ऐन तिशीतल्या तरुणाने वैचारिक लेखनाचा ध्यास घ्यावा, प्रसिद्धीचा सोस न बाळगता वाचन-लेखनात स्वतःला गुंतवून घ्यावे, ही गोष्टच अपूर्व म्हणावी लागेल. राहुल कोसंबीने मात्र हाच मार्ग पत्करला आणि आता साहित्य अकादमीच्या पुरस्काराने मोहोर उमटविल्याने त्याच्याविषयीच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. चिकित्सक वृत्ती हे त्याचे वैशिष्ट्य. ते त्याच्या साहित्यात स्पष्टपणे प्रतिबिंबित होते.
सामाजिक प्रश्न आधी नीट समजावून घ्यावेत आणि तो सोडविण्याच्या दृष्टीने काहीएक वैचारिक बैठक तयार व्हावी, हा या लेखकाचा स्वभावधर्म. ऊठसूट प्रत्येक गोष्टीवर चटकन काही प्रतिक्रिया देत बसण्याच्या आजच्या "ट्विटर-फेसबुकीय' छापाच्या लेखनाच्या अगदी विरुद्ध ध्रुवावरील असा कसदार अनुभव राहुलच्या साहित्यातून पाहायला मिळते. त्यांच्या प्रत्येक लेखानंतरच्या पुढच्या लेखाची वाट म्हणूनच आवर्जून पाहिली जाते. "उभं-आडवं' या पुस्तकात राहुल कोसंबीचे काही निबंध एकत्रित करण्यात आले आहेत. दलित समाजाचे प्रश्न, आंबेडकरवाद यावर तो लिहितो; त्याचबरोबर समाजात घडणाऱ्या विविध बऱ्यावाईट घटनांवरील परखड भाष्यही त्याच्या लेखनात असते. आजच्या आपल्या जगण्यातील व्यामिश्रता, त्यात अंतर्भूत असलेले प्रश्न या सगळ्यावर दरवेळी एक तिरका छेद देऊन केलेले लेखन वाचकांना राहुलच्या लेखणीतून वाचायला मिळते. इंग्रजीत ज्याला "थर्ड अँगल' म्हटले जाते, ते या लेखकाच्या विश्लेषणातून नेहमीच अनुभवायला मिळते.
आसपासच्या भवतालात घडणाऱ्या कुठच्याही गोष्टीकडे सुटंसुटं न पाहता ते त्याच्या आजवरच्या अनेक संदर्भांच्या आधारे पाहणे आणि त्यातून झालेल्या आकलनातून भूमिका घेणे, हे राहुलचे वैशिष्ट्य. त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनातून वेळोवेळी याचा प्रत्यय येतो. एकीकडे अभ्यासकाची भूमिका आणि त्याला असणारी जमिनीवरल्या वास्तवाची जोड असे दुर्मिळ मिश्रण त्यांच्या लेखनात जाणवते.सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक घडामोडींचा आपल्या शैलीत वेध घेताना त्यात संशोधकाचे अंगभूत ताटस्थ्य जपणारा हा लेखक सध्या "नॅशनल बुक ट्रस्ट' या एका महत्त्वाच्या संस्थेच्या मराठी आणि कोकण विभागाच्या संपादकपदाची जबाबदारी सांभाळत आहे.
|