‘लक्ष’ द्यावे उमजून

मोबाईल न वापरता राहण्याचा एक दिवस प्रयत्न करा. काही न करता बसून राहण्याने बऱ्याच गोष्टी साध्य होतात. मन शांत होते. आयुष्याच्या जमा-खर्चाचा मेळ लावता येतो, नवनवीन कल्पना सुचतात, आणि बरेच काही साधते.
mobile
mobile sakal
Updated on

भाष्य

डॉ. योगेश कुलकर्णी

फा र पूर्वीची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित होती. औद्योगिक क्रांतीनंतर उद्योग व सेवाक्षेत्र अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे भाग झाले. संगणक आणि इंटरनेट क्रांतीमुळे इन्फॉर्मेशनची (माहिती) अर्थव्यवस्था बळ धरू लागली. सध्या, मोबाईल व समाज माध्यमांमुळे एक नवीनच अर्थव्यवस्था प्रभावी होत आहे. त्याला आपण ‘अटेन्शन इकॉनॉमी’ म्हणजेच ‘लक्ष अर्थव्यवस्था’ म्हणू शकतो. १९९७च्या ‘अटेन्शन शॉपर्स’ या लेखात शास्त्रज्ञ मायकल गोल्डहाबर यांनी ‘लक्ष’आधारित अर्थव्यस्थेची पहिल्यांदा वाच्यता केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या स्पर्धा ही फक्त माहिती पुरवण्यात राहिलेलीच नाही, तर तुमचे लक्ष राखण्याकडे वळलेली आहे. एखादी वस्तू घ्यायची असेल तर इंटरनेटवर त्याची माहिती असंख्य ठिकाणी मिळते. जर एखादी साईट जास्त खिळवून ठेवणारी असेल तर तुम्ही तेथे जास्त वेळ थांबाल; तर तुम्हाला जास्त वेळ जाहिराती दाखवता येतील. मग त्या साईटच्या कंपनीला त्याचा जास्त फायदा होईल, नाही का? सध्या माहितीची वानवा नसून तुमच्या ‘लक्षा’ची आहे. डिजिटल युगातील कंपन्यांचे तुमच्या लक्षावर लक्ष आहे; त्यातून मिळणारा अमाप नफा हे त्यांचे ‘लक्ष्य’ आहे.

बऱ्याच जणांना वाटते की, हे सारे मस्त, फुकट मिळत आहे. छान छान व्हिडीओ मिळत आहेत. धमाल करमणूक होत आहे, पण विचारांती असे लक्षात येईल की, हे बिलकुल फुकट नसून तुम्ही (म्हणजे तुमचे ‘लक्ष’) विकले जात आहात. जेवढे जास्त तुमचे लक्ष ते खेचतील, गोळा करतील, तेवढा जास्त जाहिरातींचा महसूल. ‘लक्ष अर्थव्यवस्था’ मोबाईलला किंवा स्क्रीनला जखडून ठेवण्यावर भर देते. एखादा व्हिडीओ अथवा रील पाहातानाच दुसरे समोर येते, अथवा सुचवले जाते. फोटोंचे-छायाचित्रांचेही तसेच. आपण एकामागून एक बघायला लागलो की, तासंतास कसे गेले हे कळतच नाही. सतत काहीतरी नवीन, आकर्षक समोर येते. ‘डोपामाईन’ मिळते, मग अजून अजून बघावेसे वाटते. ग्रुपवर काही संदेश (मेसेज-नोटिफिकेशन) आला की लगेच वाचावेसे वाटते, उत्तर नाहीतर किमान ईमोजी तात्काळ टाकावीशी वाटते. बॉसच्या इमेलला तर पुढच्या मिनिटालाच उत्तर गेले पाहिजे याची धडपड, विषय तातडीचा नसतानासुद्धा. हे व्यसनाधीनतेकडे नेण्यासारखेच आहे. काही कारणांनी मोबाईल, समाजमाध्यम वापरायला नाही मिळाले, जवळ नसेल तर अस्वस्थ व्हायला होते. चिडचिड, त्रागा तर काहीच नाही, वैफल्याकडे वाटचाल सुरू होते.

