ढिंग टांग ब्रिटिश नंदी : खबरदार जर टांच मारुनि...!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) गेले वीस दिवस झोपलेलो नाही. अहोरात्र काम करत आहे. आता मागे वळून पाहायचे नाही.
ढिंग टांग ब्रिटिश नंदी : खबरदार जर टांच मारुनि...!
ढिंग टांग ब्रिटिश नंदी : खबरदार जर टांच मारुनि...!sakal
Updated on

आजची तिथी : क्रोधी नाम संवत्सर श्रीशके १९४६ आषाढ कृ. प्रतिपदा.

आजचा वार : मंडेवार

आजचा सुविचार : खबरदार जर टांच मारुनि जाल पुढे चिंधड्या, उडविन राईराई एवढ्या..!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) गेले वीस दिवस झोपलेलो नाही. अहोरात्र काम करत आहे. आता मागे वळून पाहायचे नाही. सरळ पुढे जाऊन हाणामारी करायची. बस्स, झाले तेवढे खूप झाले!! सकाळी उठून बारा सूर्यनमस्कार घालायचे ठरवले. (घातले नाहीत. उद्यापासून घालू असे फक्त ठरवले.) तेवढ्यानेच थोडासा श्रमलो. पण न्याहारी केल्यावर ताजेतवाने होऊन कामाला लागलो. घोडामैदान दूर नाही. गेल्या वेळेस फेक नॅरेटिवच्या जोरावर शत्रूने आम्हाला बेसावध गाठले. यावेळी तसे घडू देणार नाही. फेक नॅरेटिवला उत्तर थेट नॅरेटिवचे देणार! देणार म्हंजे देणार! दिल्याशिवाय राहणार नाही... किंबहुना देणारच!! (हे वाक्य आमचे माजी मित्र उधोजीसाहेबांच्यासारखे झाले आहे. खोडले पाहिजे!)

पुण्याच्या मेळाव्यात मी कार्यकर्त्यांना स्फुरण चढेल असे भाषण केले. माझ्या शब्दाशब्दातून नुसत्या ठिणग्या उडत होत्या. मी म्हणालो, ‘‘आता आदेशाची वाट बघत बसू नका, सरळ मैदानात उतरा आणि ठोकून काढा!’’ ‘ठोकून काढा’ म्हणताच मेळाव्यात जणू चेतना आली. मुठी वळून कार्यकर्ते एकमेकांनाच दाखवू लागले. अशी लढाऊ फौज मैदानात उतरली की त्या महाविकास आघाडीच्या खोटारड्या बगलबच्चांची पळता भुई थोडी होईल, यात शंका नाही. स्फुरण चढावे ते तरी किती! कधी नव्हेत ते आमचे गिरीशभाऊ महाजन माझ्यासमोर येऊन पहिलवानासारखे दंडावर थोपटून दाखवू लागले.

मी लागलीच मांडीवर ठपाक्कन आवाज काढला. आमच्या बावनकुळेसाहेबांचा उत्साह तर आवरेनासा झाला होता. हातात दांडपट्टा घेतल्यासारखे ते भर दालनात घुमू लागले. गेले वीस दिवस मी झोपलेलो नाही, हे गुपित त्यांनी उगाचच फोडले असे आता वाटते. मी रात्रभर जागलो, या कल्पनेने महायुतीतल्या मित्र पक्षाच्या नेत्यांचीही निष्कारण झोप उडते. मी झोपलो आहे, असे यापुढे सांगत चला, असेही मी बावनकुळेसाहेबांना सांगणार आहे. असो.

बाकी, माझ्या ‘ठोकून काढा’ या आदेशामुळे विरोधकांचे धाबे दणाणलेले दिसते. ही ठोकशाहीची भाषा कशाला? असा लोकशाहीवादी सूर या लोकांनी लावला आहे. आले मोठे लोकशाहीवाले!! रोज सकाळी उठून नऊ वाजता तुम्ही आम्हाला ठोकून काढता ते? आता आम्हीही जय्यत तयारीनिशी मैदानात उतरत आहोत. बघाच म्हणावे आता आमचा इंगा!!

आमच्या कार्यकर्त्यांना मी एक अटही घालून ठेवली आहे. कुठल्याही आदेशाची वाट न पाहता सरळ पुढे जाऊन बॅटिंग करा. पण एका अटीवर- हिटविकेट व्हायचे नाही!! मागल्या खेपेला आमचे अनेक नेते असेच पुढे जाऊन खेळायला गेले, आणि मागच्या मागे स्टंपा उडाल्या. विरोधकांवर टीका करायचे सोडून आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर घसरुन आमच्या नेत्यांनी विकेट टाकल्या. आता असे चालणार नाही. मी स्वत: विराट कोहलीसारखा उतरणार आहे, आणि भरवशाची खेळी करुन दाखवणार आहे. पण मी एकटा खेळून काय उपयोग?

नॉन स्ट्रायकर एण्डचा सहकारीही तितकाच तयारीचा पाहिजे!!

यावेळी मी मनोमन ठरवले आहे की, पहिल्या बॉलपासूनच ठोकाठोकीला सुरवात करायची. विरोधकांच्या प्रत्येक बॉलवर जोरदार सिक्सर गेली पाहिजे.

माझा मनोदय मी माननीय मोटाभाईंना सांगितला. ते निर्विकारपणाने म्हणाले, ‘‘तमे चिंता ना करो, देवेनभाय, हूं छूं ने! तुम्ही फकत मैदानमधी उतरा, बाकी मी बगून घेणार! सांभळ्यो?’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.