‘डिस्कनेक्ट’ होण्याचा हक्क

बाहेरही कालवा. मनातही कालवा. बाहेरच्या कालव्यानं खोल वावरातल्या बांधावरच्या झुडपातील दिवसाच्या पावसाळी अंधारात जाऊन बसावं वाटतं. मनातल्या कालव्यानंही बाहेर फक्त श्वासापलीकडे काहीच ऐकू आलं नाही पाहिजे, या भावनेतून मनाच्या खोल कपारीत दडून बसावं वाटतं. दोन्हीकडून जरा दूर दिसणाऱ्या उजेडाच्या भिंतीतून इकडे खूप मोठ्या संख्येनं राजाचं सैन्य वेगानं येऊन आपल्याला घेऊन जाईल, असं वाटत राहतं.
‘डिस्कनेक्ट’ होण्याचा हक्क
‘डिस्कनेक्ट’ होण्याचा हक्क sakal
Updated on

ओंजळ

दत्ता पाटील

बाहेरही कालवा. मनातही कालवा. बाहेरच्या कालव्यानं खोल वावरातल्या बांधावरच्या झुडपातील दिवसाच्या पावसाळी अंधारात जाऊन बसावं वाटतं. मनातल्या कालव्यानंही बाहेर फक्त श्वासापलीकडे काहीच ऐकू आलं नाही पाहिजे, या भावनेतून मनाच्या खोल कपारीत दडून बसावं वाटतं. दोन्हीकडून जरा दूर दिसणाऱ्या उजेडाच्या भिंतीतून इकडे खूप मोठ्या संख्येनं राजाचं सैन्य वेगानं येऊन आपल्याला घेऊन जाईल, असं वाटत राहतं. ही अन्य कोणासाठी गोष्टच असू शकते खरं तर! आपल्याला हे खरं खरं वाटलं तरी ती लिहून काढताना किंवा कुणाला सांगताना गोष्टच होऊन जाते. नाही का? आपल्याला जे जाणवतं प्रखरपणे, ते लिहून काढताना, किंवा कोणाला तरी सांगताना नीटनेटकं रचून सांगावं लागतं. आत उमटेल तसं विस्कळीत सांगितल्यावर सांगणाऱ्याची आणि ऐकणाऱ्याचीही गडबड होते. शेती करताना कसं सगळं क्रमाक्रमानं करावं लागतं.

तसंच मनातलं व्यक्त करताना त्याला क्रम लावावा लागतो. बरं हे सगळं करताना मनामनाचा एकूणच अथांग प्रदेश आणि त्यातील अंतराळात सुरू असलेल्या उलथापालथींकडे आपलं तटस्थ राहून लक्ष असण्याइतपत आपण ‘सजग’ असायला हवं, हे कळत असतं आपल्याला… तरीही असं काय घडतं, की एका बाजूला तोल सांभाळण्याचे आटोकाट प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला आपलंच मन बंड पुकारत जातं? आपल्याशीच उभा दावा मांडत झगडत राहतं? जणू सर्जनशीलतेच्या प्रदेशात एखादं पिसाट ढोर घुसावं नि आपणच लिहिलेल्या कवितांची शकले करत सुटावं... हे घडतंय सतत... काहीतरी हलून गेलंय या जगाचं. समाजाचं. सतत कुणाला तरी पराभूत करायला कोणतातरी दुसरा गट सरसावू लागलाय. एका बाजूला असंख्य स्वप्नांचे प्रदेश नि दुसऱ्या बाजूला हातातून निसटून चाललेलं जगणं... हे मनातल्या, मनाबाहेरच्या गदारोळाच्या गराड्यातील जगणं जीवनशैली म्हणून स्वीकारायला कोणी भाग पाडतंय का आपल्याला? ह्या एकूण गदारोळापासून अलिप्त होत जाणं हा एकमेव पर्याय उरलाय का? ‘राईट टू डिस्कनेक्ट’ किंवा ‘राईट टू बी ऑफलाईन’ ही नवी चळवळ उभी करायला हवी. शेतातल्या कोणत्याही झुडुपात जाऊन लिहित बसलो, तरी जग शोधून काढतं आपल्याला. आपल्याला `डिस्कनेक्ट’ व्हायचा अधिकारच या नव्या लोकशाहीत उरला नाहीये.

लोकशाही म्हणजे तरी काय? सायंकाळी आजूबाजूच्या शिवारातली माणसं सामायिक बांधावर जमली, की ‘लोकशाही म्हत्वाची’ असं मधूनच बोलत असतात नि शांत होतात. म्हणजे काय, विचारलं तर ‘लोकशाही म्हणजे निवडणूक’ या पलीकडे उत्तर येत नाही. नेमकं काय चाललंय भवताली, याची कोणालाच काहीच माहिती नसते किंवा त्यासाठी काहीही असोशी नसते. मग ते सगळे कोणाच्या तरी घरातल्या तरूण मुलामुलीच्या लग्नाच्या नियोजनाचं बोलायला लागतात. त्यावर प्रत्येकाला खूप सुचत राहतं. पत्रिका छापायच्या, की व्हॉट्सअपवरच भागवायचं, यावर चर्चा करत राहतात. लोकशाहीवर, पिकांना मिळणाऱ्या भावावर, पिकांवर पडणाऱ्या रोगावर फार बोलत नाहीत. पडणाऱ्या न पडणाऱ्या पावसावर, गावात दर आठवड्याला कोणाचा तरी मृत्यु होत राहतो, त्यावरही फार बोलत नाहीत.

कधी कधी तर नुसतीच जमतात. वर्तुळाकार बसून राहतात. एकमेकाकडे न पहाता. वाटतं यांनाही ‘डिस्कनेक्ट’ व्हायचंय या आजच्या गदारोळापासून. पण कसं होतात, याची माहितीच नाही त्यांच्याकडे. गप्प राहणं म्हणजे गदारोळापासून डिस्कनेक्ट होणं नाही. उलट गप्प राहिल्यावर आतला नि बाहेरचा गदारोळ कर्कश्श होत जातो. स्वत:चे विचारच शिल्लक राहात नाहीत. पण जेव्हा बोलत असतात सगळे काहीबाही, तेव्हाही कुठल्याशा भीतीपासून दूर पळण्यासाठी ते आशयविरहित असंबद्ध चर्चा करताहेत ,असं वाटत राहतं. ‘यंदा मागच्यासारखा पाऊस नाही’, या वाक्यावर चटकन सगळे सहमत होतात आणि जिल्ह्यात, राज्यात काही ठिकाणी खूप पडलेल्या पावसावर बोलत राहतात. सगळ्यांनी समाजमाध्यमांवर, चॅनलवर पाहिलेलं असतानाही त्या दृश्यांच्या आपल्या पद्धतीने गोष्टी रचत एकमेकांना माहीत असलेल्या या गोष्टी सांगत राहतात. मग संपलं की गप बसतात. इतके, की उठून गेले तरी त्यांचा धागा पकडून शांततेचे निराश तुकडे सावल्यांसारखे मागे राहून जातात... आपण शेतातल्या एखाद्या सावळ्या कोपऱ्यात निदान कविता लिहून आपल्या जगाशी तरी खेळत राहतो... पण यांचं काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.