‘ओमीक्रॉन’चे कडवे आव्हान ?

संपूर्ण जगाला दोन वर्षे वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूचा नवा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.
‘ओमीक्रॉन’चे कडवे आव्हान ?
Updated on

कोरोनाच्या ‘डेल्टा’नंतर आता आफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमीक्रॉन’ या नव्या व्हेरिएंटने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. या नव्या स्ट्रेनमध्ये विलक्षण उत्परिवर्तन दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनासोबत जवळ जवळ दोन वर्षे लढा देऊन मिळवलेली ‘हर्ड इम्युनिटी’ किंवा लशींमुळे मिळालेली सुरक्षा या नव्या विषाणूशी लढताना पणाला लागू नये, अशीच जगाची इच्छा आहे.

डॉ. नानासाहेब थोरात

संपूर्ण जगाला दोन वर्षे वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूचा नवा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. ‘ओमीक्रॉन’ असे नाव देण्यात आलेला हा नवा प्रकार जगातील सर्वच देशांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. त्याचे कारण तसेच आहे, कारण तो यावेळी आफ्रिकेतून आला आहे. या स्ट्रेनचा व्यापक प्रसार झाल्यास कोविडचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होऊ शकते आणि सध्या वापरत असलेल्या लशींचा प्रभाव कमी होऊ शकतो. आता जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाच्या ‘डेल्टा’ व्हेरिएंटपेक्षा त्यामध्ये विलक्षण उत्परिवर्तन म्हणजेच बदल झालेला दिसून येतोय.

तो बदल विशेषतः कोरोनाच्या मानवी पेशीतील प्रवेशाची किल्ली असणाऱ्या स्पाईक-S प्रोटिनमध्ये असून, पूर्वीच्या ‘डेल्टा’ व्हेरिएंटपेक्षा ३२ म्युटेशन (उत्परिवर्तने) अधिक झाली आहेत. स्पाईक-S प्रोटीनमध्ये जेवढी जास्त उत्परिवर्तने होतात, तेवढ्याच वेगाने त्या विषाणूची शरीरातील पेशींमध्ये वेगाने प्रवेश करण्याची क्षमता वाढते. कोरोनासोबत जवळजवळ दोन वर्षे लढा देऊन मिळवलेली ‘हर्ड इम्म्युनिटी’ किंवा लशींमुळे मिळालेली सुरक्षा या बदलांमुळे पणाला लागू नये, अशीच जगाची इच्छा आहे. कोरोनाचा पहिला मूळ व्हेरिएंट चीनमध्ये २०१९च्या अखेरीस सापडला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये ब्रिटनमध्ये दुसऱ्या व्हेरिएंटमुळे (अल्फा) दुसरी लाट आली होती. मार्च २०२० मध्ये भारतात त्याचा पुढचा व्हेरिएंट (डेल्टा) दिसून आला आणि भारतामध्ये दुसरी लाट याच डेल्टामुळे आली होती. याचबरोबर मे २०२० मध्ये दक्षिण आफ्रिकेतच बीटा आणि नोव्हेंबर २०२० मध्ये ब्राझीलमध्ये ‘गामा’ हे व्हेरिएंट आढळले होते.

विषाणू बदलतो म्हणजे काय?

विषाणूमध्ये बदल होताना तो अधिक बलवान होतो किंवा तो कमकुवत होतो. याचबरोबर त्याच्यामध्ये पुढीलपैकी एक किंवा अनेक गोष्टी घडतात. विषाणू बलवान झाल्यास त्याची प्रसारक्षमता वाढते. यामुळे कमी वेळात रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आणि एकाचवेळी संपूर्ण कुटुंबे बाधित होतात. किंवा विषाणूची संसर्ग करण्याची क्षमता वाढल्याने त्याच्यापासून होणाऱ्या आजाराची गंभीरता वाढते. परिणामी कमकुवत प्रतिकारशक्ती असणाऱ्या लोकांच्या मृत्यूचा धोका वाढतो. त्याचबरोबर तिसरी आणि गंभीर परिस्थिती निर्माण होते, ती म्हणजे विषाणूला नैसर्गिक किंवा लशीमुळे तयार झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीपासून आणि औषधांपासून पळवाट मिळते. शरीरातील ॲन्टीबॉडीचा प्रभाव कमी किंवा नाहीसा होतो. त्यामुळे लसीकरणाचा प्रभाव (मिळणारी सुरक्षा) कमी होतो.

