळे साऱ्या ओडिशाभर नवीन पटनाईक यांचा पाठीराखा वर्ग वाढत गेला. त्याच्या बळावर ते सलग पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदी राहिले.
नवीन पटनाईक यांचे वडील बिजू पटनाईक यांचे १९९७मध्ये निधन झाले, त्यानंतर नवीन यांनी आपली राजकीय कारकिर्द सुरू केली. आज ७६व्या वर्षातले नवीन पटनाईक ५ मार्च २००० रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर सन २०००, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ या वर्षातील विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या बिजू जनता दलाने विजय संपादल्याने ते सलग मुख्यमंत्रीपदी राहिले. २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीत चांगले यश संपादून पुन्हा सत्तेवर येण्याचा त्यांचा मानस आहे.
मायभूमी ओडिशातील मातृभाषा उडिया प्रवाहीपणे बोल न शकणाऱ्या नवीन पटनाईक यांच्यावर येथील जनतेने मात्र भरभरून प्रेम केले आहे. त्यांच्या पक्षाला सन २००० मध्ये २९.३९ टक्के मते मिळाली होती, त्याचा प्रतिसाद उत्तरोत्तर वाढत जावून, २०१९ मध्ये त्यांच्या पक्षाला ४४.७१ टक्के मते मिळाली होती.
२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत त्यांच्याविरोधात सर्व पक्षांसह भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथसिंह आणि धर्मेंद्र प्रधान आदींनी जोरदार प्रचार करूनही त्यांनी आपल्या बिजू जनता दलाला विजय मिळवून दिला होता. १४७ सदस्यांच्या विधानसभेत भाजपला या निवडणुकांत अनुक्रमे नऊ आणि तेवीस जागा मिळाल्या होत्या.
सर्व घटक केंद्रीभूत धोरण
मिशन शक्ती उपक्रमाद्वारे महिलांचे केलेले सक्षमीकरण आणि गरिबांच्या कल्याणासाठीच्या योजना यामुळे नवीन पटनाईक सत्तेवर राहू शकले, असे राजकीय विश्लेषक मानतात. भ्रष्टाचाराची छाया असलेल्या तीन मंत्र्यांना मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी पदावरून हटवले होते. त्यावेळेपासून ते मि. क्लिन अशी प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करत आहेत.
तरीही त्यांचे सरकार आणि पक्षावर मायनिंग आणि चीट फंड गैरव्यवहार प्रकरणी संशयाची सुई वळली होती. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केल्याने त्यांनी दोन आमदार आणि एका खासदाराला उमेदवारी नाकारली होती; मात्र त्यांनी दोन्हीही आमदारांच्या मुलांना उमेदवारी दिली होती.
आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या पाचव्या कारकिर्दीत नवीन पटनाईक यांनी नागरिक केंद्रीभूत मानून राज्यकारभारावर भर दिला आहे. त्यासाठी त्यांनी तंत्रज्ञान, पारदर्शकता, संघशक्ती, वेळ आणि परिवर्तन अशा पाच ‘टी’वर भर दिला आहे. या धोरणाच्या कार्यवाहीची परिणामकारकता आणि उपयुक्तता तपासण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः तसेच त्यांचे वरिष्ठतम अधिकारी सामान्य नागरिकांना दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना सरकारी सेवेचा योग्य प्रकारे लाभ मिळत आहे का, अशी विचारणा करतात.
मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव व्ही. के. पाण्डियन यांना पहिले ‘फाईव्ह टी सचिव’ केले असून, ते अधिकाऱ्यांसह सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांसह विविध ठिकाणी भेटी देऊन कार्यवाहीची अचानकपणे तपासणी करत असतात. पोलिस ठाण्यांचा कारभारदेखील अधिक नागरिकाभिमुख केला आहे.
