प्रसंग आहे १९७१चा. भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर गेला होता. विमान उतरल्यावर सगळे भारतीय खेळाडू आणि व्यवस्थापक ‘इमिग्रेशन चेक’ करून बाहेर पडले. एक खेळाडू काही कारणाने मागे राहिला. जेव्हा तो ‘काउंटर’ला पोहोचला, तेव्हा तिथल्या धिप्पाड अधिकाऱ्याने विचारले की, ‘‘तू संघाचा उपव्यवस्थापक आहेस ना?’’
त्याने खेळाडूच असल्याचे स्पष्ट केले तेव्हा तो अधिकारी मिश्कीलपणे म्हणाला, ‘‘तुझी उंची बघता तू नक्कीच यष्टिरक्षक असणार...म्हणजे सेम स्टंपच्या उंचीचा.’’
त्यावर ‘‘नाही, नाही, मी फलंदाज आहे’, असे उत्तर मिळताच तो अधिकारी म्हणाला,‘‘ देवाकडे प्रार्थना कर की सुरवातीचे फलंदाज चांगले खेळूदेत आणि तुला फलंदाजीची वेळ यायला नको.’’ त्यावर ‘‘मी सलामीचा फलंदाज आहे आणि हा माझा पदार्पणाचा दौरा आहे,’’ असे त्या खेळाडूने सांगितले. त्याचे नाव अर्थातच सुनील गावसकर.
चकित झालेल्या त्या अधिकाऱ्याने विंडीज संघातील महाकाय वेगवान गोलंदाजांची नावे सांगितली आणि ‘‘सांभाळ आपल्या शरीराला’’, असा काळजीचा सल्लाही दिला.
१९७१च्या त्या दौऱ्यात सुनील गावसकरांनी १५४च्या सरासरीने ७७४ धावा काढल्या, तेव्हा त्या अधिकाऱ्याने गावसकर यांची माफीही मागितल्याचे सांगण्यात येते. या घटनेला ५० वर्ष होऊन गेली तरी वेस्ट इंडीजमध्ये सुनील गावसकरांना किती मान दिला जातो आणि अजून त्यांचे किती चाहते आहेत हे ‘टी-२०’ विश्वकरंडकाच्या निमित्ताने बघायला मिळाले. ज्यांनी भारतीय क्रिकेटला चांगली कामगिरी करून मान वर करून तोऱ्यात चालायला शिकवले, त्या सुनील गावसकरांचा ७५वा वाढदिवस साजरा केला जाताना आदराने मन भरून येत आहे.
गावसकरांनी भारतीय संघात प्रवेश करण्याआधी वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन देशांच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला सपाटून मार खाण्याची सवय होती. गावसकर आले आणि त्यांनी भल्याभल्या वेगवान गोलंदाजांना मोठ्या कौशल्याने आणि हिंमतीने तोंड दिले. भारतीय संघाचा धावफलक सुदृढ दिसायची शक्यता तेव्हाच वाढू लागली, जेव्हा सुनील गावसकरांनी खेळपट्टीवर ठाण मांडले. इम्रान खान, डेनिस लिली, इयान बोथम, माल्कम मार्शल, ज्योएल गार्नर, अँण्डी रॉबर्टस्, मायकेल होल्डिंग आणि रिचर्ड हेडलीसारख्या दर्जेदार वेगवान गोलंदाजांना सुनील गावसकरांनी तोंड दिले ते सुद्धा हेल्मेट न घालता.
‘हेल्मेट न घालता तुम्ही कसे खेळू शकलात’, या प्रश्नाला सुनील गावसकरांनी हसतहसत उत्तर दिले, ‘‘चेंडूवरची नजर मी कधीच काढायचो नाही. त्यामुळे भीती वाटली नाही’’. एकदा सर व्हिव्हियन रिचर्डस् भेटले आणि गावसकरांचा हाच विषय निघाला, तेव्हा ते म्हणाले, ‘‘सनीला कसली आलीय भीती? उलट त्याच्या २० धावा झाल्या आणि त्याने अर्धातास खेळपट्टीवर घालवला की, आम्हांला आता हा माणूस बाद होणार नाही, अशी भीती वाटायला लागायची.’’असा दरारा होता सुनील गावसकरांच्या फलंदाजीचा.