दक्षिण आफ्रिकेतील काही भागात अचानक कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यावर तेथील प्रशासनाने त्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट ‘ओमीक्रॉन’ दिसून आला. दक्षिण आफ्रिकेजवळील बोट्सवाना या देशात विषाणूचे पहिले जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाने त्याला ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ जाहीर केले आहे. म्हणजेच हा विषाणू जगाच्या चिंतेचा प्रकार आहे, हे सांगितले आहे. अगदी कमी वेळेत याला चिंतेचा प्रकार मानण्यामागे कारणही तसेच आहे. दक्षिण आफ्रिकेतील गौतंग भागातील रुग्णसंख्या नोव्हेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये अतिशय वेगाने वाढल्याचे निदर्शनास आले. जेव्हा यामागे ‘ओमीक्रॉन’ हा व्हेरिएंट असल्याचे समजले. तेव्हा त्याचा रिप्रॉडक्टिव्ह नंबर (पुनरुत्पादक संख्या, R number) १.९३ असल्याचे आढळले. म्हणजेच या विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण कमीत कमी दोन व्यक्तींना संसर्गित करू शकतो. त्यामुळे केवळ सहा दिवसांत रुग्णसंख्या चौपट होते. याची साथही अतिशय वेगाने पसरते.

हा विषाणू असाच वेगाने पसरत राहिला तर याचा R नंबर पाचपर्यंत जाऊ शकतो. आता असणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटचा R नंबर अद्याप २.५च्या आसपास आहे. डेल्टा व्हेरिएंटला ‘व्हेरिएन्ट ऑफ कन्सर्न’ जाहीर करण्यास संयुक्त राष्ट्रसंघाला महिन्याचा कालावधी लागला होता, तर ओमीक्रॉनला मात्र केवळ ७२ तासांत ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ जाहीर करण्यात आले आहे. ज्या गतीने आफ्रिकन देशांमध्ये कोविडची रुग्णसंख्या वाढत आहे, त्यावरून ‘ओमीक्रॉन’ची प्रसारक्षमता नक्कीच वाढलेली आहे. त्याच्या इतर अनेक क्षमतांविषयी अद्याप अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही. आफ्रिकी देशांमध्ये लसीकरण न घेतलेल्या व्यक्तींमध्ये याचा संसर्ग मुख्यतः आढळून आला आहे; मात्र ‘फायझर’सारख्या लशीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींमध्येही त्याचा संसर्ग आढळला आहे.

यावर उपाय म्हणून आधीपासून आपण अमलात आणत असलेले मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यास दिरंगाई करू नये. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वयोवृद्ध आणि प्रौढ लोकांना लशीचे दोन्‍ही डोस देऊन लसीकरण पूर्ण करणे अत्यावश्‍यक आहे. जर लसीकरण मे किंवा जून महिन्यापूर्वी पूर्ण झालेले असेल तर संसर्ग टाळण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्‍यक आहे. घरातील कॅन्सर, मधुमेह, तसेच इतर सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. लसीकरण पूर्ण झाल्यानंतर लहान मुलांमध्ये, तरुणांमध्ये लक्षण विहीन संसर्ग किंवा सर्दीसारखी लक्षणे असण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे संसर्ग पुढे जाऊ नये म्हणून लक्षणे नसतानाही काळजी घेणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.