लहरी, चंचल आणि आपल्या लोकप्रियतेचा अवाजवी भ्रम असलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात राजकीय परिपक्वता नाही. एका राष्ट्रीय पातळीवरील पक्षाच्या, पंजाबसारख्या महत्त्वाच्या राज्याच्या प्रदेशाध्यक्षांकडून अपेक्षित राजकीय चिंतनाचाही त्यांच्यात अभाव आहे.
नवज्योतसिंग सिद्धू २३ जुलै २०२१ पासून पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्याआधी कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. मंत्रिपदावर आल्यावरही ते रिॲलिटी शोमध्ये भाग घेत. सरकारमधील जबाबदारीचे भान विसरून सैल वर्तन आणि वक्तव्ये करीत. स्वतःवरच खूष असे त्यांचे वर्तन असे. त्यांचे वडील भगवंतसिंग सिद्धू काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. पतियाळात, म्हणजे कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याच इलाक्यात पक्ष पदाधिकारीही होते. २००४ मध्ये सिद्धूंना अमृतसरमधून लोकसभेसाठी उमेदवारी मिळाली आणि विजयही झाले.
भारतीय जनता पक्षाच्या १९८० मधील स्थापनेनंतर १९८४ मधील लोकसभा निवडणुकीत अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर पक्षात चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध नावांना जाणीवपूर्वक प्रवेश देण्यात आला. गर्दी जमविणे हाच त्यामागचा हेतू होता. शत्रुघ्न सिन्हा, हेमामालिनी, धर्मेंद्र हे चित्रपट क्षेत्रातून, तर क्रिकेटमधून चेतन चौहान, कीर्ती आझाद, नवज्योत सिद्धू हे भाजपत आले. शत्रुघ्न सिन्हांना वाजपेयी मंत्रिमंडळात स्थान मिळाले, परंतु लालकृष्ण अडवानींशी जवळीक भोवल्याने सिन्हा नंतर वाळीत पडले. अरूण जेटलींशी दिल्ली क्रिकेट संघटनेतील वादामुळे किर्ती आझादही भाजपच्या परिघाबाहेर गेले.
सिद्धू - स्ट्रोकलेस वंडर
क्रिकेटची पार्श्वभूमी, रिॲलिटी शोमधील सहभाग व आशयविहीन अखंड बडबड हीच सिद्धूंना आपली शक्तिस्थळे वाटत आहेत. भाजपमध्ये पक्षसंघटना वा सरकारमध्ये स्थान न मिळाल्यामुळे काँग्रेसमध्ये आश्रय मिळाल्यानंतर त्यांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटले. ज्येष्ठ व अनुभवी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यावर कुरघोडीचा त्यांनी प्रयत्न केला. दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून त्यांना फूस असावी. प्रादेशिक नेत्यांना डोईजड होऊ द्यायचे नाही, ही इंदिरा गांधींपासूनची परंपरा आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत आपल्या प्रचार भाषणांमुळे काँग्रेसला ११७ पैकी ८० जागांवर विजय मिळाला, अशी सिद्धूंची धारणा आहे. कॅप्टन विरोधात त्यातील ७८ जण आपल्या पाठीशी आहेत, असाही त्यांचा समज होता. भाजपमध्ये असताना त्यांच्या हिंदुत्वाच्या विचाराला अनुसरून ते घरात होमहवन करीत; तर मनगटावर लाल, पिवळे धागे बांधीत. नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे निकषच वेगळे आहेत. म्हणून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीतही सिद्धू यांनी चाचपणी केली. त्याच मुद्द्यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे ब्लॅकमेलिंग करण्यात ते यशस्वी झाले.
सुनील गावसकर यांचा जागतिक क्रिकेटमधील वरच्या श्रेणीतील आघाडीचा फलंदाज असा लौकिक होता. उत्तर प्रदेशातून पुण्यात आलेले व येथील मध्यमवर्गीय संस्कृतीत वाढलेले चेतन चौहान गावसकरांबरोबर अनेक वर्षे सलामीत खेळले. निवृत्तीवेळी सर्वाधिक ३४ कसोटी शतके आणि दहा हजारांवर धावा नावावर असूनही गावसकरांचे पाय जमिनीवर राहिले. सिद्धू हेही त्यासुमारास सलामीचा फलंदाज म्हणून खेळत होते. ‘स्ट्रोकलेस वंडर’ असा शिक्का बसलेले सिद्धू नंतर गावसकरांच्या संयमी, शिस्तशीर शैलीपासून फारकत घेत उंचावरून फटके मारू लागले. संघाची स्थिती, प्रतिस्पर्धी कर्णधाराचे डावपेच लक्षात न घेता आत्मघातकी फटके मारून विकेट फेकू लागले.
