मन मंदिरा... : नकारात्मक विचारांचा सापळा

Girl
Girl
Updated on

आपण ट्रकच्या मागे  ‘विचार बदला, नशीब बदलेल’असं लिहिलेलं अनेकदा वाचतो. गमतीदार वाक्‍य म्हणून हसून सोडून देतो. पण खरोखरच आपलं नशीब बदलायला, आपली मन:स्थिती बदलायला आपले विचार कारणीभूत असतात. सकारात्मक विचार आपल्याला सर्वार्थांनी उर्जीतावस्थेला नेतात. तर नकारात्मक विचार, नकारात्मक स्व-संवाद आपलं खच्चीकरण करू शकतात. जगात घडणारी प्रत्येक चांगली घटना, मग ती निसर्गातली असो वा मानवाच्या आणि समाजाच्या संदर्भात असो, ती फक्त सकारात्मक ऊर्जेवरच घडत असते. सकारात्मक विचारांचा मनावर, शरीरावर आणि प्रगतीवर सकारात्मक परिणाम होतो. तर नकारात्मक विचारांचा प्रतिकूल परिणाम होतो. नकारात्मक विचारांमुळे राग, दुःख, नैराश्‍य आणि एकूणच मानसिक अस्वास्थ्य निर्माण होतेच आणि प्रगतीच्या सगळ्या शक्‍यता संपुष्टात येतात.

आत्मप्रतिमा दुर्बल होते, आत्मविश्वास नाहीसा होतो. नात्यांवर विपरीत परिणाम होतो. कॉटिसॉल आणि अँड्रनॅलीनसारख्यासारख्या स्ट्रेस हार्मोन्स सतत स्त्रवल्यामुळे शारीरिक आजार, मनोकायिक आजार निर्माण होऊ शकतात. नकारात्मक विचार हे बहुदा आपोआप मनात निर्माण होणारे विचार असतात. जेव्हा व्यक्ती सतत नकारात्मक विचार करीत राहाते, तेव्हा ती मनाचे प्रोग्रॅमिंगच तसे करीत असते.त्याचे पॅटर्न ओळखून त्यावर उपाय करावे लागतात.  ह्यातील एक किंवा अनेक प्रकार आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत असू शकतात. आणि मग त्याचा परिणाम आपल्या वर्तनावर आणि स्वस्थतेवर होतो. वाचताना वर वर सगळ्याच विचारपद्धतीत साम्य वाटेल, पण त्यात सूक्ष्म भेद आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घडणाऱ्या घटना, येणारे अनुभव काळ्या -पांढऱ्या रंगातच पाहाणे - यात टोकाचा विचार केला जातो.मध्ये राखाडी छटा असते हे मान्यच नसणे. उदा. मी एखादी गोष्ट जरी परफेक्‍ट केली नाही तर त्याचा अर्थ मी पूर्णपणे अपयशी आहे, असा विचार करणे.

सरसकटीकरण - आपल्या हातून एखादी जरी चूक झाली तरीसुद्धा ‘मी एकही काम नीट करू शकत नाही’ असा विचार करणे.

मानसिक चाळणी - घडणाऱ्या सकारात्मक, अनुकूल घटनांकडे दुर्लक्ष करणे आणि एखाद्या नकारात्मक किंवा प्रतिकूल घटनेवर लक्ष केंद्रित करणे.

सकारात्मक घटनेचे महत्त्व कमी लेखणे - कौतुकास्पद काम झालं आणि कोणी अभिनंदन केलं, तरी ते अभिनंदन केवळ मला बरं वाटावं म्हणून केलेलं असणार, असा विचार केला जाणे. 

घाईने निष्कर्ष काढणे - सारासार विचार न करता नकारात्मक मत बनवून टाकायचं. कुठलाही सबळ पुरावा किंवा तर्कविचार हाताशी नसताना प्रतिकूल गोष्टच घडेल, हा जणू निर्णयच करून टाकायचा. उदा. कंपनीमधे माणसं काढणार आहेत अशी चर्चा आहे.  त्यात माझा नंबर नक्की असणार. माझी नोकरी जाणार. माझं कुटुंब रस्त्यावर येणार.. वगैरे.

भावनिक कारणे-  आपल्याला जसं वाटतंय तेच खरोखरचं वास्तव किंवा वस्तुस्थिती आहे असं मानून चालणं. उदा. एकुणात मी अपयशीच आहे, असं मला वाटतं. आता मला आतून तसं वाटतंय म्हणजे तसंच असलं पाहिजे.

शिक्का मारणे - पूर्वी आलेल्या लहानश्‍या अपयशामुळे आपण म्हणजे ‘ मूर्तिमंत अपयश’असा शिक्का स्वत:वरच मारून टाकायचा आणि ह्या गैरसमजुतीच्या प्रभावाखाली सतत दडपणाखाली रहायचं. आपल्याकडून चांगलं असं काही होऊच शकणार नाही हे जणू ठरवूनच टाकायचं.

मनाला लावून घेणे - काही विपरीत, प्रतिकूल घडलं किंवा काही चुकीचं घडलं तर दोष स्वत:कडे घेण्याची प्रवृत्ती. आपणच ह्या चुकीला जबाबदार आहोत. आपण असे वागलो म्हणून हे असं प्रतिकूल घडलं असा विचार करण्याची सवय.

बाऊ करणे - एखादी लहानशी कमतरता उगाळत बसणे. ती मोठी करून पहाणे.

आपली विचार करण्याची पद्धत वरील प्रकारात मोडते का हे तपासायला हवं. ह्या सगळ्या विचार करण्याच्या चुकीच्या पद्धती आपलं मन:स्वास्थ्य बिघडवून टाकतात. आपल्या प्रगतीच्या आड येतात. आपली मन:स्थिती ही ‘ब्रेन केमिस्ट्री’वर अवलंबून असते. प्रत्येक विचार मग तो सकारात्मक असो वा नकारात्मक आपल्या ब्रेन केमिस्ट्रीवर परिणाम करतो. सकारात्मक विचार ‘ब्रेन केमिस्ट्री’मध्ये चांगले बदल घडवून आणतात आणि मन:स्थिती  शांत तरीही उत्साही बनत जाते. आपण कार्य प्रवृत्त होतो. आणि मुख्य म्हणजे जीवनातला प्रत्येक क्षण रसरसून आनंदानं जगायला प्रवृत्त होतो.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.