मोबाईल युगाआधीचे दिवस आठवा! तेव्हा आपण गोष्टी लक्ष देऊनच करायचो. पुस्तक वाचणे, नाटक-सिनेमा पाहणे. त्यामुळे लक्ष हे स्वतःहून काही वाईट नाही. पण सतत बदलणारे लक्ष घातक आहे. त्याला ‘कॉन्टेक्सट स्विचिंग’ म्हणजेच ‘लक्ष वेगवेगळ्या गोष्टींकडे वारंवार बदलत राहणे’ असे म्हणतात. एका ग्रुपवरील मेसेज बघितला की, लगेच दुसरा ग्रुपवर नजर गेलीच समजा. पहिल्या रीलनंतर दुसरे... ब्राऊझरमध्ये असंख्य टॅब्स उघडलेले. याने विचारांची स्थिरता होत नाही. काही नीट समजण्याआधीच दुसरे येते, त्यामुळे सखोल विचार होत नाही, मनन, चिंतन तर दूरच! किंबहुना नीट विचार करावा लागेल, असे मग काही बघावेसेच वाटत नाही. जरा मोठा लेख आला तर तो टाळून आपण पुढे जातो, नाही का? कॅलिफोर्निया-अरवाईन विद्यापीठातील ग्लोरिया मार्क यांच्या संशोधनानुसार, एखाद्या व्यत्ययानंतर पुन्हा पूर्वीच्याच सखोल विचार स्थितीत यायला सर्वसाधारणपणे तेवीस मिनिटे लागतात, पण सध्या लगेच दुसऱ्या मिनिटाला अजून एक नोटिफिकेशन-व्यत्यय आलेलाच असतो. आपली सखोल विचारक्षमता हळूहळू क्षीण होत आहे. तुम्हालापण स्वतःमध्ये व इतरांमध्येही जाणवले आहे का, की काही खूप नीट व खोल विचार करण्याच्या कामांना आता जास्त वेळ लागतो, किंवा जमतच नाही. औद्योगिक भाषेत बोलायचे तर आपली ‘उत्पादकता’ कमी होत आहे.

उथळपणाकडे आणि सनसनाटी गोष्टींकडे कल वाढत आहे. याची स्वतःवर एक चाचणी घेऊ शकता. तुम्ही सध्या कधीही (किंवा अगदी सुट्टीच्या दिवशी) सलग एक तास, शांत चित्ताने एखादे पुस्तक (मासिक-वर्तमानपत्र नव्हे) वाचू शकता का? उत्तर नाही असेल तर, विषय गंभीर आहे असे समजा. अजून एका प्रकारे ‘स्व’ची ओळख करून घेण्यासाठी तुमच्या मोबाईलमधील ‘डिजिटल वेल बीइंग’सारखी ॲप बघा. त्यात तुम्ही दिवसभरात कोठल्या ॲपवर किती वेळ घालवता, हे दिसते. हे आकडे डोळे उघडणारे ठरू शकतात.

वसाहतवादाचे आधुनिक रूप

मोठ्या समाज माध्यम कंपन्या खरंतर फक्त एक प्लॅटफॉर्म (मंच) उपलब्ध करून देतात. तुमच्यातलेच काही (इन्फ्लुएन्सर्स, प्रभावक) काही गोष्टी (मिम्स, पिक्चर्स, रील्स, पॉडकास्टस इ.) बनवतात आणि आपण ते पाहत बसतो. नाही म्हणायला या प्रभावकांना (अगदी मोजक्याच आणि खूप जनसंग्रह असणाऱ्या) चांगले-ठीकठाक पैसेही मिळतात. त्यामुळे मागणी-निर्माण-उपभोग, अजून मागणी-अजून निर्माण हे चक्र अव्याहत चालूच राहते. फायदा प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बलाढ्य कंपन्यांचा. काहीवेळेला या कंपन्या दादागिरीपण करतात. कुठल्या विचारधारेचा मजकूर ठेवायचा, कोणाला बढावा द्यायचा, हे त्यांच्या (म्हणजे त्यांनी बनवलेल्या प्रणाल्यांच्या, अल्गोरिदम्सच्या) हातात असल्याने ते समाजमन वळवतच नाही; तर मोठ्या प्रमाणात नियंत्रित करतात. मागील निवडणुकांमध्ये त्याचा परिचय आपल्याला झालाच असेल. त्यामुळे ज्यांचा समाज माध्यमांवर ताबा त्यांचा (काही प्रमाणात का होईना) जगावर आणि जगाच्या समाजमनावर ताबा राहतो, हे ढळढळीत सत्य आहे. ही मोठी ताकत आहे. वसाहतवादाचे हे आधुनिक रूप तेही तुमच्या नकळत. मोबाईल व पर्यायाने समाज माध्यमांचा वापर हा समाजाला व्यसनाधीनतेकडे नेण्यात होतो आहे.

कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पाहिले तर बऱ्याचश्या लोकांचे लक्ष कोठे असते, तर मोबाईलमध्ये. कोणी विचारांची तंद्री लावून शून्य आकाशात बघताना दिसतो का? तर, फारच क्वचित. याचा परिणाम वैयक्तिकच नाही, सामाजिकच नाही तर आंतरराष्ट्रीय सुरक्षेवरही होऊ शकतो. अशी विचार-क्षीण, मोबाईलमध्ये गुरफटलेली जनता कोणत्या शत्रू राष्ट्राला नको आहे?

एवढ्या सगळ्या वाईट गोष्टी ऐकल्यावर आपल्याला वाटेल की मग मोबाईलचा आणि समाजमाध्यमांचा त्यागच करायचा का? तर, नक्कीच नाही. यांचा कितीतरी प्रभावी पद्धतीने वापर करता येतो. त्यांनीच ज्ञानाची कवाडे खुली केली आहेत. जगातील कानाकोपऱ्यातील नातेवाईकांना, मित्रमंडळींना जवळ आणले आहे. संवाद, पारदर्शिकता वाढली आहे. लोकशाही जास्त सुदृढ झाली आहे. कारण आता जनतेपासून काहीही लपवणे अवघड होत आहे. घरबसल्या काम करणे शक्य झाले आहे. आपली आर्थिक जीवन पद्धती आमूलाग्र बदलली आहे. हे सर्व फायदे नक्कीच आहेत. आक्षेप आहे तो त्यांच्या वायफळ अति-वापराबद्दल आणि कालांतराने होणाऱ्या व्यसनाधीनतेबद्दल.

आपल्या हातात आहे की, या सर्वांचा सकारात्मक वापर कसा वाढवता येईल, दुष्परिणाम कसे टाळता येतील. ज्यांची रोजी-रोटीच मोबाईल-समाजमाध्यम आणि कायम ऑनलाईन राहण्यावर अवलंबून आहे त्यांना काही पर्याय नाही पण ज्यांची तशी परिस्थिती नाही त्यांच्यासाठी काही उपाय सुचवता येतील. पहिला उपाय म्हणजे ‘डिजिटल मिनिमलिझम’ म्हणजेच या तंत्रज्ञानाचा कमीत कमी वापर. अनावश्यक ॲप्स, अकाउंट्स, सबस्क्रिप्शन्स, डिव्हाइसेस काढून टाकणे, अगदी मन मारून. ‘डिजिटल फास्टिंग’ म्हणजे समाजमाध्यमे, मोबाइल न वापरणे. असा ‘उपवास’ आठवड्यातून एक-दोन दिवस करणे. शाळकरी मुलांच्या हातात फक्त कॉल करता येणारे डब्बा-फोन्स, असे बरेच काही. असे विचारावेसे वाटते की तुम्ही, नजीकच्या काळात कधी ‘बोअर’ (कंटाळा) झाला होतात? मोबाईलमुळे पुढ्यात इतक्या गोष्टी वाढून ठेवल्या आहेत की कंटाळा येणेच दुरापास्त आहे. ‘बोअर’ होणे किंवा काही न करता बसून राहणे याने खरंतर बऱ्याच गोष्टी साध्य होतात. मन शांत व्हायला लागते, बाह्य-उत्तेजनेशिवाय विचार करता येतो, आयुष्याच्या जमा-खर्चाचा मेळ लावायला वेळ मिळतो, नवीन कल्पना सुचतात आणि अजून बरेच काही. गंमत म्हणून एखादा तास काही न करता, एकटे बसून बघाच!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com