- डॉ. जे. एन. श्रीवास्तव, डॉ. के. मदन गोपाल, डॉ. स्वर्णिका पाल, डॉ. अर्पिता, डॉ. अभय दहिया
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थांवरचा लोकांचा विश्वास पुनःस्थापित करण्यासाठी आरोग्य मंत्रालय प्रयत्न करीत आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने त्यासाठी बहुआयामी धोरण अवलंबले आहे. त्यातील एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे २०२२ च्या भारतीय सार्वजनिक आरोग्यविषक मानकांमध्ये केलेल्या सुधारणा. त्याची माहिती.
‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’ हा आरोग्यविषयक सर्वंकष सेवा सुविधा सर्वत्र आणि सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबवला जात असलेला महत्त्वाचा उपक्रम. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत प्रामुख्याने आदिवासी तसेच आजवर अशा सोयीसुविधांपासून वंचित राहिलेल्या भागांवर लक्ष केंद्रित केले आहे.
याअंतर्गत आरोग्यविषयक पायाभूत सेवासुविधा बळकट करणे, मनुष्यबळाची उपलब्धता वाढवणे आणि आवश्यक वैद्यकीय सेवा सुविधांच्या पुरवठ्याची हमी यावर भर आहे. अशा एकजिनसी प्रयत्नांमधून सार्वजनिक आरोग्यविषयक स्थितीत सुधारणा घडवून आणणे हा उद्देश आहे.
लोकसंख्यावाढीचे स्थिरीकरण, माता,अर्भक आणि बाल आरोग्य तसेच संसर्गजन्य रोगांशी संबंधित प्रमुख निर्देशांकांमध्ये भारताने लक्षणीय सुधारणा घडवून आणली आहे. तरीही आरोग्यव्यवस्थेसमोर वाढती लोकसंख्या, उद्भवणारे नवे आजार, सातत्याने बदलणारी स्थिती, आरोग्यविषयक स्थितीनुसार योग्य उपचारसुविधांची उपलब्धता आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा अशी आव्हाने आहेतच.
सार्वजनिक सेवासुविधांचा क्षमतेपेक्षा कमी वापर, अयोग्य,असुरक्षित उपचार, चुकीचे निदान आणि रुग्णांचा आदर न करणारी आरोग्यविषयक सेवा हे प्रश्न आहेत. खराब आरोग्यविषयक पायाभूत सुविधा, आरोग्यक्षेत्राशी संबंधित मनुष्यबळाची कमतरता व रुग्णांची निगा घेण्याची निकृष्ट सेवा या समस्या भेडसावताहेत.
यातून सार्वजनिक व्यवस्थांवरचा लोकांचा विश्वास उडतो. तो पुनःस्थापित करण्यासाठी आरोग्य मंत्रालय प्रयत्न करीत आहे. या समस्यांची दखल घेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने बहुआयामी धोरण अवलंबले आहे. त्यातील एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे २०२२च्या भारतीय सार्वजनिक आरोग्यविषक मानकांमध्ये केलेल्या सुधारणा.
या सुधारणांच्या माध्यमातून आरोग्य मंत्रालयाने ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येक स्तरावरील आरोग्यविषयक निगा केंद्रांमध्ये मूलभूत सेवा सुविधांच्या अद्ययावतीकरणाचा मार्ग खुला केला. मानकांमधील या सुधारणांनी सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेअंतर्गत आरोग्यविषयक सेवासुविधांच्या वितरणप्रणालीशी संबंधित घटकांना अद्ययावत करण्यासाठीचा व्यापक आराखडा उपलब्ध करून दिला आहे.
खरे तर आरोग्यसेवा पुरवण्यासाठी व्यवस्थेच्या प्रत्येक स्तरावर अनुकूल स्थिती निर्माण करावी लागते. या अनुषंगानेच सुधारित मानकांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आरोग्यविषयक पायाभूत सुविधा, उपकरणे, औषधे, निदानव्यवस्था, मनुष्यबळ अशा महत्त्वाच्या बाबींसाठीची मानके अधिक स्पष्ट स्वरुपात मांडली गेली आहेत. ही सुधारित मानके राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांनाही सहाय्यभूत ठरली आहेत.