सुनील गावसकरांनी सर डोनाल्ड ब्रॅडमनचा सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम मोडला. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये १०हजार धावांचा टप्पा पार करणारे ते पहिलेच फलंदाज झाले. १९८३ मध्ये भारताने विश्वकरंडक जिंकला त्या संघाचे ते सदस्य होते; तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९८५मध्ये ‘बेन्सन अॅण्ड हेजेस’ कप जिंकला. या सर्व विक्रमांमुळे सुनील गावसकरांचे नाव क्रिकेटच्या पुस्तकात सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले. या सर्व विक्रमांबरोबर त्यांनी पुढच्या पिढीला वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आणि वेळात वेळ काढून केलेले सामाजिक काम त्यांना वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवते.
लहान वयात शालेय क्रिकेटमध्ये पोत्याने धावा करणाऱ्या सचिन तेंडुलकरला प्रोत्साहन देताना सुनील गावसकरांनी आपले फलंदाजीचे पॅडस् आपणहून दिले होते. १९९६ साली धावांची ओहोटी लागलेल्या इंझमाम उल हकला, ‘‘तू पॅड बदल. तुझी फलंदाजी परत पहिल्यासारखी होईल’’, असा सल्ला सुनील गावसकरांनीच दिला होता. इंझमामच्या नव्या पॅडवरचा भाग बांधल्यावर फुगत होता. त्यामुळे इंझमामची बॅट बॅकलिफ्ट करताना अजाणतेपणी बाहेरून येत होती. गावसकरांनी ती चूक न्याहाळून इंझमामला सल्ला दिला होता. गावसकरांचे निरीक्षण बघून इंझमाम अक्षरशः थक्क झाला.
सामाजिक जाणीव
सामाजिक काम सहजपणे करताना सुनील गावसकरांनी ‘चँम्पस् फौंडेशन’ स्थापन करून विविध खेळातील गरजू माजी खेळाडूंना दर महिन्याला रोख रक्कम देणे चालू केले. ते काम आजही चालू आहे. इतकेच नाही तर ‘हार्ट टू हार्ट फौंडेशन’साठी पैसे जमा करून हृदयविकाराने बेजार झालेल्या गरीब घरातील लहान मुलांच्या हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी मदतीचे काम सुनील गावसकर आजही नेटाने करतात. निवृत्तीनंतरही सुनील गावसकरांबद्दलचा आदर आजही कायम आहे, याचे हेही कारण असू शकते.
समालोचनातही अचूक नि कुशल
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर सुनील गावसकरांनी टीव्ही कॉमेंटरी करताना खेळातील निरीक्षणे अचूक नोंदवली आहेत. आजही प्रत्येक सामन्यासाठी सुनील गावसकर त्याच उत्साहाने मैदानात समालोचन करायला उतरतात. भारतीय संघ अटीतटीचा सामना जिंकला की लहान मुलासारखे नाचतात. खडूस परदेशी माजी खेळाडूंना कॉमेंटरी करताना खडे बोल सुनावतात. रोज १० निवडक गाणी कानाला लावून साधारणपणे ४५ मिनिटे चालण्याचा नेमाने व्यायाम करतात. शिस्तपूर्ण आयुष्य जगत असल्याने त्यांना अजूनही कोणतीही व्याधी जडलेली नाही. केवळ अगोदरच काळजी घ्यायची म्हणून आता गोड पदार्थ खात नाहीत. कडक चहा आणि त्याबरोबर पार्ले- जीचे बिस्कीट त्यांना दिले तर लहान मुलासारखे खूश होतात. सामन्यादरम्यान पत्रकार कक्षात भेटल्यावर त्यांना आवडतो तसा चहा दिला की मग कधी कधी रंगात आले की अभिनय करून क्रिकेटकहाण्या सांगतात. अचानक जुने आवडते मराठी गाणे आठवले की गुणगुणून दाखवतात. ७५व्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देताना सुनील गावसकरांना ‘सकाळ’च्या तमाम क्रिकेटरसिक वाचकांतर्फे इतकेच सांगावेसे वाटते की, भारतीय क्रिकेटचा पहिला खरा मैलाचा दगड म्हणजे सुनील गावसकर. तुमचा उत्साह ओसंडून वाहणाऱ्या धबधब्यासारखा असाच दीर्घकाळ वाहत राहो.
सुनील गावस्कर यांची कारकीर्द
प्रकार सामने धावा सर्वोच्च सरासरी शतके अर्धशतके
कसोटी १२५ १०१२२ २३६ ५१.१ ३४ ४५
एकदिवसीय १०८ ३०९२ १०३ ३५.१ ०१ २७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.