आभासी जगताचे कटू वास्तव..!

काही वर्षांपूर्वी व्हिडिओ गेम हे सहजपणे मोबाईलवर उपलब्ध झाले आणि लॉकडाउनच्या काळात मुलांच्या करमणुकीचे साधन झाले. या करमणुकीचे कधी व्यसनात रूपांतर झाले हे पालकांना समजलेच नाही. या समस्येचा आढावा आणि उपायांविषयी.
आभासी जगताचे कटू वास्तव..!
आभासी जगताचे कटू वास्तव..!sakal
Updated on

गेमचा विळखा

काही वर्षांपूर्वी व्हिडिओ गेम हे सहजपणे मोबाईलवर उपलब्ध झाले आणि लॉकडाउनच्या काळात मुलांच्या करमणुकीचे साधन झाले. या करमणुकीचे कधी व्यसनात रूपांतर झाले हे पालकांना समजलेच नाही. या समस्येचा आढावा आणि उपायांविषयी.

वैशाली मंडपे

‘ब्ल्यू व्हेल’ या गेममुळे जगभरातील १४ ते २० या वयोगटातील अनेक किशोरवयीन मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून खेळल्या जाणाऱ्या या गेममध्ये मुलांना ५० वेगवेगळी उद्दिष्टे दिली जातात. यातले बहुतेक हिंसक असतात आणि ते पूर्ण करण्यासाठी मुलांवर मानसिक दबाव आणला जातो. शेवटच्या टप्प्यावर गेम खेळणाऱ्याला आत्महत्या करण्याचा टास्क दिला जातो. या शेवटच्या टास्कमध्ये अनेक मुलांनी जीव गमावला. पुण्यातील एका पंधरा वर्षे विद्यार्थ्याने गॅलरीमधून उडी मारून स्वतःला संपवलं आणि त्याचं कारण हे ‘ब्ल्यू व्हेल’ गेम होतं. या सगळ्यांमध्ये पालकांना दोष देऊन उपयोग नाही. परंतु त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवे. ‘प्रायव्हसी’च्या नावाखाली स्वतंत्र खोली, त्यामध्ये लॅपटॉप, मोबाईल, हेडफोनसारखी आधुनिक उपकरणे. आजच्या काळाची अभ्यासाची साधन म्हणून पालक मुलांना या गोष्टी देतात; परंतु आपले मूल इंटरनेटवर काय बघत आहे, याकडे पालकांचे लक्ष असावे. मुलांच्या स्वातंत्र्याच्या कल्पना आणि आजकालच्या मुलांना हे सगळं हवंच हा गैरसमज, यामुळे व्यसन वाढते आहे.

अवाजवी लाड

बरेचदा पालक आवाक्याबाहेरच्या गोष्टी मुलांना घेऊन देतात. ते देत असताना मूल्यशिक्षण देणेही गरजेचे आहे. किशोरवयीन मुलांना दिलेल्या इंटरनेटच्या मोफत आणि अमर्याद वापरामुळे मुलांचा ‘स्क्रीनटाइम’ वाढला आहे. आपली मुले कोणते ऑनलाइन गेम खेळतात, कोणत्या साईटवर जास्त वेळ ‘सर्फिंग’ करतात, कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघतात, अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन चॅटिंग करतात का, हे पालकांनी पाहायला हवे. आई-वडिलांनी आपल्या प्रत्येक बाबतीत लक्ष देऊ नये, असे मुलांना वाटते. किशोरवयीन मुलांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल घडत असतात. अशावेळी मुलांना सहजपणे मिळणाऱ्या पैशांचे किंवा गिफ्टचे प्रलोभन या व्हिडिओ गेमच्या माध्यमातून दाखवलं जातं. गॅम्बलिंग किंवा ‘ब्ल्यू व्हेल’सारखे गेम मुलांना आवडतात, याचे कारण या वयामध्ये धोक्याची जाणीव नसते आणि आपण मोठे झालो आहोत आणि आपल्याला सगळे समजते, असा एक समज या वयात मुलांमध्ये तयार झालेला असतो. शाळेतील व्हॅनमध्ये लहान आणि मोठी मुले एकत्रित प्रवास करतात तेव्हा मोठ्या वर्गातील मुलांमधील गेम विषयीच्या चर्चा ऐकून लहान मुलांच्या मनात या विषयी कुतूहल निर्माण होते आणि मग ही लहान मुलेही इंटरनेटवर संधी मिळेल तेव्हा असे गेम सर्च करतात, डाउनलोडही करतात.