या मानकांची मुख्य उद्दिष्टे राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत आहेत. सार्वजनिक आरोग्यविषयक मानकांमध्ये आरोग्य सेवा सुविधा केंद्रे स्थापित करण्यासाठी लोकसंख्येशी संबंधित निकषांची पुनर्रचना केली आहे. लोकांना आरोग्यविषयक सेवा वेळेत सुलभतेने उपलब्ध होतील, यावर भर दिला गेला आहे. नेमके उपचार आणि आरोग्यसेवांसाठी रुग्णांना कुठे जावे लागेल किंवा पाठवावे लागेल, यासंबंधीची स्पष्टता व सुलभता आणण्यात येत आहे.
जेणेकरून आरोग्यसेवांचे वितरण हे रुग्णस्नेही आणि सन्मानजनक पद्धतीने होऊ शकेल. त्याचवेळी या सगळ्याशी संबंधित प्रत्येक घटकावरचा आर्थिक भारही कमी व्हावा, हेही उद्दिष्ट आहेच. त्यासाठी काही महत्त्वाच्या सूचनाही या मानकांमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.
सेवांची गुणवत्ता
एकीकडे भारतीय सार्वजनिक आरोग्यविषक मानकांच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेत प्रत्येक स्तरावर सेवा सुविधांची उपलब्धता कशा प्रकारे असायला हवी, याबाबत नेमक्या सूचना दिल्या आहेत. मंत्रालयाने अयोग्य आणि असुरक्षित उपचार, चुकीचे निदान अशा समस्यांना आळा घालण्यासाठी आरोग्यविषयक देखभाल व सेवांची गुणवत्ता सुधारण्याच्या गरजेला प्राधान्य दिले आहे.
त्याअनुषंगानेच ‘राष्ट्रीय गुणवत्ता वचनबद्धता मानके’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची आखणी करून, त्याच्या अंमलबजावणीलाही सुरुवात केली आहे. या माध्यमातून सुविधा रुग्णकेंद्री व दर्जेदार असतील, हे पाहिले जाईल. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या माध्यमातून देशाच्या आरोग्यविषयक सेवा सुविधांची सध्याची गुणवत्ता आणि कमतरता समजून घेत त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्रुटी दूर करण्यावर भर दिला गेला आहे.
आरोग्यसेवांच्या गुणवत्तेमुळेच आपली सामुदायिक आरोग्यविषयक स्थिती सुधारण्यात देखील मदत होत असते. त्यासोबतच रुग्णाना मिळणाऱ्या समाधानकारक अनुभवात वृद्धी होत असते. तसेच आरोग्यसेवा पुरवठादारांच्या अनुभवातही भर पडते आणि त्यांच्यावरील आरोग्यसेवा पुरठ्याच्या खर्चातही कपात शक्य होते.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत प्रमाणित आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांच्या उपलब्धतेची हमी मिळाल्याने नागरिकांचा सुविधांवरचा विश्वासही वाढू लागतो. उपचारांसाठी सार्वजनिक केंद्रांमध्ये येण्याचे वाढलेले प्रमाण आणि त्याचवेळी प्रत्येक भागधारकाचे परस्परांसोबतचे वृद्धिंगत संबंध याचीच साक्ष देत आहेत. या सगळ्याच्या जोडीला ‘राष्ट्रीय गुणवत्ता वचनबद्धता मानकां’ची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
विषमतेपासून मुक्ती
आरोग्यसेवा गुणवत्तापूर्ण असतील याची सुनिश्चिती केल्याने, समांतरपणे याबाबतीतली विषमतेची समस्याही आपोआपच दूर झाली आहे. यामुळे सर्व रूग्णांना, ते कोणत्याही पार्श्वभूमीचे किंवा कोणत्याही परिस्थितीतून आलेले असले, तरी त्याचा संबंध न लावत एकसमान आरोग्यविषयक सेवा सुविधा मिळतील याची सुनिश्चिती केली गेली आहे. खरे तर आरोग्य सेवाव्यवस्थेत समानता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने या महत्त्वाच्या बाबी आहेत. प्रत्येकाला सुलभतेने जगण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या तत्त्वाशीही सुसंगत आहेत.
