दिव्यांगांसाठी अविरत झटणारी ‘स्नेहज्योत’

फक्त ती नेमकेपणाने ओळखून त्यासाठी काम करण्याची गरज आहे. ‘स्नेहज्योत’ दिव्यांग सेवा प्रतिष्ठान तीन वर्षांपासून असेच काम करत आहे
Snehjyot Divyang Seva Pratishthan Self reliance to disabled
Snehjyot Divyang Seva Pratishthan Self reliance to disabledsakal
Updated on
Summary

फक्त ती नेमकेपणाने ओळखून त्यासाठी काम करण्याची गरज आहे. ‘स्नेहज्योत’ दिव्यांग सेवा प्रतिष्ठान तीन वर्षांपासून असेच काम करत आहे

अपंग, अधू आणि मूकबधिर अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींना ‘दिव्यांग’ म्हणून संबोधले जाते. पण अशा व्यक्तींत कोणतीही कमतरता नसून त्यांच्यात ‘दिव्यशक्ती’ आहे, याची जाणीव त्या नावावरून होते.

फक्त ती नेमकेपणाने ओळखून त्यासाठी काम करण्याची गरज आहे. ‘स्नेहज्योत’ दिव्यांग सेवा प्रतिष्ठान तीन वर्षांपासून असेच काम करत आहे. संयमी व संवेदनशील व्यक्तींनी एकत्र येऊन प्रतिष्ठानची स्थापना करून अविरतपणे भरीव काम सुरू ठेवले असून दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू आहे.

- आरती धबाले, मुंबई

विविध क्षेत्रांत अनेक वर्षे कार्यरत असलेल्या काही व्यक्तींनी एकत्र येऊन समाजसेवा करण्याचा निश्चय केला. दिव्यांगांसाठी ३५ वर्षे सतत कार्यरत असणाऱ्या दादा पटवर्धन व त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या सुधा अनिलकुमार वाघ यांच्यासह इतर आठ जणांनी मिळून ‘स्नेहज्योत’ संस्था स्थापन केली. अरुण वालावलकर संस्थेचे संस्थापक आहेत.

खऱ्या अर्थाने संस्थेच्या स्थापनेपूर्वीच कामाला सुरवात झाली होती. कोरोना काळात दिव्यांगाचे होणारे हाल पाहून कार्य सुरू झाले. ते पाहून अरुण वालावलकर व मिलिंद तेंडुलकर यांनी केलेले आर्थिक सहकार्य व शशांक कोकीळ यांनी जागेसाठी तात्पुरती अडचण सोडविण्यास केलेल्या मदतीमुळे सर्वांचा उत्साह वाढीस लागला.

विविध उपक्रमांनी सुरुवात

प्रारंभी संस्थेच्‍या सदस्यांनी दिव्यांगांची घरोघरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या अडचणी लक्षात येत गेल्या. त्या दूर करून दिव्यांगांना सक्षम करून त्यांचे व त्यांच्या पालकांचे नैराश्य दूर करणे गरजेचे असल्याची जाणीव तेव्हाच झाली. संस्थेची नोंदणी होईपर्यंत काही दात्यांच्या सहकार्याने दिव्यांगांसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले.

परिसरातील शाळा, मंदिर, रेल्वे, चित्रपटगृह इत्यादींचा उपयोग त्यासाठी करण्याचे ठरविण्यात आले. त्या अनुषंगाने संस्थेत दिव्यांग बंधू-भगिनींसाठी योग शिबिर, चित्रपटगृहात सिनेमे पाहणे, मेट्रोची सफर, क्रीडा शिबिर, निसर्ग सहल, समुपदेशन इत्यादी उपक्रम आयोजित केले गेले.

तसेच २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट रोजी दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेले ध्वज व विविधरंगी फुलांचे वितरण दिव्यांग विद्यार्थ्याच्या हस्ते पोलिस, परिचारिका आणि डॉक्टर यांना करण्यात येते. यानुसार त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतो.

काम पाहण्याचे देणगीदारांना आवाहन

२०२० मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उभारलेली कार्याची गुढी दिवसेंदिवस कार्यकर्त्यांच्या संख्यावाढीमुळे व दिव्यांग बंधूभगिनींकडून उत्साहाने होत असलेल्या प्रगतीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. विविध ठिकाणांहून दाते प्रोत्साहन देण्यासाठी येऊ लागले. संस्थेचे विशेष म्हणजे, तुम्ही सर्व प्रथम आमच्या केंद्रात या, आमचे कार्य प्रत्यक्षात पाहा आणि त्यानंतरच देणगी द्या, असे आवाहन देणगीदारांस केले जाते.