ड्रेसिंगरूममध्ये आणि नंतर दौऱ्यात रूमपार्टनरशी फारसे न बोलणाऱ्या सिद्धूंना संघशिस्त जाचक वाटू लागली. इंग्लंड दौऱ्यात कर्णधाराशी मतभेद झाल्यावर संघ व्यवस्थापनाला न सांगता भारतात परतल्यानंतर सिद्धू यांच्या वर्तनात बदल होत गेला. चंडिगडमध्ये पार्किंगवरून उद्भवलेल्या किरकोळ वादातून मनुष्यवधाच्या खटल्यात अडकल्यानंतर त्यांना आपल्या काँग्रेसनिष्ठ परिवाराच्या परंपरेची आठवण झाली. पोलिस कोठडी व तुरुंगवास टळला तरी खटल्याच्या निकालाची तलवार अजून कायम आहे. देशात भाजपची हवा निर्माण झाल्यावर आपल्या बचावासाठी इतर पक्षातून जसे अनेक लोक भाजपमध्ये गेले तेच सिद्धूंनी केले. क्रिकेटमध्ये प्रसिद्धीचे वलय असते. राजकारणात मात्र सत्ता, त्यातून मिळणारे लाभ खुणावू लागतात. पंजाबात प्रकाशसिंग बादल सरकारची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उजेडात आली, तसे काँग्रेस सत्तेवर येण्याची शक्यता वाढली. सिद्धू यांनी ती संधी साधली. त्यांना विधानसभेत अमृतसरमधून विजय मिळाला, परंतु आपल्या पत्नीला उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते नाराज होते.
सिद्धू यांचा जन्म १९६३ चा. कॅप्टन अमरिंदरसिंग लष्करातील नोकरी संपवून १९७० मध्येच राजकारणाच्या अंगणात उतरले होते. राजीव गांधींचे शाळा सोबती असल्याने देशपातळीवर सक्रीय झाले. ऑपरेशन ब्लू स्टार कारवाईचा निषेध म्हणून खासदारकी व काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये ते लोकसभेत काँग्रेसचे उपनेते होते. प्रदेशाध्यक्ष प्रतापसिंग बाजवांना शह देत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदावर आल्यानंतर मात्र सिद्धूंची कटकट आणि शह त्यांना त्रासदायक ठरला.
काँग्रेस श्रेष्ठींची कोंडी
नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाबात प्रदेशाध्यक्षपद देऊन पक्षश्रेष्ठींनी गंभीर चूक केली आहे, अशी राज्यातील तळाच्या काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे. पक्षातील दोन सत्ताकेंद्रे फेब्रुवारी २०२२ मधील निवडणुकीपर्यंत परस्परविरोधी दिशेला पक्षाला खेचून सत्ता घालवतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. २३ जुलैच्या सिद्धूंच्या पदग्रहण कार्यक्रमात सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यातील तडजोड किती वरवरची आहे, हे दिसले. मध्य प्रदेशातील सत्ता गमावल्यानंतर व राजस्थानात ती कशीतरी वाचविल्यानंतरही काँग्रेस पक्षश्रेष्ठी काही शिकले नाहीत, ही सामान्य कार्यकर्त्यांची खंत आहे. पक्षश्रेष्ठींना शह देण्यासाठी आणि प्रताप बाजवा यांचा अडसर दूर करण्यासाठी कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी वेगळा पक्ष काढण्याचे संकेत दिले होते. आता त्यांना शह देण्यासाठी सिद्धू यांनी आम आदमी पार्टीचे कार्ड खेळून बाजी मारली आहे. पदग्रहणाआधी सुवर्णमंदिर भेटीसाठी ६२ आमदारांचा लवाजमा नेणाऱ्या सिद्धूंचा विधानसभा तिकीटवाटपात वरचष्मा राहिला, तर कॅप्टन अमरिंदरसिंगही अकाली दलाशी साटेलोटे करू शकतील.
पंजाबात काँग्रेस आणि अकाली दल यांच्यात कुटुंबाच्या पातळीवर सोयरिकीची परंपरा आहे. मास्टर तारासिंग, ग्यानी झैलसिंग यांच्यापासूनचे अनेक नेते अकाली दलातून काँग्रेसमध्ये आले होते. कॅप्टन अमरिंदरसिंग ७९ वर्षांचे आहेत. मुख्यमंत्रिपदाची त्यांची दहा वर्षे पूर्ण होतील. आधी त्यांनी निवृत्तीचे संकेत दिले होते; परंतु सिद्धूंकडून अवमानकारक शेरेबाजी व पक्षश्रेष्ठींकडून त्यांची झालेली पाठराखण यामुळे दुखावलेल्या अमरिंदरसिंग यांनी २०२२ नंतरही मुख्यमंत्रिपदाची दावेदारी सोडली नाही, तर काँग्रेसला आज सोपा वाटणारा विजय हातातून जाईल. कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर अकाली दल-भाजपचा काडीमोड झाला असला तरी दोन्ही पक्षांचा लाभ लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीवेळी ते पुन्हा एकत्र येतील. कॅप्टन अमरिंदरसिंग आणि सिद्धू या दोघांच्या बाबतीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींची अवस्था ‘धरले तर चावते आणि सोडले तर पळते,’ अशी झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.