सर्वात मोठी मोहीम
कोविड महासाथीच्या आव्हानात्मक काळात मिळालेल्या अनुभवांचा आणि त्यातून मिळालेल्या शिकवणीला लक्षात ठेवूनच सार्वजनिक आरोग्य आणीबाणीला तोंड देण्यासाठीची तयारी म्हणून, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने आजवरची सर्वात मोठी देशव्यापी मोहीम (‘प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्यविषयक पायाभूत सोयी सुविधा अभियान’) हाती घेतली आहे.
या उपक्रमाअंतर्गत पायाभूत सुविधांची उभारणी आणि आरोग्यविषयक स्थितीवर सतत देखरेख या बाबींवर भर दिला गेला आहे. यासोबतच आरोग्यविषयक सेवा सुलभतेने उपलब्ध होतील, त्या कार्यक्षम, परिणामकारक आणि गुणवत्तापूर्ण असतील, याची निश्चिती करण्यासाठी एकात्मिक सार्वजनिक आरोग्यविषयक प्रयोगशाळांची व्यवस्था उभारून नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरातील चाचणी प्रयोगशाळांची सोय उपलब्ध करण्यावर भर आहे.
एकात्मिक सार्वजनिक आरोग्यविषयक प्रयोगशाळांची व्यवस्था हा ‘प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्यविषयक पायाभूत सोयी सुविधा अभियाना’अंतर्गतचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. या प्रयोगशाळांमुळे जलद, विश्वासार्ह आणि अचूक निदानचाचणी करणे शक्य होणार आहे, आणि त्यासोबतच या प्रयोगशाळा जिल्हा आणि उप- जिल्हा पातळीवरचा दुवा म्हणूनही काम करू शकणार आहेत.
यामुळेच या प्रयोगशाळा म्हणजेच कोणत्याही आणि बदलत्या परिस्थितीत टिकाव धरू शकणारी आरोग्यव्यवस्था उभारण्याच्या दिशेने देशाने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. देशाची भौगोलिक आणि लोकसांख्यिकीय विविधता व्यापक आहे. त्यामुळेच त्यासाठी प्रादेशिक पातळीवर आरोग्यव्यवस्थांना अनेकदा विशिष्ट आव्हानांचा सामना करावा लागतो.
या परिस्थितीतही सुरक्षित, प्रभावी, रुग्णकेंद्रित, प्रत्येक टप्प्यावर वेळेत कार्यवाही करू शकणारी, कार्यक्षम आणि समन्यायाच्या तत्त्वाचे पालन करणारी आरोग्यव्यवस्था स्थापन करून, सर्वंकष सार्वजनिक आरोग्यविषयक सेवा प्रदान करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.
यालाच समांतरपणे, सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये राष्ट्रीय गुणवत्ता वचनबद्धता मानकांच्या अंमलबजावणीमुळे, सुरक्षित, परिणामकारक आणि रुग्णकेंद्री आरोग्यसेवा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचा असलेला, गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांचा पुरवठाही सुनिश्चित झाला आहे. यामुळे उपचारांची चांगली परिणाकारकता, रुग्णांना मिळणारे समृद्ध अनुभव आणि अधिक कार्यक्षम सार्वजनिक आरोग्यसेवा व्यवस्था आकाराला येण्याच्या दिशेची वाटचाल शक्य झाली आहे.
हे परिवर्तनकारी उपक्रम म्हणजे उपचारांची चांगली परिणाकारकता, प्रतिबंधित रोगांचा भार करणे, आणि शासकीय आरोग्य सेवा व्यवस्थेवरील विश्वासाला बळकटी आणण्याची ग्वाही आहे.
(डॉ. जे. एन. श्रीवास्तव हे राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राअंतर्गतच्या सार्वजनिक आरोग्य प्रशासन विभागात गुणवत्ता आणि रुग्ण सुरक्षा विभागाचे सल्लागार तर डॉ. अभय दहिया वैद्यकीय सल्लागार आणि डॉ. के. मदन गोपाल सल्लागार म्हणून कार्यरत आहेत, तर डॉ. स्वर्णिका आणि डॉ. अर्पिता यासंस्थेत वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.