दिव्‍यांगांचे सक्षमीकरण

संस्थेतर्फे दिव्यांगांना कागदी फुले, बुके, हार इत्यादी वस्‍तूंसह शिवण विभागात कपड्यापासून तयार करावयाच्या साडी फोल्डर, पर्स व बॅगा तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली. दिव्यांगांना क्रचेस, व्हिलचेअर आणि शिवण मशिन असे साहित्‍य उपलब्ध करून देणे, त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यास मदत करणे, गरजेची निकड पाहून वैद्यकीय मदत करणे,

छोटे उद्योग करण्यासाठी साधनसामुग्री देऊन त्यात जम बसविण्यास सहकार्य करणे, त्यांनी बनवलेल्या वस्तूंच्या विक्रीस मदत करणे व त्याचे मानधन देऊन आपण अर्थार्जन करू शकतो, असा आत्मविश्वास त्यांच्या मनात वाढवणे संस्थेचे ध्येय आहे.

काही दिव्यांग विद्यार्थ्यांना ‘झोमाटो’ने डिलिव्हरी बॉय म्हणून नेमले आहे. त्यासाठी न्यूमोशन कंपनीद्वारे बनवण्यात आलेली ईव्ही स्कूटर कम व्हिलचेअर त्यांना देण्यात आली. समाजानेही अशा डिलिव्हरी बॉयना सहकार्य करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा संस्थेच्या सचिव सुधा वाघ यांनी व्यक्त केली.

पालकांचे समुपदेशन

संस्थेतर्फे दिव्‍यांग व्‍यक्‍तीच्‍या घरातील अडचणी समजून घेतल्या जातात. फराळ देण्यासाठी व वाटप केलेल्‍या विविध वस्तूंसंदर्भात माहिती घेण्याच्या निमित्ताने त्यांच्या घरी संस्थेच्या कार्यकर्त्यांना पाठवले जाते.

त्यांच्या समस्या शोधून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यास उद्युक्त केले जाते. आर्थिक अडचणी असतील तर संस्थेपर्यंत येण्या-जाण्याचा प्रवास खर्च देण्यात येतो. त्यांच्या पालकांचेही समुपदेशन केले जाते.

पत्नीच्या स्मरणार्थ संस्‍थेची स्थापना

अरुण वालावलकर संस्थेचे संस्थापक आहेत. स्वतः अंध असूनही ते रात्र असो वा दिवस, दिव्यांगजनांसाठी कार्यशील असतात. त्यांच्या पत्नी स्नेहलता वालावलकर यांचे कर्करोगाने निधन झाले. त्याही दिव्यांगांसाठी काम करण्यात पुढे असायच्या. त्यांच्या स्मरणार्थ ‘स्नेहज्‍योत’ संस्था उभारण्यात आली. त्यांच्याच नावावरून संस्थेचे नाव ‘स्नेहज्योत’ असे ठेवण्यात आले आहे.

समाजातील तरुणांमध्ये दिव्‍यांगांबद्दल जाणीव निर्माण करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. दिव्यांगांच्या अडचणी समजून घेऊन त्या दूर करणे व त्यांना स्वावलंबी करणे संस्थेचे ध्येय आहे. त्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते सदैव प्रयत्नशील असतात. संस्थेसाठी आम्हाला शासनाकडून जागा मिळाली तर जास्तीत जास्त दिव्यांगांना आम्ही सक्षम बनवू शकतो.

- अरुण वालावलकर, संस्‍थापक, स्नेहज्‍योत

प्रेरणादायी हातांची गाथा

माणूस उभा राहतो तो परस्परांच्या प्रेरणांतून. लढणारे हात संकटात सापडलेल्यांना प्रेरणा आणि जिद्द देतात प्रसंगी मार्गही दाखवितात. अशाच काही लढवय्यांच्या प्रेरणादायी कथा आपल्यासमोर सादर करत आहोत. तुमच्याशेजारी असेच लढणारे लोक असतील तर त्यांची संघर्षगाथा आम्हाला पाठवा. यासाठी फक्त एकच करायचे आहे. क्यूआरकोड स्कॅन करून किंवा नावासह editor.pune@esakal.com या मेलवर तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर माहिती पाठवावी. निवडक संघर्षगाथांना आम्ही प्रसिद्धी देऊ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.