तुमच्या मुलांच्या वागण्यामध्ये अचानकपणे खालीलपैकी एक किंवा अनेक लक्षणे दिसल्यास धोक्याची घंटा समजावी.

  • मुलं रात्री उशिरापर्यंत जागत असतील. आळसावलेली दिसत असतील.

  • मुलांचे अचानकपणे जेवणाकडे दुर्लक्ष. भूक न लागणे.

  • मुले जास्तीत जास्त वेळ आपल्या खोलीमध्ये दरवाजा बंद करून बसत असतील.

  • मुलांमध्ये अचानकपणे वाढलेला आक्रस्ताळेपणा.

  • लहान भावंडं अथवा मोठ्यांशी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण करणे.

  • घरामध्ये छोट्या-मोठ्या चोऱ्या. डेबिट-क्रेडिट कार्डांवर खरेदी, मित्रांबरोबर पार्टी करणे.

  • पालकांविषयी तक्रारी करणे.

आपल्या मुलांमध्ये गेमिंग, डिजिटल अॅडिक्शनची लक्षणं दिसत असल्यास त्याला समुपदेशनाची गरज आहे हे लक्षात घेऊन पालकांनी योग्य वेळीच तज्ज्ञ समुपदेशकाची मदत घ्यावी.

पालकांनी काय करावे?

मुलांना सर्व सुखसुविधा देतानाच त्यांना पैशाचे महत्त्व, आर्थिक व्यवहार आणि व्यवस्थापन याचेही शिक्षण द्यावे. याचबरोबर घरात तयार होणाऱ्या सकस अन्नाचे महत्त्व, नात्यांचा आदर, भावनांवरील नियंत्रण, एखाद्या गोष्टीची गरज आणि ती मिळाल्यानंतर तिची काळजी घेणं आणि योग्य वापर याविषयी मुलांशी संवाद साधावा.

परीक्षेतील गुणांच्या स्पर्धेमुळे मुलं तणावाखाली जगतात. मूल आणि पालकांमधला संवाद कमी होत चालला आहे. मुलांच्या दिवसभरातील वेळेचं नियोजन पालकांनी योग्य प्रकारे करावे. ज्यामध्ये मुलांची शाळा, अभ्यासाच्या वेळा, एखादा मैदानी खेळ किंवा छंद (जो मुलांना स्वतःला आवडत असेल), सुट्टीच्या दिवशी मुलांसोबत छोट्याशा सहलीला जाणे, ज्यामुळे मुलांशी आपोआपच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या जातात. याचबरोबर छोटे छोटे निर्णय घेण्याची क्षमता, स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय लावणे.

मुलांना भीती दाखवणे, सतत रागवणे यामुळे मुलं नकळतपणे पालकांपासून अनेक गोष्टी लपवून ठेवतात.

मुलांना ऑनलाइन सुरक्षिततेविषयी माहिती द्यावी.

मुलांना मोबाईल वापराच्या वेळेची मर्यादा घालून द्यावी.

मुलांना ऑनलाइन येणाऱ्या समस्यांविषयी मोकळेपणाने संवाद साधावा. असुरक्षित वाटणाऱ्या गोष्टींपासून सावध राहण्याविषयी प्रोत्साहन द्यावे.

मुलांचे शाळा, कॉलनीशिवाय सोशल मीडियावरील मित्र कोण आहेत याविषयी वेळोवेळी माहिती घ्यावी.

मुलांच्या वागण्यात अचानक काही बदल जाणवल्याय त्याकडे दुर्लक्ष न करता विश्वासात घेऊन काय समस्या आहे हे विचारा. न रागवता आम्ही तुझ्या पाठीशी आहोत हा विश्वास द्या.

मुलांचा आदर, प्रेम मिळविण्यासाठी लाड करण्यापेक्षा त्यांच्याशी योग्य संवाद साधून त्यांच्या मनात पालकांविषयी विश्वास निर्माण झाल्यास अशा आभासी जगातल्या गोष्टींकडे आकर्षित होणार नाहीत.

(लेखिका संगणक व सायबरतज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.