सरकारी विभाग आकडेवारीच्या खेळात पारंगत असतात. अलीकडेच जाहीर झालेल्या भारतातील वनस्थितीच्या अहवालात (इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट, २०२१) देशातील वृक्षाच्छादन (झाडांची संख्या) वाढल्याचे म्हटले आहे. यावरून कुणीही देशातील वनांचे आरोग्य सुधारल्याचा अंदाज काढू शकतो. परंतु, स्थिती उलट आहे. देशात नैसर्गिक घनदाट जंगल क्षेत्रातील वनाच्छादनात घट झालेली आहे. एकीकडे वाढते प्रदूषण आणि हवेची गुणवत्ता वेगाने घसरत असतानाच घनदाट जंगलातील वनाच्छादनात घट झाल्याचे चित्र निराशाजनक आहे. वृक्ष आपल्याला नको असलेला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि हवा असलेला ऑक्सिजन हवेत सोडतात. त्यामुळे जंगल क्षेत्राची घनता कायम राखणेही गरजेचे आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाटासह सर्वाधिक वनक्षेत्राच्या विदर्भातील वनाच्छादनात घट दिसते. ही धोक्याचीच घंटा आहे.
सर्वांत धोकादायक म्हणजे देशाचे फुफ्फुस मानली जाणारी हिमालयातील वनराजी कमी होत आहे. देशातील एकूण वनक्षेत्र हे एकूण भूभागाच्या २१.५४ टक्के आहे. त्यात वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. त्याचे श्रेय तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि ओडिशा या राज्यांना जाते. या उलट नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम, नागालँड या राज्यांसह महाराष्ट्राने घट नोंदविलेली आहे. महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्राची २०१५ च्या आकडेवारीसोबत तुलना केली तर आपल्याकडे जवळपास १४९ चौरस किलोमीटर क्षेत्राची घट दिसते. दिलासा फक्त एवढाच आहे की, नवी मुंबई, ठाणे, रायगड, सिंधूदुर्ग या जिल्ह्यांतील वृक्षाच्छादनात वाढ झाली आहे.
गेली अनेक वर्षे अभ्यासक पर्यावरण ऱ्हास आणि त्याचे सजीव सृष्टीवरील परिणाम याबाबत धोक्याचे इशारे देत आहेत. वृक्ष लागवड आणि संवर्धनावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्ची पडूनही उत्साह वाढविणारे निष्कर्ष समोर येत नाहीत. आज जगातील सर्वाधिक प्रदूषित ३० शहरांपैकी २२ शहरे भारतात आहेत. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक प्रदूषित शहरे असलेले महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. महाराष्ट्रातील १८ प्रदूषित शहरांपैकी चंद्रपूर आणि पुणे ही शहरे सर्वाधिक प्रदूषित शहरे आहेत. त्यानंतर प्रदूषित शहरांमध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, अकोला, अमरावती, बदलापूर, उल्हासनगर, लातूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सोलापूर या शहरांचा समावेश होतो. हवा प्रदूषण हे आरोग्यासाठी सर्वाधिक घातक मानले जाते. त्याचा एकूण सजीव सृष्टीच्या अस्तित्वाशी संबंध आहे. अनेक गंभीर आजारांचे मूळ हे हवा प्रदूषणात आहे. मानवी सभ्यतेच्या विकासातच वृक्षांचे मोठे महत्त्व आहे.
अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या प्रमुख गरजा वृक्षांनीच भागविल्या आहेत. आजही आपल्या जीवनात वृक्षांना अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी दररोज सुमारे ५५० लीटर ऑक्सिजनची गरज असते. श्वासाच्या माध्यमातून आत घेतलेल्या हवेपैकी केवळ २० टक्के ऑक्सिजन असतो. त्यामुळे ऑक्सिजनची पूर्तता होण्यासाठी एका व्यक्तीला साधारणतः तीन झाडांची गरज भासते. एक झाड दररोज सुमारे २३० लीटर ऑक्सिजन देते आणि त्या बदल्यात वातावरणातील ४८ पौंड कार्बन डायऑक्साईड शोषून घेते. एका झाडामुळे वायू प्रदूषणाच्या माध्यमातून होणारे सुमारे ३५ लाख रुपयांचे नुकसान टळते. परिसरातील तापमान दोन अंशांनी कमी होते. यावरून झाडांचे महत्त्व लक्षात येईल. ज्या वनाला आपण इंग्रजीत ‘फॉरेस्ट’ म्हणतो त्याचा विस्तृत अर्थ फूड, ऑक्सिजन, रेन, एनर्जी आणि टीक असे जीवनाशी संबंधित महत्त्वाचे घटक त्यापासून मिळतात. वरील बाबी पाहता वनाच्छादन कमी होण्याचे धोके लक्षात आणण्यासाठी हे पुरेसे वाटते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.