नवीन पटनाईक यांनी आपल्या आधीच्या मुख्यमंत्र्यांपेक्षाही मोठ्या संख्येने कल्याणकारी योजना आखून कार्यवाहीत आणल्या आहेत. गरिबांना एक रुपयात किलोभर तांदूळ ते केंद्र सरकारच्या पीएम-किसान योजनेसारखी असलेली कालिया योजना, अशा विविधांगी योजनांद्वारे कल्याणकारी उपक्रम त्यांच्या सरकारने राबवले आहेत. सामान्यांच्या सर्वांगिण विकासासह राज्यातील पायाभूत सुविधा ते औद्योगिकीकरणावर त्यांच्या सरकारने भर दिला आहे.
महिलांच्या स्वयंसहायता गटांना दिलेला भरघोस पाठिंबा हे नवीन पटनाईक यांच्या सरकारचे यशच मानले पाहिजे. त्यांच्याच सरकारने नव्याने ‘बिजू स्वास्थ्य कल्याण योजना’ सुरू केली आहे, तिचा राज्यातील सुमारे ९६.५ टक्के जनतेला लाभ होणार असून, त्याचा पुरूष (पाच लाख रुपये) आणि महिला (दहा लाख रुपये) दोघांनाही लाभ होणार आहे.
मतपेटीवर नवीनबाबू ओडिशातील जनतेवर सातत्याने प्रभाव राखू शकले यामागे त्यांची राष्ट्रीय राजकारणात न उतरण्याचा निर्धार आणि दिल्लीतील राजकारणावर वर्चस्व राखण्याचे धोरण कारणीभूत आहे. ओडिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांचे १९९७मध्ये निधन झाले आणि सर्वकाही बदलून गेले.
तत्कालीन पंतप्रधान इंदरकुमार गुजराल यांच्या आग्रहानुसार नवीन पटनाईक यांनी वडिलांच्या अक्सा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तो विजय त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. त्यावेळेपासून ओडिशाच्या सार्वजनिक जीवनात कुर्ता-पायजम्यातील नवीन पटनाईक हे नित्याचे चित्र बनून गेले.
त्यांची दोन्हीही कार्यलये, राज्य सचिवालयातील एक आणि त्यांचे निवासस्थान, अशा दोन्हीही ठिकाणी त्यांच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव जाणवतो. जरी पटनाईक यांना उडिया फारशी येत नसली, त्यांचे उच्चार इंग्रजी वळणाचे असले तरी, त्यांच्या परानुभुती वृत्तीने त्यांच्या राजकारणाने ओडिशात चांगलेच मूळ धरले आहे.
रोल मॉडेल ओडिशा
नवीन पटनाईक यांचे मुख्य सल्लागार आणि निवृत्त आयएएस अधिकारी आर. बालकृष्णन सांगतात की, ओडिशा एकेकाळी परिघावरचे दुर्लक्षित राज्य होते. बड्या कंपनी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचे राज्यात मुख्यालय नव्हते. तथापि विकासाची कास धरली आणि परिघ हाच केंद्रबिंदू बनून गेला. हॉकीचा जागतिक करंडक किंवा मंदिरांचे संवर्धन अशा कितीतरी बाबतीत पाहा, राज्याने रोल मॉडेल म्हणून स्वतःला पुढे आणले आहे.
राज्याच्या अस्तित्वाचा लढा आता संपलेला आहे, त्याच्याबाबतचे सर्व गैरसमज त्याने दूर केले आहेत. केवळ योजना बनवून चालत नाही, त्यांच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावाही महत्त्वाचा असतो. ‘मो सरकार’ उपक्रमाअंतर्गत अधिकारी, मंत्री, सचिव एवढेच नव्हे तर काहीवेळा मुख्यमंत्री स्वतःही लाभार्थ्यांशी थेट संपर्क साधून त्यांचा अभिप्राय घेतात, त्यांच्याशी चर्चा करतात.
ओडिशा भाजपशी पटनाईक यांचे जुळत नसले तरी त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले सूत जमले आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला पहिला पाठिंबा त्यांनी दिला. केंद्र सरकारच्या बहुतांश विधेयकांना पाठिंबा देणाऱ्यांमध्ये नवीन पटनाईक आघाडीवर आहेत. तरीही त्यांनी केंद्राच्या आयुष्यमान भारतसारख्या योजनेला वाट मोकळी होऊ दिली नाही, कारण ओडिशा सरकारची स्वतःची तशी योजना आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.